वाळूवरील रेघोट्या
लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर आज, दहावीचा शेवटचा पेपर देऊन मी वर्गाबाहेर पडले, बरेच दिवस अभ्यासाचं ओझं डोक्यावर होतं, ते आज खाली झालं. हुश्श ! परीक्षा झाली, एकदाची परीक्षेची कटकट संपली, आता फक्त धमाल असे वेगवेगळे उद्गार माझ्या कानावर पडत होते. पण ....... आज शाळेतून निघतांना पाऊले झपाझप पडत नव्हती, मन शाळेच्या चार भिंतीत अडकले होते. नोटीस वाचण्यासाठी नोटीस-बोर्ड जवळ केलेली गर्दी, लायब्ररीत पुस्तके घेण्यासाठी केलेली गडबड, ग्राउंडवर खो-खो, पकडा-पकडी, बास्केटबॉल खेळतांना केलेली मजा ह्या साऱ्या गोष्टी आज मला आठवत होत्या. शालेय जीवनातील काही क्षण झटकन माझ्या डोळ्यासमोर तरळले, हसणे-रडणे, रुसणे-फुगणे तर कधी कधी कट्टी-बट्टी करणे. अभ्यासातील स्पर्धा, खेळातील स्पर्धा, जिकंण्यासाठी होणारी चढाओढ सारे एका स्वप्नाप्रमाणे माझ्या डोळ्यासमोरून विरून गेले . ऋतू, एss ऋतू, अगं थांब, मी मागे वळून पहिले, तनुजा हाक मारीत होती. ...