Golden Journey
लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर
'स्वप्न निवास' बंगला आज फुलांच्या माळांनी नटलेला होता, दिव्यांची रोषणाई केली होती, गेटजवळ केळीचे खांब डौलाने उभे होते आणि बॅंडवाले देखील तयार होते. पाहुण्यांना बसण्यासाठी बाहेर हिरवळीवर खुर्च्यांची व्यवस्था केली होती. बंगल्याच्या आत मंद आवाजात सनई चौघडा वाजत होता. पाहुणे मंडळीं यायला सुरवात झाली. घरात नातेवाईकांची गडबड सुरु होती, मंगलमय वातावरण होते.
पटापट नाष्टा
करा आणि तयार व्हा, सायली तिच्या मुलांना, सई आणि सुमितला सांगत होती. दुसऱ्या खोलीत
सायलीची वहिनी स्मिता, सर्व सामान ताटात व्यवस्थित ठेवत होती पण तिची ६ वर्षाची मुलगी
शार्वी सारखी तिच्या पाठीशी लागत होती. तिने तिच्या हातावर लाडू दिला व सांगितले की,
सईताई आणि सुमितदादा यांच्याबरोबर खेळ जा, मला त्रास देऊ नको. तिने लाडू हातात घेत
विचारले, "आई, लाडू का बनवला?" स्मिता हसत म्हणाली," आज आपल्याकडे गंमत
आहे, जा पळ, असे म्हणून तिला पिटाळले."
अप्पा आणि आईंचे आवरले का? हे पाहण्यासाठी ती त्यांच्या खोलीकडे वळली. अहो, किती वेळ आरशात स्वतःला पहाताय? सारखे पाहिल्याने डोक्यावरचे गेलेले पुन्हा येणार नाहीत हो! नलिनीचे बोलणे स्मिताच्या कानी पडले. ती चटकन म्हणाली," आई, वधू-वराची खोली वेगवेगळी असते, चला बरं, दुसऱ्या खोलीत, असे म्ह्णून ती नलिनीला घेऊन गेली.” तेवढ्यात अप्पांचे लहान भाऊ तात्या काका, त्यांची बायको, दोन मुले, सुना आणि नातवंडांसहित आले. "हुश्श ! किती गरम होतंय, अगदी मुंबईसारखाच उकाडा जाणवतोय, कार्य दिवाळीनंतर काढलं असतं तर बरं झालं असतं नाही का?” तात्या काकांची बायको बोलली. लगेचच संजीवने त्यांच्यासाठी cold drink आणले. इतक्या झटपट प्लॅन का केला? तात्याकाकांच्या मुलाने संजीवला विचारले. "अप्पांनी आमच्याकडून कधीही अपेक्षा ठेवली नाही, आज पहिल्यांदा त्यांनी इच्छा व्यक्त केली म्हणून मी आणि सायलीने ती लगेचच पूर्ण करण्याचे ठरवले," संजीव म्हणाला. छान, छान असे म्हणून तात्याकाकांनी cold drink चा दुसरा ग्लास उचलला.
बाहेरील
पाहुण्यांच्या सरबराईची काळजी अप्पांचा जावई सतीश घेत होता. उन्हातून आलेली पाहुणेमंडळी
कुलरच्या वाऱ्याने आणि थंडगार वेलकम ड्रिंक्सने सुखावत होती.
"अजून
आत्या कशी आली नाही?" संजीव म्हणाला. "वाट बघत बसण्यापेक्षा त्यांच्या मोठया
मुलीला पटकन फोन लावा, कारण त्याच आत्या आणि काकांना घेऊन येणार आहेत," स्मिता,
संजीवची बायको म्हणाली.
संजीवने फोन लावताच पलीकडून उत्तर आले, १५ मिनिटांत
पोहचत आहोत. OK असे म्हणून संजीवने फोन कट केला. "ब्युटिशिअन आली आहे ना!"
संजीवने बायकोला विचारले.
"अहो, आईंसाठी ठाण्यावरून प्रसिद्ध ज्योती पार्लर
अँड सलोन च्या ब्युटिशिअन तर अप्पांसाठी नाशिकचा
Star salon वाला बोलावला आहे," ती हसत म्हणाली.
या कार्यक्रमात
कुठलीच उणीव राहता कामा नये, संजीव काळजीच्या स्वरात बोलला.
"मी, आत्या आणि सायलीताई यांच्याशी बोलूनच सर्व
तयारी केली आहे, तुम्हीं काळजी करू नका,"
स्मिता म्हणाली.
एकीकडे स्टेजवर विधीची तयारी सुरु होती तर दुसरीकडे
पाहुणेमंडळी स्टार्टरचा आस्वाद घेत होते. संजीव अप्पांची तयारी बघत होता तर सायली आईची
म्हणजे नलिनीच्या तयारीकडे लक्ष ठेवत होती.
आत्या, काका, मुली, जावई आणि नातवंडे बंगल्यावर पोहचताच
कार्यक्रमाला वेग आला.
अप्पाला छानसा रेशमी कपड्याचा फेटा बांध बरं, तेव्हा
आमची घरची परिस्थिती फार बेताची होती, त्यातच आमचे वडील देवाघरी गेल्यामुळे अप्पाचे
लग्न उरकून घ्यावे लागले, नवरदेवाची आवड-निवड पण बघितली नाही, बोलताना आत्याचे डोळे
भरून आले.
"आता कुठे मिळणार रेशमी कापड? राहू दे,"
अप्पा आत्याला म्हणजेच त्यांची लहान बहीण सुभद्राला म्हणाले.
"मामा
online चा जमाना आहे, ५० वर्षांपूर्वीचा काळ वेगळा होता, आता मिनिटांत
available," आत्याची मुलगी म्हणाली.
मग आत्याने
मोर्चा नलिनीच्या खोलीकडे वळवला. "हे काय वहिनी, नेहमीची ५ वारी साडी, छे, छे,
नऊवारी साडी नेसा, छान दिसेल," आत्या म्हणाली.
"अहो ताई, कशाला इतका खर्च करायचा?” नलिनी म्हणाली.
"आई खर्चाचा विचार तू करू नकोस, तुला एखादी गोष्ट हवी असेल तर पटकन सांग,"
सायली रागाने म्हणाली.
वहिनी, तरुणपणी परिस्थिती पाहून तू देखील मनाला मुरड
घातली असशील ना! आता परमेश्वर कृपेने भरभराट आहे, तर का नाही मजा करायची? असे म्हणून
आत्याने नलिनीला नऊवारी साडी नेसवली.
स्टेजवर या, भटजींनी announcement करताच पुरुषमंडळी अप्पांना घेऊन स्टेजकडे निघाली. मंगलाष्टका सुरु झाल्यावर, नलिनीला घेऊन घरातील महिला स्टेजच्या दिशेने निघाल्या. नऊवारी साडी नेसलेल्या नलिनीवर अप्पांची नजर खिळली आणि त्यांना ५० वर्षांपूर्वीचा काळ आठवला. त्यावेळेला नलिनी किती लाजरी-बुजरी होती, मान खाली घालून उभी रहायची, काही विचारले की, फक्त "ऊ ... हू" एवढंच बोलायची आणि आज ताठ मानेने येत आहे, what a confidence!
अप्पा माझ्याकडे
बघत आहेत, हे नलिनीच्या लक्षात येताच, तिने नजरेने सांगितले, लोक काय म्हणतील? अप्पांनी
पण नजरेनेच सांगितले, who cares?
मंगलाष्टका म्हणायला नातेवाईकांची चढाओढ लागली होती. शेवटी भटजींनी announce केले की, एकमेकांना हार घालताना, नवरा किंवा नवरीला उचलू
नका कारण ते दोघे सत्तरी पार केलेले आहेत. त्यांना त्यांचा लग्न समारंभ आनंदाने साजरा
करू द्या. मंगलाष्टका संपताच बँडवर गाणे वाजू लागले, जीवनात ही घडी अशीच राहू दे
.....
दोघांच्या हातात लाल गुलाबाच्या फुलांचा हार देण्यात
आला. तात्या काका पटकन म्हणाले," अप्पा वहिनींकडून हार घालून घेताना मान झुकवू
नको, नाहीतर म्हातारपणी वहिनींचे ऐकावे लागेल". तात्यांचे बोलणे ऐकताच सर्व मंडळी
हसू लागली.
अरे , एवढा जड हार आम्हां म्हाताऱ्यांना जमेल का! हिला तर Spondylolysis चा त्रास आहे, असे अप्पा म्हणताच संजीवने फक्त फोटोपुरती गळ्यात हार घाला, असे सुचवले. लग्नाचे पुढचे विधी अप्पा आणि नलिनी यांनी खुर्चीवर बसून आणि भटजींनी पाटावर बसून पूर्ण केले. होम चालू झाल्यावर अप्पांच्या हातात समिधा कोण देणार? यावर चर्चा सुरु झाली. ५० वर्षांपूर्वी, माझा भाऊ होमाच्यावेळी समिधा देत होता, पण तो आता वरून आशीर्वाद देत आहे, हे सांगताना नलिनीचे डोळे पाणावले. अप्पांचे लहान भाऊ तात्या समिधा द्यायला बसले. ते अप्पांच्या कानात हळूच बोलले, जेव्हा तू वर जाशील, तेव्हा देवाला माझा नंबर लगेच लावायला सांग हो, विसरू नकोस. अप्पांनी प्रेमाने तात्याच्या पाठीवरून हात फिरवला.
केटरर्स वाल्यांनी जेवण सुरु केले. सर्वांनी जेवणाचा
आस्वाद घ्यावा, अशी संजीवने announcement केली. संजीव आणि सायली सासरच्या माणसांना
जेवणाचा आग्रह करत होती तर आत्या आणि तात्या देखील त्यांच्या सासरच्या माणसांकडे आवर्जून
लक्ष देत होते.
गरम होतंय,
असे म्हणत ice-cream च्या प्लेट्स फस्त होत होत्या.
सर्व विधी
संपले होते. आता नवरा-नवरी व त्यांच्याबरोबर जेवायला बसणाऱ्यांसाठी टेबल खुर्च्यांची
व्यवस्था करण्यात आली. स्टेजवरून उतरून जेवायला जायचे म्हणून अप्पा मोजडी शोधू लागले,
पण त्यांना स्टेजवर मोजडी दिसेना. त्यांनी चटकन राधिकाकडे पहिले कारण त्या वेळेला राधिका,
नलिनीची मावसबहीण, हिने शूज लपवले होते. अप्पांचा स्टेजवरील प्रकार राधिकाच्या लक्षात
आला. ती हसत म्हणाली," अप्पा, या वयात मला माझ्या चपला कुठे काढून ठेवल्या? ते
लक्षात रहात नाही, माझी नातवंड मला शोधून आणून देतात तर तुमच्या चपला मी काय लपवणार?"
तेवढ्यात अप्पांच्या नातवाने, त्यांनी स्टेजखाली काढून ठेवलेल्या मोजडी, त्यांना स्टेजवर
आणून दिल्या.
नवरा-नवरीच्या ताटाभोवती फुलांची रांगोळी काढण्यात
आली. सर्वजण जेवायला बसले. "वहिनी, अप्पाला घास भरवताना चांगलं मऊसूत घास भरव,
नाहीतर त्याच्या कवळीला त्रास होईल," आत्या हसत म्हणाली. हे गं काय आई, मामाची
चेष्टा करते, आत्याची मुलगी बोलली.
त्यानंतर
नवरा-नवरीची चेष्टा, मस्करी करत, भूतकाळ आठवत सर्वांनी जेवण केले.
वधू-वरांना
शुभेच्छा देऊन पाहुणेमंडळी घरी जायला निघाली.
केटरर्स आणि डेकोरेशन वाल्यांनी हळूहळू सामान आवरायला सुरुवात केली. घरात आल्यावर
सर्वांनी त्या दोघांना उखाणा घ्यायची request केली.
अप्पा
म्हणाले," पाऊण गेले, चतकोर राहिले,
नलिनीची साथ मिळताच,
माझे आयुष्य पूर्ण झाले.”
सर्वांनी टाळ्या वाजवल्या. वहिनी आता तुझा टर्न, असे
आत्या म्हणताच
नलिनी
बोलली, "एकमेकांना साथ देत, पाऊण गेले चतकोर राहिले, सुरेशरावांकडे एकच मागणे, वर जाताना मला बरोबर
नेणे.”
"असं का बोलते आई?" सायली म्हणाली.
"तरुणपणी अनेकजण सोबत असतात, पण म्हातारपणी मला
तू आणि तुला मी एवढंच खरं असतं," नलिनी हसत म्हणाली.
दुसऱ्या दिवशीच्या पूजेसाठी तात्या काका, काकी, सुभद्रा
आत्या आणि काका थांबले. स्मिताने सर्वांना फ्रेश होऊन बाहेर अंगणात बसायला सांगितले. ती
सर्वांसाठी चहा आणि बिस्किटे घेऊन बाहेर आली. "स्मिता रात्रीसाठी बाहेरून जेवण
मागवूया का? तुम्हीं सर्वजण दमला आहात ना!" संजीव चहा पिताना बोलला.
अरे, दुपारी बाहेरचं जेवण झालंय, पुन्हा रात्री नको,
त्रास होईल, त्यापेक्षा मी सर्वांसाठी मटारपुलाव बनवते, सायली तू पापड तळ आणि स्मिता
तू कोशिंबीर बनव, असे आत्या म्हणताच 'मस्त बेत' असे म्हणून सर्वांनी होकार दर्शविला.
नलिनी हसली. हे पाहून सायलीने विचारले," काय झाले आई? का हसलीस?"
त्यावर आत्या म्हणाली," मी कारण सांगते, अगं,
तुम्हीं आजकालच्या मुली, हातावरची मेहंदी गेल्यावर म्हणजे फिरून आल्यावर आठवड्यानंतर
कामाला सुरुवात करता पण वहिनी माप ओलांडून घरात आली नाही, तोच तिने कामास सुरुवात केली."
मी आणि तात्या लहान आणि आई देखील अण्णांच्या दुःखातून
सावरली नव्हती, पण वहिनीने मायेने, प्रेमाने आमचा सांभाळ केला, हे सांगताना आत्याचा
गळा दाटून आला. अप्पा खरंच नशीबवान आहे, अशी अर्धांगिनी भेटायला! असे म्हणत तिने नलिनीला
मिठी मारली.
"लग्नाला खूप खर्च केला संजीव तू, नाही का!"
काकी म्हणाली.
हो, तुझे म्हणणे बरोबर आहे काकी, आई -बाबांनी ५० वर्ष सुखाचा,आनंदाचा संसार केला, असे उदाहरण क्वचितच दिसेल, म्हणून त्याचे celebration केलं. "आमची पिढी देखील लग्न टिकवायचा,आनंदाने राहण्याचा प्रयत्न करेल पण पुढची पिढी मात्र जरा कठीणच! पाच वर्षाचा काळ पण त्यांना डोंगराएवढा वाटेल,” संजीव हसत म्हणाला.
दिवसभराच्या
कामामुळे सर्वजण थकले होते, त्यामुळे जेवणानंतर सर्वजण झोपायला गेले. दुसऱ्यदिवशी सकाळी
चहा, नाष्टा झाल्यावर पूजेची मांडणी करायला सतीश आणि संजीवने सुरुवात केली. आत्या,
अप्पा आणि नलिनीच्या दिमतीला हजर होती. साधारण १ वाजेपर्यंत पूजा संपली मग आरती केली.
त्यानंतर सर्वजण जेवायला बसले. दुपारच्या जेवणानंतर जुने अल्बम, संजीवची, सायलीची लग्नाची
CD, नातवंडांच्या वाढदिवसाचे फोटो बघण्यात वेळ घालवला.
संध्याकाळ
झाली, दिवेलागणीची वेळ झाली. आत्याने हळूच नलिनीला चिमटा काढला आणि पुढे काय? असे मिश्कीलपणे
विचारले. तेवढ्यात अप्पा एक बॉक्स घेऊन आले. हे तुझे लग्नानंतरचे गिफ्ट असे म्हणून
तो बॉक्स त्यांनी नलिनीला दिला. तिने तो उघडून बघितला, त्यात सोन्याची माळ होती.
"बापरे! एवढं महाग गिफ्ट, ह्याची काय गरज होती?" ती म्हणाली.
अप्पा, बहिणीकडे बघत बोलले की, माझ्या लग्नाच्यावेळी
आपली आर्थिक परिस्थिती फार डबघाईला आली होती, त्यामुळे लग्नानंतर मी हिला कुठलेच गिफ्ट
दिले नाही. पाच वर्षानंतर हिच्या बहिणीचे लग्न झाले,तेव्हा तिच्या नवऱ्याने तिला गिफ्ट
दिले आणि तेव्हापासून नलिनी मला सारखी बोलते ' तुम्हांला माहित नव्हते का? लग्नानंतर
बायकोला गिफ्ट द्यायचे असते'. तेव्हाच मी ठरवले की, जर का मला लग्नाचा सुवर्ण महोत्सव
साजरा करायला मिळाला तर मी हिला मोठं गिफ्ट देईन, जेणेकरून हिची बडबड थांबेल.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा