वाळूवरील रेघोट्या

लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर 

         आज, दहावीचा शेवटचा पेपर देऊन मी वर्गाबाहेर पडले, बरेच दिवस अभ्यासाचं ओझं डोक्यावर होतं, ते आज खाली झालं.  हुश्श ! परीक्षा झाली, एकदाची परीक्षेची कटकट संपली, आता फक्त धमाल असे  वेगवेगळे उद्गार माझ्या कानावर पडत होते.   

        पण ....... आज शाळेतून निघतांना पाऊले झपाझप पडत नव्हती, मन शाळेच्या चार  भिंतीत अडकले होते.  नोटीस वाचण्यासाठी नोटीस-बोर्ड जवळ केलेली गर्दी, लायब्ररीत पुस्तके घेण्यासाठी केलेली गडबड, ग्राउंडवर खो-खो, पकडा-पकडी, बास्केटबॉल खेळतांना केलेली मजा ह्या साऱ्या गोष्टी आज  मला आठवत होत्या. शालेय जीवनातील काही क्षण झटकन माझ्या डोळ्यासमोर तरळले, हसणे-रडणे, रुसणे-फुगणे  तर कधी कधी कट्टी-बट्टी करणे. अभ्यासातील स्पर्धा, खेळातील स्पर्धा, जिकंण्यासाठी होणारी चढाओढ सारे एका स्वप्नाप्रमाणे माझ्या डोळ्यासमोरून विरून गेले .  

        ऋतू,  एss ऋतू, अगं थांब, मी मागे वळून पहिले, तनुजा हाक मारीत होती.

        "किती हाका मारल्या ! कुठे लक्ष होतं तुझं" ? तनुजा म्हणाली.

        "काय झाले " ! मी तिला विचारले.  

      "उद्या संध्याकाळी, आम्ही सगळ्यजणी हर्णेला समुद्रकिनारी फिरायला जाणार आहोत, तू येशील का" ? तिने  विचारले.

       "हो, येईन",  असे सांगून मी घरी जायला निघाले .

       हर्णे बंदरापासून काही अंतरावर आमचे गाव - सेलदुरे; तसं हे लहान खेडं पण शांत, मच्छीसाठी प्रसिद्ध, त्यामुळे मच्छी खाणाऱ्यांची नेहमी वर्दळ असते.

     ठरवल्याप्रमाणे, आम्हीं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी समुद्रकिनारी फिरायला गेलो. तेथे माणसांची बऱ्यापैकी गर्दी होती, काही  'walk' करत होते  तर काही मंडळी भेळीचा आस्वाद घेत होते, काही ठिकाणी वाळूवर बसून 'senior citizens ' ची गप्पांची मैफल रंगली होती तर  काही ठिकाणी लहान मुले वाळूचा किल्ला बांधण्यात मश्गुल होते .    

      समुद्र खरं शांत होता, पण लाटांचा आवाज मात्र कानाला स्पर्शून जात होता. पाण्यातील मजा लुटण्यासाठी, आम्हीं सर्वजणी समुद्राकडे वळलो . समुद्राची लाट अंगावर येतांना मन देखील चिंब भिजून गेले . एकमेकींच्या अंगावर पाणी उडवत , गाणी गात , नाचत,  ती सायंकाळ आम्हीं   'रम्य सायंकाळ ' बनवली  होती .  बराच वेळ लाटांचा आनंद मनमुराद लुटून , मावळत्या सूर्याला वंदन करून आम्हीं पाण्याबाहेर आलो.

      आम्हीं जरा दूरवरची एक निवांत जागा बसण्यासाठी निवडली. सगळ्यांनी भेळपुरी, रगडापुरी अर्थात 'चाट' खायचा बेत केला . 'चाट' ची ऑर्डर देऊन आम्हीं सर्वजणी शाळेतल्या गमती-जमती आठवून हसू लागलो. आम्हां सर्वांना आता कडकडून भूक लागली होती, त्यामुळे ऑर्डर येताच आम्हीं त्यावर ताव मारला.  भेळपुरी खाता खाता, मी बाजूला पडलेली काडी घेऊन वाळूवर रेघोट्या मारू लागली .

        "काय गं काढतेस ऋतू" ? शीतल विचारू लागली .      

      काही नाही गं, सहजच असे म्हणत मी मुद्दामून विषय टाळण्याचा प्रयत्न केला, पण मनात मात्र विचारचक्र चालूच होते. जस जशी भेळीची चव जिभेवर रेंगाळू लागली, तसतसे मन पुढे पुढे धाव घेऊ लागले. वाळूवर मी  एक गोल काढण्याचा प्रयत्न करत होते, त्यात काही उभ्या, आडव्या रेषा काढत होते. त्या गोल आकारात काही स्टेप्स काढत असतानाच, तनुजा ओरडली, " ए ऋतू ,  तू चंद्रावर जाणार आहेस का? उरलेली भेळ खायला !

        "अगं, चंद्रावर गुरुत्वाकर्षण नसते, त्यामुळे तेथे वस्तू तरंगतात " शीतल म्हणाली.

        " ठाऊक आहे मला, चंद्रावर वस्तू तरंगतात, त्यामुळे उरलेली भेळ मी पृथ्वीवरच खाणार आहे, चंद्रावर नाही " मी हसत म्हणाले.

         Good ऋतू, नाहीतर कुरमुरे, फरसाण, टोमॅटो, कांदा चंद्रावर तरंगतील आणि उगीचच शास्त्रज्ञांची चिंता वाढेल ! रिया मिश्कीलपणे बोलली. 

        एकीकडे मैत्रीणींशी बोलत होते तर दुसरीकडे मात्र वाळूवर रेघोट्या काढणे चालूच होते . मी कुठलं चित्र काढत आहे, हे काही मैत्रिणींच्या लक्षात येईना, मी मनात हसत होते पण त्यांना काही थांगपत्ता लागू दिला नाही. सर्वांचे खाऊन झाले तशी शीतल पटकन म्हणाली," ए ऋतू , आता सांग, हि शिडी चढत तू नेमकी कुठल्या ग्रहावर चालली आहेस" ?

        बरंsss ! आता  मी सांगते, असे म्हणून मी बोलायला सुरुवात केली.

         हा गोल  म्हणजे कुठलाही ग्रह नसून मानवाचे जीवनचक्र आहे. ह्या पाच 'steps ' म्हणजे मानवी जीवनातील पाच टप्पे आहेत - जन्म, बालपण, तरुणपण,  प्रौढावस्था आणि वार्धक्य. हे पाचही टप्पे जवळपास प्रत्येक मानवाला जीवनात पार करावेच लागतात आणि हे पाच टप्पे सुरळीत आणि आनंदाने  पार पडावेत असेही  त्याला वाटते.

         "त्यात कुठलाही अडथळा असू नये हिच प्रत्येक मानवाची इच्छा असते, बरोबर ना ऋतू " तनुजा म्हणाली.

        "बरोबर तनुजा, पुढचा टप्पा हा पहिल्या टप्प्यापेक्षा अधिक चांगला असावा असेही मानवाला वाटत असते", मी म्हणाले.

       " ह्या पाच steps चढताना, डाव्या आणि उजव्या हाताला असलेले रेलिंग जर घट्ट पकडले तर निश्चितच मनुष्य धडपडणार नाही", रिया म्हणाली. 

       " खरं आहे तुझं म्हणणे, रिया, डाव्या हाताचे रेलिंग हे 'परमेश्वराचे' प्रतीक आहे तर उजव्या हाताचे रेलिंग 'आई-वडील आणि मित्र-मैत्रिणी' याचं प्रतीक आहे. परमेश्वर, आई-वडील आणि मित्र-मैत्रिणी यांचे सहाय्य जर आपल्याला आयुष्यात मिळाले, तर आपण हे सारे टप्पे आनंदाने पार पाडू नाही का" ! मी म्हणाले.

         "ऋतू, अगदी खरं बोललीस बघ," तनुजा म्हणाली.

        "मी डाव्या बाजूचे रेलिंग हाताने घट्ट पकडले आहे, पण उजव्या बाजूच्या रेलिंग साठी मला तुम्हां सर्वांच्या मैत्रीची गरज आहे, द्याल ना मला प्रत्येक टप्प्यावर साथ....  ? ", मी  म्हणाले. आज समुद्राला साक्षी ठेऊन आपण शपथ घेऊया, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ही मैत्री अबाधित राहील, असे म्हणून मी माझा हात पुढे केला आणि लगेचच मैत्रिणींनी माझ्या हातावर त्यांचा हात ठेवला, आमचे डोळे आनंदाने भरून आले.

        "ऋतू, तुझ्या वाळूवरच्या रेघोट्या, जीवनाचं मर्म सांगत आहेत, नाही का" ! रिया म्हणाली.

         मी हसले व म्हणाले ," निघूया आता, उशीर होईल  , दिवेलागणीच्या अगोदर आपल्या सर्वांना घरी पोहचायचे आहे", असे  म्हणताच सर्वांनी वाळूवरील रेघोट्या मनात कोरून घराच्या दिशेला पाऊले वळवली. 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जमलं रे जमलं

An Evening in SwargLok

जादूची डायरी.... ✍