चाळिशीतील वादळ 🙆♂️
लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर
सारखी चिडू नकोस गं, आई मला फोनवर उपदेश देत होती. मी तिला म्हणाले," तुझ्याकाळी इतकी tensions नव्हती, महागाई नव्हती, शिक्षणात competition नव्हते,
मी आणि दादा समंजस होतो त्यामुळे तुला कधी त्रास जाणवला नाही पण आताची मुले हट्टी आहेत, शिस्तबद्ध नाहीत, त्यांना पैशांची किंमत नाही....
"अगं, किती बोलशील डोकं जरा शांत ठेव," आई मला थांबवत म्हणाली.
मला ऑफिसमध्ये काम आहे, मी फोन ठेवते असे म्हणून मी कॉल कट केला आणि जागेवर येऊन बसली. तेवढ्यात शिपाई आला व म्हणाला," साहेबांनी तुम्हांला बोलावलंय." मी लगेच साहेबांच्या केबिनमध्ये गेली. "या मॅडम बसा, एक महत्वाचे काम आहे, तुम्हीं लगेच करून द्या," साहेब म्हणाले. "पण साहेब सकाळी दिलेले काम अजून पूर्ण झाले नाही आणि त्यात दुसरं काम देताय, तुम्हीच सांगा साहेब, कुठले काम पहिले करू? सकाळचे की दुपारचे?” मी काहीशी चिडून बोलले. माझ्या चेहऱ्यावरील expressions बघून साहेब शांतपणे म्हणाले," मॅडम रागावू नका, सकाळचे काम पूर्ण होत आले असेल तर ते पहिले संपवा मग हे काम सुरु करा." बरं, असे म्हणून मी केबिन बाहेर आले.
कामास सुरुवात केली तोच माझ्या बाजूच्या टेबलवरील शैला मला म्हणाली," निकिता मी half day घेऊन मुलीच्या शाळेत parents- teacher मीटिंगला जात आहे, माझ्या टेबलवरील papers हवे असतील तर please जरा बघ", असे म्हणून ती निघून गेली. माझ्या रागाचा पारा आणखीनच वाढला. सकाळचे काम, दुपारचे additional काम, त्यात शैलाने दिलेली जबाबदारी, संध्याकाळी घरचे काम, मुलांचा अभ्यास वरून मलाच बोलणार किती चिडचिड करते! शांत रहा.
५.३० वाजले, ऑफिस सुटायची वेळ झाली, मी टेबल आवरायला घेतले. आता ट्रेन म्हणजे गर्दीचा प्रवास,
सीट तर सोडा ट्रेनमध्ये चढायला मिळाले तरी
नशीब! विचार करता करता स्टेशनवर पोहचले. ट्रेन कॅन्सल झाल्याची announcement
झाली, म्हणजे आता आणखी गर्दी वाढणार, घरी जायला उशीर
होणार, पुन्हा चिडचिड झाली. घरी जाताना सोसायटीजवळ
असलेल्या डॉक्टरकडे जाते आणि विचारते 'डोकं शांत ठेवायला औषध मिळेल काय?'
सुदैवाने आज डॉक्टरकडे फारशी
गर्दी नव्हती, माझा दुसरा नंबर
होता.
मला पाहताच त्यांनी विचारले,"
काय झाले?"
"खूप चिडचिड होते, डोकं शांत ठेवायला औषध मिळेल काय?" मी म्हणाले.
माझ्या प्रश्नावर त्या खो-खो हसू
लागल्या. त्या पुढे म्हणाल्या," मनुष्य कधी शांत राहू शकतो का? धकाधकीच्या जीवनात बाहेरील ताणतणाव, घरातील जबाबदारी, शारीरिक समस्या त्यामुळे चिडचिड होणे स्वाभाविक आहे, त्यात ४० ते ५० या वयात शारीरिक बदल म्हणजे हार्मोनल बदल
होतात, त्यामुळे चिडचिड होणे, मूड स्विंग होणे यासारख्या गोष्टी होतात. "हे बदल फक्त
स्रियांच्यात होतात का?” मी त्यांना
विचारले.
"हे बदल स्त्री आणि पुरुष या दोघांच्यातही होतात,
पण स्त्रीचा चिंता करण्याचा स्वभाव असल्यामुळे
तिला जास्त त्रास जाणवतो, ती पुरुषांसारखी
बिनधास्त राहू शकत नाही", त्या म्हणाल्या.
सगळ्यांच्या मते मीच चिडते, रागावते, जणू काही मी चुकीची आणि ते बरोबर! मग मी आता
काय करू? न राहवून मी त्यांना विचारले. "तुला सकाळी
वेळ मिळत नाही तर रात्री झोपण्यापूर्वी १० मिनिटे meditation कर, त्याने मन हळूहळू शांत होईल, तुझा आनंद तुझ्यातच
शोध, तुझा आनंद दुसऱ्या कुणावर अवलंबून असता कामा
नये," डॉक्टर म्हणाल्या. बरं, प्रयत्न करते असे म्हणून मी निघाले.
पटापट रात्रीचे जेवण बनवले,
सगळ्यांचे जेवण झाले, घरातील कामे आटोपली आणि दमले असे सांगून मी झोपायला गेली.
नेहमीप्रमाणे रात्री झोपताना देवाला नमस्कार केला व म्हणाले," देवा चाळीशीनंतर स्त्रियांच्यात हार्मोनल बदल
होतात, त्यामुळे स्त्री कधी पटकन चिडते तर कधी emotional
होते, देवा तू तर सर्वज्ञ आहेस, माझी एक इच्छा
पूर्ण कर, माझे आयुष्य १० वर्ष पुढे कर म्हणजे ४० ते ५०
मधील १० वर्ष माझ्या आयुष्यातील काढून टाक,
माझ्या आयुष्यातील हा phase निघून जाईल मग पुढचे आयुष्य आनंदात जाईल please
देवा!" देवाने हसत तथास्तु म्हटले. मी
शांतपणे झोपले.
सकाळी ६ चा गजर वाजला. मी डोळे
उघडून चहूकडे पाहू लागले, वस्तू जशाच्या तशा
होत्या काहीही बदल नव्हता. बेडवरुन उठले, केस बांधले, तोंड धुतलं,
नॅपकिनने तोंड पुसताना सहज आरशात पहिले तर केस
पांढरे झालेले दिसले. कालपर्यंत इतके केस पांढरे नव्हते म्हणजे देवाने इच्छा पूर्ण
केली, आयुष्याची १० वर्ष पुढे गेली, आजपासून मी शांत होणार, स्वतःकडे लक्ष देणार, संध्याकाळी ऑफिसमधून येताना hair dye आणते असा विचार करून मी किचनकडे वळले.
"आई, चहा तयार आहे का?" नील ओरडत किचनमध्ये
आला. तो उंच आणि matured दिसत होता. मी
त्याला पहातच राहिले.
"आई मला निघायचे आहे," तो म्हणाला.
" इतक्या लवकर कुठे निघालास?" मी त्याला विचारले.
"आज interview आहे, विसरलीस का आई?" तो म्हणाला. पाय पडतो असे म्हणून तो वाकला.
पुस्तके इकडे-तिकडे टाकायचा,
मित्रांबरोबर बाहेरचे food खायचा, कधीकधी उलट बोलायचा म्हणून माझी खूप चिडचिड व्हायची. मला वाटायचं, याला माझ्या कष्टाची किंमत नाही. पण तो माझे
संस्कार विसरला नाही, माझे डोळे पाण्याने
भरले, यशस्वी भवः त्याला आशीर्वाद दिला. "बाबा,
बँगलोरला पोहचले असतील का?” नील शूज घालताना विचारात होता. "मी फोन
करून विचारते," मी त्याला म्हणाले.
नील तर १० वीत होता मग अचानक interview,
म्हणजे देवाने माझी इच्छा पूर्ण केली. मी खुश
झाले.
तेवढ्यात नम्रता म्हणाली,"
आई, मी बादलीतले कपडे वॉशिंग मशीनला लावले आहेत, पोळीवाल्या मावशी अजून आल्या नाहीत का? काही हरकत नाही, डबा देऊ नको फक्त खायला दे, मी कॉलेजमधून project करण्यासाठी लवकर घरी येणार आहे." मी तिच्याकडे
आश्चर्याने पहातच राहिले. कालपर्यंत craft साठी मदत मागणारी नम्रता आज स्वतः कॉलेजचे project करणार होती म्हणजे नक्कीच १० वर्ष आयुष्य पुढे गेले,
तो phase गेला, मी आता शांत झाले,
नो चिडचिड, नो मूड स्विंग. मी खुशीत आवरून निघाले.
रस्त्यावर उभी राहिले पण रिक्षा एक आणि passenger
दोन, माझ्या मनात धावायचा विचार आला, पण नको, मी हळूहळू साठीकडे झुकणार, नकोच असा विचार करून मी थांबले. बहुतेक समोरचा gentleman
होता. त्याने रिक्षा माझ्याकरिता सोडली. कदाचित
त्याला माझे पांढरे केस बघून वयाचा अंदाज आला असावा. मी रिक्षा घेऊन स्टेशनला
पोहचले. नेहमीप्रमाणे ट्रेन उशिरा धावत होत्या. पण मी ठरवले, वयोमानानुसार हाडे मजबूत नसतात, उगाच hurry करण्याच्या नादात worry व्हायला नको. गर्दी कमी होण्याची वाट पाहूया, थोडं late झाले तर कुठे बिघडले! आणि काय आश्चर्य! रिकामी Ac ट्रेन आली, पटकन चढले आणि वेळेत ऑफिसला पोहचले. माझी बिलकुल चिडचिड
झाली नाही, मला माझ्यातील बदल जाणवला cool.
साहेबांनी सांगितलेले काम पूर्ण
करून त्यांच्या टेबलवर ठेवले, साहेब खुश झाले.
"अरे वा! मॅडम तुम्हीं अजूनही energetic
आहात good," साहेब म्हणाले. आता तर माझी खात्री झाली, काळ पुढे गेला आहे. ऑफिसमध्ये सगळ्यांशी हसून
बोलले. माझ्या सिनियर मालती मॅडम एकट्याच राहतात, आज त्यांना म्हणाले," मॅडम, गुलाबी रंगाची साडी
तुमच्यावर शोभून दिसते,” माझी comment
ऐकून त्यांचा चेहरा खुलला.
सखाराम शिपायाने टेबलवर चहा आणून
ठेवला तेव्हा त्याची आस्थेने चौकशी केली. आमचे हेड क्लार्क सावंत, यांनी अकाऊंटच्या कामात मदत कराल का? असे मला विचारताच मी आनंदाने होकार दिला. मला
आता चांगले rating मिळवायचे आहे,
रिटायरमेंटच्या अगोदर एखादे प्रमोशन मिळेल.
शैलाला आवर्जून सांगितले,
काही मदत हवी असेल तर सांग, मी नक्की करीन, नुसत्या बोलण्याने देखील माझ्या मनाला कमालीचे समाधान
वाटले. लंच नंतरचा वेळ मी हसत-खेळत काम करण्यात घालवला. आज मला ऑफिसमधून निघताना
थकल्यासारखे जाणवत नव्हते, उलट चिडचिड न
केल्यामुळे मला फ्रेश वाटत होते.
नेहमीप्रमाणे ट्रेनचा प्रवास गर्दीचा होता पण मी न चिडता केला कारण मी आता cool
झाले आहे. संध्याकाळी घरी जाताना दूध, भाजी विकत घेतली. मार्केटमधील मंदिरात भजन चालू
होते. घरी जाताना मी नेहमी बाहेरून नमस्कार करायची, आज ठरवले, कधीतरी मंदिरात
भजनाला देखील जायचे. मंदिराच्या पायरीजवळ उभी राहून प्रार्थना केली, भगवंता, क्षणार्धात इच्छा पूर्ण केलीस, माझी spiritual power वाढव. तेथून भजन गुणगुणत मी घरी पोहचले.
आज सकाळपासूनचा दिवस खूप आनंदात
गेला. चहाचा कप घेतला आणि गॅलरीतील झोपाळयावर बसले. मला एक गोष्ट प्रकर्षाने
जाणवली की, जसा कालचा दिवस होता तसाच आजचाही आहे, माणसांची ये-जा, गाड्यांचे आवाज, दुकानांतील गर्दी, रिक्षांच्या रांगा
.....१० वर्षात काहीच बदलले नाही, फक्त वय वाढले. चहा
पिताना विचार केला, आता मुलांच्या
अभ्यासाची जबाबदारी कमी झाली आहे तर एखादा छानसा पदार्थ जेवायला बनवते, मी मोबाईलवर शोधू लागले. रात्री जेवताना
सर्वांनी तो पदार्थ आवडीने खाल्ला, मला खूप बरे वाटले.
Every weekend ला असाच एखादा
छानसा पदार्थ बनवून सर्वांना खायला घालायचा, मी मनाशी ठरवले. किचनमधील सर्व काम आटोपले.
पुस्तकांच्या कपाटातून मला
वाढदिवसाला गिफ्ट मिळालेले पुस्तक बाहेर काढले. वाचन माझा आवडता छंद, मी इतकी वर्ष का दुर्लक्ष केले? यापुढे वाचनाचा आनंद घ्यायचा, दिवसातून २० मिनिटे तरी वाचन करायचे, अशी मनाशी खूणगाठ बांधली. सर्वांना गुड नाईट
बोलले आणि झोपायला बेडरूममध्ये गेले.
नेहमीप्रमाणे रात्री झोपताना
देवाला नमस्कार केला व म्हणाले," देवा, आयुष्य वाढले, माझी maturity वाढली, आज चिडले नाही दिवस मजेत घालवला." देव
हसला व म्हणाला," १० वर्ष आयुष्याची
वाढली म्हणून तू शांत झाली नाही का? पण मागील १० वर्षात दुःखाच्या क्षणांबरोबर सुखाचे क्षणही साजरे करायचे राहून
गेले.” तुझ्या मुलाला १० वीत चांगले मार्क्स मिळणार होते त्याचे celebration
राहून गेलं, काही शारीरिक कुरबुरी, आजारपण टळले पण त्याचबरोबर मुलीला scholarship मिळणार होती त्याचा आनंदही राहून गेला आणि या
इच्छेच्या गडबडीत तुझी Bangalore silk साडीही राहून गेली.
साडीचे नाव ऐकताच माझा चेहरा
झर्रकन उतरला. देव पुढे म्हणाला," थोडक्यात काय, सुखामागून दुःख आणि
दुःखामागून सुख हे चक्र चालूच राहणार, माझं स्मरण ठेवलं तर त्रास जाणवणार नाही."
"देवा, आता बोलून काय उपयोग? १० वर्ष तर निघून
गेली पण यापुढील आयुष्य मी आनंदात घालयावचा प्रयत्न करीन", मी म्हणाले. "निकिता, बरोबर बोललीस वय म्हणजे फक्त नंबर, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन महत्वाचा तो
सकारात्मक असावा," देव म्हणाला. देवा,
यापुढे लक्षात ठेवीन, असे म्हणून मी झोपले.
सकाळी ६ चा गजर वाजला. मी
उठले, केस बांधले, तोंड धुतलं, तोंड पुसताना सहज
आरशात पहिले तर केस पांढरे झालेले दिसले. देवाला प्रॉमिस केले आहे की, यापुढील आयुष्य आनंदात घालवीन, त्याप्रमाणे वागले पाहिजे. तेवढ्यात फोनची रिंग
वाजली. मी कॉल receive केला, पलीकडून नवरा बँगलोर एअरपोर्ट वरून बोलत होता.
नितीन म्हणाला,"निकिता केस...” मी
त्याला थांबवत म्हणाले," हो, केस खूप पांढरे झाले आहेत, weekend ला hair-dye करते, १० वर्ष वाढली आहेत
ना!" तोओरडलाss ,"काय म्हणाली? १० वर्ष आज सकाळी
आवरताना चुकून पावडर तुझ्या केसांवर सांडली, झटकण्याचा विचार केला पण तुझी झोपमोड झाली असती म्हणून
विचार कॅन्सल केला." आता तू उठली असशील म्हणून फोन केला की, केसांतील पावडर साफ कर, नाहीतर ऑफिसमधील तुझे colleague हसतील व म्हणतील, मॅडम एका दिवसात इतके केस पांढरे कसे काय झाले? 😄आणि मी रात्री १० वाजता जेवायला येतोय, तुझी Bangalore silk साडी घेऊन, काहीतरी स्पेशल बनव,
bye sweetheart.
मी आरशात बघून केस साफ करू लागले
व हसत गुणगुणू लागले,
जीवनगाणे गातच रहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे ......

Khoop sundar katha. Manala sparshun geli. Mast 👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद 🙂
हटवा"चाळीशीतली वादळ” खूपच relatable आणि मनाला भिडणारी आहे 👍
उत्तर द्याहटवावास्तव आयुष्याचं सुंदर चित्रण आणि साधी, प्रभावी लेखनशैली आवडली.
चाळीशी म्हणजे फक्त वय नाही, तर स्वतःला नव्याने ओळखण्याचा काळ असतो — हे तुमच्या लेखातून स्पष्ट जाणवतं. जबाबदाऱ्या, नातेसंबंध आणि स्वतःसाठी थोडा वेळ काढण्याची गरज याचं छान चित्रण केलं आहे.
अशाच वास्तवाला स्पर्श करणाऱ्या आणि विचार करायला लावणाऱ्या कथा पुढेही वाचायला मिळाव्यात ही अपेक्षा 🙌
उत्स्फूर्तपणे मिळालेली दाद मनाला आनंद देऊन जाते. मी लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन, धन्यवाद.
हटवातृप्ती तू छानच परफेक्ट लिहिले आहेस असेच वास्तववादी लिहित जा प्रेरणादायी लिही
उत्तर द्याहटवामी लिहिण्याचा प्रयत्न करीन ताई, धन्यवाद
हटवावाचता वाचता, मी गोष्टीत रमले मस्त
उत्तर द्याहटवावा! छान धन्यवाद
हटवा