मला देव भेटला तर .........

लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर 



       मित्रांनो ,माझ्या आजोबांकडे गोष्टींचा खूप मोठा साठा आहे ,रोज रात्री झोपतांना ते मला छानशी गोष्ट सांगतात . काल नेहमीप्रमाणे आजोबांनी रात्री झोपतांना मला पांडुरंगाची गोष्ट सांगितली ,गोष्ट ऐकता ऐकता मी कधी झोपलो कळलेच नाही . अचानक मला पांढरा शुभ्र प्रकाश दिसू लागला ,म्हणून डोळे चोळून पाहू लागलो तर पांडुरंग कमरेवर हात ठेऊन विटेवर उभा होता. मी थोडासा घाबरलो ,चाचपडत म्हणालो खुर्चीवर बसा ,तसा तो हसून म्हणाला नको ,नको मी विटेवरच ठीक आहे . 

       माझा काही विश्वास बसेना ,देव, चक्क माझ्यासमोर ! तसा तो हसत म्हणाला "विश्वास बसत नाही का रे तुझा ?" तुला पाहिजे ते माग ,एका क्षणार्धात आणून देईन. मनात विचार केला ,बघूया तर मागून, मिळाले तर मज्जाच मज्जा... मी म्हणालो चॉकलेट बॉंक्स ,क्रिकेट किट ,फुटबॉल, सापशिडी ,कॉम्पुटर गेम. देव म्हणाला ,अरे थांब थांब! हे सारं तुझ्या हातात मावेल का ? कारण जमिनीवर पडलं तर नष्ट होईल आणि तुझे हात तर चिमुकले आहेत . मला ना  आजोबांनी सांगितलेली "लोभी माणसाची गोष्ट" आठवली. अती लोभ नसावा देवा, मला तू चॉकलेट बॉक्स आणि फुटबॉल ह्या दोनच गोष्टी दे ,अगदी दुसऱ्या क्षणाला माझ्यासमोर त्या दोन गोष्टी हजर होत्या. वा...... म्हणजे तू खरंच देव आहे ! पटलं ना आता तुला ! 

       देवा, तू काहीही करू शकतोस ना ! मग माझ्या घरातील भांडणे थांबव ना ,कधी कधी आई ऑफिसमधून येताना चिडलेली असते मग त्या दिवशी तर मला धपाटाच मिळतो . मला ना भांडणाची खूप भीती वाटते देवा ! प्लिज काहीतरी कर ना ? आजोबा म्हणतात "तू जादूगार आहे" ,तुला काहीच अशक्य नाही. 

     देव गोडं हसला आणि बोलला," तू रोज सकाळी आईबाबांबरोबर मनापासून माझी प्रार्थना कर,मात्र प्रार्थना रोज व नियमित झाली पाहिजे,मग चमत्कार बघ ,घरात शांतता व आनंद नांदेल . मी आजपासूनच प्रार्थना सुरु करेन देवा ,प्रॉमिस . देवाने हात पुढे केला ,मी हातातील वस्तू सांभाळीत कसाबसा हात पुढे केला, इतक्यात फुटबॉल हातातून निसटला, तो पकडायला गेलो तर धपकन पडलो . आई ,आई म्हणून किंचाळलो ,डोळे उघडून बघतो तर काय! देव नाही आणि फुटबॉल पण नाही . हळूच उठलो ,देवघरात पूजा करत असलेल्या आजोबांच्या कानात सांगितले की तुम्ही पूजा करत असलेला पांडुरंग मला खराखुरा भेटला पांडुरंग ,पांडुरंग .....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जमलं रे जमलं

An Evening in SwargLok

जादूची डायरी.... ✍