पुन्हा भेटूया .. ⏳

  लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर

'भवानी ट्रॅव्हलर' कोकणच्या दिशेने सुसाट धावत होती. अजय-विजय, ड्रायव्हर-क्लिनरची जोडी २५ प्रवाशांनी भरलेली बस घेऊन गावाकडे निघाले होते. डिसेंबर महिना सुरु झाला होता. थंडीचे दिवस आणि मुलांना सुट्ट्या, त्यामुळे त्यांची ट्रॅव्हलर रोज नवीन-नवीन ठिकाणी जात होती. गेले १५ दिवस, ते दोघेही सतत फिरतीवर होते.

आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ते मुंबईत पोहचले. थोडावेळ विश्रांती आणि जेवणखाण आटोपून बरोबर दोन वाजता कोकणला जाण्यासाठी त्यांनी ट्रॅव्हलर सुरु केली. साधारण ७ तासांचा प्रवास आहे,
आपण नऊ वाजेपर्यंत कोकणात पोहचू, बस दोनदा थांबेल, चहा-पाणी व फ्रेश होण्यासाठी, विजय क्लिनर बसमधील प्रवाश्यांना सांगत होता. 'गणपती बाप्पा मोरया' अशी प्रार्थना करून बस बरोबर सव्वा दोनला निघाली. प्रवासी जेवण करून निघालेले होते त्यामुळे थोड्यावेळात ते पेंगू लागले. बसमध्ये शांतता पसरली. जवळपास सहावाजेपर्यंत प्रवासी झोपलेले होते. सहा वाजता क्लिनरने आवाज दिला, येथे बस २० मिनिटे थांबणार आहे. हे ऐकताच प्रवासी उठले, बसमधून बाहेर आले. बस एका हॉटेलजवळ उभी केली होती. प्रवासी चहा बरोबर गरम वडापाव, कांदाभजी मागवत होते. थंडगार वारे वाहत होते. ड्राइवर चहाचा झुरका मारत असताना, बसमधील आजोबा त्याला म्हणाले, "थंडीच्या दिवसात काळोख लवकर पडतो, आम्हां म्हातारा-म्हातारीला पुढे जायचे आहे, तर पोरा, बस वेळेत पोहचव." त्याने पण प्रयत्न करतो, असे म्हणून तो बसमध्ये चढला. क्लिनरने घंटी मारताच बस स्टार्ट झाली. गेले काही दिवस सततच्या प्रवासाने तो दमला होता, नकळत त्याचे डोळे मिटले गेले आणि धडामधूम आवाज झाला.

काय झाले? अरे देवा! माझ्या डोक्याला मार लागला, माझ्या पायातून रक्त येत आहे, माझा हात वाकडा झाला, आरडाओरडा, किंकाळ्या आणि बसमध्ये काळोख झाला.

कोणीतरी लाईट लावा रे, माझं पैशाचं पाकीट मिळत नाही, बसमधले शेठजी ओरडू लागले. अचानक एक धिप्पाड, जाडजूड मिश्या, काळा पोशाख, रेड्यावर बसलेला माणूस बसमध्ये दिसला. कोकण इलो की काय? दशावतारातील नट बसमध्ये कधी चढलो? बसमधील प्रवाशाने विचारले.

बसमध्ये रेड्याला परवानगी नाही, एक प्रवासी ओरडला.

हा बसमध्ये नव्हताच, क्लिनर बोलला.

मग हा कोण? सर्वांनी एकदम विचारले.

मी कोणी नट नाही, मी पाताळलोकचा राजा यमराज आहे. अशी त्यांनी ओळख करून देताच सर्व प्रवासी घाबरले.

"आमची गाडी कोकणला चालली होती, अचानक पाताळलोकात कशी पोहचली?” पहिल्या सीटवरील शेठाणीने घाबरत विचारले. यमराजांनी टाळी वाजवताच एक स्क्रीन दिसू लागला, भवानी ट्रॅव्हलर प्रवाशांसहित जात आहे, असे चित्र दिसले आणि दुसऱ्या चित्रात बस दरीत कोसळली.

देवा, वाचव आम्हांला, सर्वांच्या तोंडून एकच उद्गार.

अचानक स्क्रीनवर खरखर दिसू लागली, चित्र अस्पष्ट झाले. आता पुढे काय? शेठाणी यमराजांना विचारू लागली. "प्रवासाचे खरे कारण सांगा आणि मृत्युलोकात परत जा, पण जर का खोटं बोललात तर रेड्यावर बसवून पाताळलोकात घेऊन जाईन.” यमराज दरडावत म्हणाले.

शेठ म्हणाला," कोकणात आमचे second home आहे, तिथे आराम करायला चाललो आहोत.” शेठाणी चटकन म्हणाली," जागा माझ्या वडिलांनी हुंड्यात दिली होती, हे पण खरंखरं सांगा.” शेठचा चेहरा रागाने लालबुंद झाला.

पाठीमागच्या सीटवरील जोडपे हातात हात घालून बसले होते. यमराजांनी पाहताच "आम्हीं कुलदेवीच्या दर्शनाला निघालो आहोत, पाळणा हलण्यासाठी." ती लाजत म्हणाली.

तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? पाठीमागे बसलेल्या प्रवाशाने विचारले. "दोन वर्ष." तो हसत म्हणाला. म्हणजे अजून तुमचा रोमँटिक टप्पा संपायचा आहे तर, त्यानंतर हातात हात घेणे तर सोडा, चार हात लांब रहाल, तो त्याच्या बायकोकडे बघत बोलला.

तो पुढे म्हणाला, "मी आईवडिलांचा गुणी मुलगा होतो, खरे बोलणे तर माझ्या नसानसात भिनलेले होते, पण आता मला सारे जगच खोटे वाटत आहे.” हे ऐकून ती बोलली, "यमराज, मी देखील कधी खोटं बोलत नव्हती, पण ह्या मनुष्यामुळे मी शिकले.” ती पुढे म्हणाली, " ह्यांच्याकडे मी १००० रुपये मागितले तर ५०० रुपयेच देतात, मग काय करू? १००० रुपयांची जरूर असेल तर मी २००० रुपये मागते, मला खोटं बोलावं लागतं.”

"देवा, हिने स्वतः कबूल केले आहे, तर हिची जागा आता नरकात!” तो रागाने बोलला. "मी वटसावित्रीचे व्रत करते, त्यामुळे जिथे नवरा तिथे बायको, नाही का यमराज?" ती हसत म्हणाली.

त्यांचे बोलणे ऐकून यमराज म्हणाले, "comparison बघा, सत्ययुग to कलियुग.”

"अरं पोरा, आता चित्र पालटलं आहे.” आजोबा बोलले. "सत्ययुगात सावित्री निराधार होती, पण कलियुगात तिला लाडक्या भावांचा आधार आहे, त्यांना दरमहिना ओवाळणी मिळते, पॉकेटमनी म्हणा.” आजोबा बायकोकडे बघत बोलले.

"यमराजांच्या घरी देखील ज्वालामुखी आहे, लाव्हा उसळत असणारच ना!" एका स्त्रीप्रवासी ने विचारताच यमराजांनी चेहरा लपवला.

मागच्या दोन सीटवर व बाजूच्या रांगेतील दोन सीटवर मध्यमवयीन जोडपी बसलेली होती. परंतु त्या सर्वांचे चेहरे हुप्प होते. ते पाहून यमराजांनी नजरेने विचारले, काय झाले? त्यातील एक पुरुष सांगू लागला, आम्हीं दोघे भाऊ व त्या दोघी आमच्या बहिणी आहेत, आम्हीं सर्वजण फॅमिलीसहित गावाला चाललो आहोत. उद्या आमच्या वडिलांचा तेरावा आहे, कार्यक्रमानंतर त्यांचे मृत्युपत्र वाचणार आहेत.

त्याची बहीण चटकन म्हणाली," भावांना प्रॉपर्टी जास्त आणि बहिणींना कमी.”

त्यावर दुसरा भाऊ म्हणाला," कर्तव्याला आम्हीं आणि पैशाला तुम्हीं.”

हे ऐकून दुसरी बहीण म्हणाली," केलेल्या गोष्टी काढून दाखवणे, आम्हांला आवडत नाही दादा."

"काही केले असेल तर सांगणार ना नणंदबाई!" पहिल्या भावाची बायको ठसक्यात म्हणाली.

तुम्हांला काय माहित आहे वहिनी? असे बहिणीने म्हणताच भांडणाला सुरवात झाली.

"तुमची बहीण आली आहे का कधी प्रॉपर्टी मागायला?” असे दुसऱ्या भावाने यमराजांना विचारताच त्यांनी डोक्याला हात लावला.

आजोबा म्हणाले,"पैसा जिवापेक्षा मोठा आहे, नाहीतर मृत्युदेव समोर असताना कुणाची बोलायची हिम्मत नसते आणि हे सारे वैऱ्यासारखे भांडत आहेत, पैसा वर नेऊ शकत नाही रे पोरांनो!” असे आजोबांनी म्हणताच भांडण बंद झाले.

बसमध्ये मागच्या बाजूला मुलामुलींचा एक ग्रुप बसला होता. ते सारेजण बोलण्यात मग्न होते.

"तुमच्यात काय चर्चा रंगली आहे? ती आम्हांला सांगा.” असे यमराजांनी बोलताच

ग्रुपमधील एकजण सांगू लागला, आम्हीं एक Web series बनवत आहोत, त्याच्या शूटिंगसाठी कोकणात चाललो आहोत. 'कलियुगातील सावित्री' असे नाव आहे, 6 भागांची Web series असणार आहे. आम्हांला यमराजाची गरज लागणार आहे, तो रोल तुम्हीं कराल का? असे यमराजांना विचारताच ते खुश झाले व हिरोसारखे केसांतून हात फिरवू लागले. "हो, हो मी नक्कीच काम करीन, माझा रोल सांगा.” असे यमराज म्हणताच डायरेक्टरने स्क्रिप्ट वाचायला घेतले.

बसमधील सर्व प्रवासी कथानक ऐकण्यासाठी उत्सुक झाले.

पहिला भाग : तरुण सावित्री, तिचे आईवडील सांगतात, आता तुझे लग्नाचे वय, स्वयंपाक, घरातील कामे शिकली पाहिजेत. शी! घरातील कामे कोण करणार? असे रागाने बोलत सावित्री घराबाहेर जाते. फूड स्टॉलला ती मैत्रिणींबरोबर pizza, cheesy fries खाते.

दुसरा भाग : त्या सर्वजणी trekking चा प्लॅन बनवतात. सामान घेऊन डोंगराच्या पायथ्याशी पोहचतात, सर्वजणी मिळून तंबू लावतात. आजूबाजूला घनदाट जंगल, मनुष्यवस्ती नाही.

तिसरा भाग : सत्यवान मित्रांबरोबर त्याच ठिकाणी पोहचतो, ते one night stay चा प्लॅन बनवतात.

चौथा भाग : सावित्री आणि तिच्या मैत्रिणी जंक फूड खातात, पण सत्यवान गरीब असल्यामुळे घरून डबा आणतो.

अहो, त्याकाळी पिझ्झा, बर्गर नव्हते, सावित्री आणि सत्यवान कंदमुळे खात होती, एका प्रवाशाने सांगितले.

डायरेक्टर चटकन म्हणाला," ही कलियुगातील सावित्री आहे आणि कंदमुळे खायला जंगले तरी शिल्लक आहेत का? अलीकडे प्राणी शहराकडे धाव घेत आहेत, न्यूजमध्ये बघतो ना आपण!"

मुलींचे डिनर संपते आणि त्यांचे मिनरल वॉटर पण संपते. म्हणून सावित्री कळशी घेऊन पाणी शोधायला निघते.

हे ऐकताच heroine सावित्री म्हणाली," मी नाही कळशी उचलणार, माझ्याघरी नोकर आहेत, त्यापेक्षा मी ऍपवरून maid बोलवीन." बसमधील प्रवासी हसू लागले.

एका प्रवाशाने तिला विचारले," जर सत्यवानने ती काम करते म्हणून तुमच्याऐवजी maid ला propose केले तर ..."

हे ऐकताच heroine चिडली व म्हणाली," माझे dad series चे producer आहेत, त्याला मलाच propose करावे लागेल, मी सांगेन तेच त्याला ऐकावे लागेल.”

"ही फक्त Web series साठी बायको आहे ना! नाहीतर एक दिवस तूच यमराजांची आतुरतेने वाट पाहशील." आजोबा हसत हिरोला म्हणाले.

पाचवा भाग : सर्वत्र अंधार, सावित्री पाण्याच्या शोधार्थ निघालेली. त्याचवेळी यमराज फेरफटका मारण्यासाठी तेथे आलेले. सावित्री त्यांना बघते, घाबरते आणि ओरडते.

तेवढ्यात heroine ओरडली, "थांबा, पुढचे dialogue मी बोलते.” तिचे बोलणे ऐकताच डायरेक्टर थांबले. ती म्हणाली," मी मदतीसाठी आवाज देईन, वाचवा, वाचवा मला या villain पासून वाचवा, तू मला touch करू नकोस, नाहीतर माझे dad तुला शूट करतील कारण आमच्याकडे खूप पैसा आहे.”

शूट करणार, या भीतीने यमराजांना घाम फुटला.

एका प्रवाशाने विचारले, "तुझे dad शूट करणार, तर hero काय करणार?”

मी सावित्रीचा आवाज ऐकून धावत येणार, तिला पाहताच

" मी गाणं गाणार,

चलाओ ना नैनॊ से बाण रे, जान .. ना जान रे,

कही निकल न जाये, हमरी body से प्राण रे,

love at first sight", हिरो लाजत म्हणाला.

त्यावर सावित्री सत्यवानला म्हणाली, "मग आपण लग्न करूया आणि माझ्या घरी सुखात राहूया.”

कथानक ऐकून यमराज म्हणाले," मी पण एक twist करतो, कलियुगात सत्यवानच्या ऐवजी सावित्रीलाच उचलतो."

"सत्ययुगात, जसे सावित्रीने यमराजाकडून सत्यवानचा प्राण परत आणला होता, तसे कलियुगात तू माझ्यासाठी कष्ट घेशील ना! माझा हिरो.” असे हिरोईनने म्हणताच हिरो विचारात पडला.

हे पाहताच यमराज म्हणाले," खरा हिरो तर तुमच्या गाडीचा ड्राइवर आहे, मागील तीन तासांपासून त्याने गावकऱ्यांच्या मदतीने, शर्तीचे प्रयत्न करून तुम्हां सर्वांचे प्राण वाचवले आणि तुमचा मृत्यूलोकातील प्रवास पुन्हा एकदा सुरु केला."

हे ऐकून हिरोईन म्हणाली," मग आपण त्यालाच hero करूया का?" हे ऐकताच यमराज web series चा रोल सोडून पळाले.

बसमध्ये आनंदी आनंद झाला. बसमध्ये बसलेले आजोबा म्हणाले," पोरी यमराजाला पळवणे, भल्याभल्यांना जमत नाही, पण तू करून दाखवलेस." बसमध्ये हशा पिकला.

आणि अगदी पुढच्या क्षणाला 'भवानी ट्रॅव्हलर' कोकणच्या दिशेने पुन्हा धावू लागली.

Click here to go back to themarathistory.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आणि माझा . . . झाला

Second हनि 🌙... 🧡

चला, श्रीमंत होऊया ...! 💰