आणि माझा . . . झाला
लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर
चला , चला तयार व्हा , आता तुम्हांला मृत्युलोकात जायचे आहे , देवदूत आम्हां सर्वांना सूचना देत होता , फुलांनी सजवलेले विमान तयार होते . देवाने आम्हां सर्वांकडे एकवार प्रेमाने पहिले आणि ' निघा ' अशी खूण केली . दाराजवळ उभा असलेला देवदूत आम्हांला झोळी देऊन विमानात बसा, असे सांगत होता. मी माझी झोळी घट्ट पकडून विमानात बसलो . एकामागून एक विमानात झोळी घेऊन बसत होते , सर्वजण बसल्यानंतर विमानाचा दरवाजा बंद करण्यात आला आणि Take off हे शब्द ऐकू आले . आम्हीं सर्वजण सारखेच दिसत होतो , जणू काही परमेश्वराची लेकरे , पण प्रत्येकाची झोळी मात्र वेगवेगळी होती . सर्वांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्नचिन्ह होते , देवाने झोळीमध्ये काय दिले असेल ? मी बाजूला बसलेल्याकडे पहिले , त्याची झोळी मोठी होती म्हणजे देवाने त्याला काहीतरी जास्त दिले असणार , मग मला का नाही दिले ? 😡 त्याची झोळी मला मिळाली तर .....
अचानक विमान हेलकावे खाऊ लागले , विमानात गोंधळ उडाला , lights off झाले , थोड्यावेळात विमान स्थिर झाले. मी थोडासा घाबरलो , पुढे काय विपरीत तर घडणार नाही ना ! याचा विचार करू लागलो असता , एके ठिकाणी विमान थांबले , दरवाजा उघडला गेला , झोळी घेऊन उतरा असे काहींना सांगण्यात आले , मग दरवाजा बंद झाला आणि विमान पुन्हा हवेत झेपावले . विमानातून उतरवताना, देवदूत forehead scan करून त्याप्रमाणे पाठवत होता . आता माझा नंबर येणार , मी झोळी घट्ट पकडली आणि पुढच्याच क्षणाला , बाळाच्या रडण्याचा आवाज , शाम्या तुला मुलगा झाला , पेढे दे, सर्वांना आनंद झाला.
शाम बायकोकडे बघत म्हणाला , " मी बाप झालो ".
गाव तसं छोटसं , शे-दीडशे वस्तीचे, कोकणात डोंगराच्या पायथ्याशी वसलेले, फुलझाडांनी बहरलेले, ओढ्याजवळ आंब्याची वनराई, मातीची टुमदार घरे आणि नदीचे थंडगार पाणी झुळझुळ आवाज करीत वाहत असे , असे हे शिरपूर गाव, शांत आणि सुंदर होते. गावात काही शेतीचा व्यवसाय करीत, काही फुलांची लागवड करीत तर काही तालुक्याला कामाला जात. रामा आणि शाम हे दोघे वाळू व्यावसायिक होते , रामा गाढवांवर नदीकाठची वाळू लादून आणायचा, मग शाम ती वाळू ट्रकमध्ये भरून शहराकडे घेऊन जायचा. हा त्यांचा धंदा मागील सात-आठ वर्षांपासून सुरु होता.
शाम बाळाच्या येण्याने गडबडीत होता , मागच्या आठवड्यात तो ट्रक घेऊन शहराकडे देखील गेला नव्हता . न्याहारी करताना तो विचार करू लागला की , आता जबाबदारी वाढली , खर्च वाढला ,धंदापण वाढवायला पाहिजे , रामाला आणखी एक गाढव विकत घे असे सांगतो . चहा पिताना त्याची नजर घड्याळाकडे गेली , अरे ! नऊ वाजायला आले , तरी रामाचा पत्ता नाही . पोरगं माझ्याकडे जन्माला आलं आणि उशीर ह्याला होतोय, शाम रागाने पुटपुटला.
तेवढ्यात शामला गाढवांचा आवाज आला , रामा आला, असे म्हणून तो चटकन बाहेर आला . रामा म्हणाला ," भावा , जरा गडबडीत होतो , माझ्या गंगीला शिंगरू झाले , एक गाढव मदतीला आले ".
शाम्याने बायकोकडे पहिले आणि तिने सासूकडे पहिले . त्यावर शाम्याची आई म्हणाली ," लेका , देव एकावेळी अनेकांना जन्म देत असतो , जसे माणसे, प्राणी ,पशू , पक्षी, कीटक अगदी झाडांनापण , भगवंताला जीवसृष्टी चालवायची आहे , त्याला सगळ्यांची गरज आहे , फक्त फरक एवढाच की , प्रत्येकाची झोळी वेगळी".
आई, झोळी म्हणजे काय ? शाम्याची बायको सासूला विचारू लागली .
त्या म्हणाल्या ," मान /अपमान , श्रीमंत /गरीब , चांगले/ वाईट प्रसंग , हुशारी /मूर्खपणा , जास्त /कमी आयुष्य ह्या सर्व गोष्टी तो झोळीत घालून , ती झोळी आपल्याबरोबर देतो , झोळीतील गोष्टी संपल्या , झोळी रिकामी झाली की, तो आपल्याला घेऊन जातो ".
म्हणजे , देवाने जे जे झोळीत दिले असेल , तसं तसं आपल्या आयुष्यात प्रसंग घडतात , श्यामची बायको बोलली.
"हो, अगदी दिल्याप्रमाणे, त्यात जराही बदल नाही," श्यामची आई हसत म्हणाली.
शाम शहराकडे जाण्यासाठी घरातून बाहेर पडला , पण झोळी हा विषय त्याच्या डोक्यातून जात नव्हता , म्हणजे माझ्या पोराप्रमाणे गंगीच्या पोराला पण झोळी मिळाली असणार ... गंगीच्या पोराच्या झोळीत काय असणार ? शाळा लिहिली नसणार , हुशार नाहीच मुळी , पैसा कमवायची अक्कल शक्यच नाही , मग त्याच्या झोळीत काय असेल बरं ! उकिरडे धुंडाळणे अन गाढवपणा करणे , श्याम स्वतःशीच हसला आणि पुढे गेला .
दिवसामागून दिवस आणि रात्रीमागून रात्र सरत होती , श्यामच्या पोराप्रमाणे गंगीचे पोरगं देखील मोठं होत होतं, पण रामा जसा खुश होता तसा श्यामच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता .
आज सकाळी लवकर रामा शामकडे पोहचला , शाम चहा घेत होता त्याने रामाला चहा घ्यायचा आग्रह केला . रामा चहा पिताना सांगू लागला की, गंगीचं पोरगं लई हुशार आहे , एकदा नदीचा रस्ता बघितला नि आता बरोबर त्या दिशेला चालतो , बाकीच्या गाढवांना ओरडत नदीच्या दिशेला वळवायला लागते , जर का ते माणसाच्या जातीत जन्माला आलं असतं, तर बेट्याची वाहवा झाली असती !
तेवढ्यात शाळेचे बावधने सर श्यामकडे आले . सरांना बघताच श्याम घाबरला , सकाळीच सर घरी आले , काय झाले ? माझं पोरगं शाळेला आलं नाही का ? शाम्याने सरांना विचारले .
"सोहम रोज शाळेत येतो, पण वेळेवर नाही," सरांनी सांगितले.
का बरं ! घरातून तो वेळेवर निघतो , श्यामची बायको सरांना बोलली .
"प्रार्थना झाली व पहिला तास संपला की, तो शाळेत हजर होतो, त्याला उशिरा येण्याचे कारण विचारले पण तो काहीच सांगत नाही, म्हणून आज तुम्हांला विचारायला आलो," सर म्हणाले.
श्याम व त्याची बायको एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले .
चहा पिऊन सर निघून गेले . श्याम चिडला आणि बायकोला म्हणाला , "गंगीच्या बाळाला एकदा सांगितल्यावर कळते मग तुझ्या बाळाला का कळत नाही ? उकिरडे धुंडाळत जातो का शाळेला ? . . . कुठला”!
बरं , उद्यापासून मी त्याला शाळेत सोडायला जाईन आणि येताना फिरून येईन , शाम्याची आई बोलली आणि तो विषय संपला.
शाळेत देखील तो अभ्यासात यथा-तथा होता, श्याम लेकाला ओरडायला लागला की, आजी जवळ करायची. ती बोलायची, अरे, अभ्यासात हुशार नसला म्हणून काय झाले ? तो खेळात नाव कमवेल, आता कबड्डी, खो-खो या खेळांना देखील महत्व आहे. जानेवारी महिन्यात, शाळेत खेळांच्या स्पर्धा चालू होतील, त्यामध्ये माझा नातू एखादे बक्षीस नक्कीच जिंकेल.
आईच्या या बोलण्याने श्याम मनोमन खुश झाला.
शाळेत स्नेह संमेलन , खेळांच्या स्पर्धा याचा सिझन सुरु झाला . मौजेचा महिना सुरु झाला , मुला-मुलींनी Chocolate Day साजरा करायचा ठरवले .
काही मुलींनी एकमेकींना चॉकलेट देऊन friendship साजरी केली तर काही मुला-मुलींनी एकमेकांना चॉकलेट देऊन त्यांच्या भावना व्यक्त केल्या .
राणी , सोहमची वर्गमैत्रीण , तिने त्याला लाजत चॉकलेट दिले , पण त्याचा चेहरा निर्विकार होता .
तू चॉकलेट का दिले ? सोहम तिला विचारू लागला . त्याच्या या प्रश्नावर वर्गमित्र हसू लागले .
सोहमने चॉकलेट खाल्ले आणि चॉकलेटचे रॅपर तिला कचऱ्याचा डब्यात टाकायला सांगितले व तो निघून गेला. तिने रागाने त्याच्याकडे पहिले आणि पुटपुटली की , हा म्हणजे अगदी . . . आहे.
संध्याकाळ झाली , श्याम नुकताच तालुक्याला जाऊन आला होता , त्याने सोहमची चौकशी केली . तो मित्रांबरोबर खेळायला गेला आहे असे बायकोने सांगितले आणि ती चहा करायला स्वयंपाकघरात गेली.
श्यामचे व्हरांड्याकडे लक्ष गेले , सोहमचे मित्र त्याला दिसले . त्याने पटकन एकाला हाक मारली तसा तो श्यामसमोर आला . श्यामने त्याला विचारले , " सोहम कुठे आहे " ? तो तुमच्याबरोबर खेळायला आला होता ना!
त्याचा मित्र म्हणाला ," काका , तो खेळायला आमच्याबरोबर येतो पण खेळ सुरु झाला की , ओढ्याकडे वळतो".
ओढ्याकडे का बरं ? श्यामने विचारले .
तो हसला. "काय झाले हसायला" ? श्यामने रागाने त्याला विचारले .
ओढ्याजवळ गाई -गुरे पाणी प्यायला येतात आणि सोहम त्यांच्याबरोबर खेळतो , असे सांगून तो पळाला .
श्याम विचारात पडला , सोहम असा का वागतो ?
श्यामला चहा देताना त्याची बायको म्हणाली ," का बरं आपलं लेकरू असं वेड्यासारखं वागतं , धड अभ्यास करत नाही की, धंदा पण शिकत नाही, कसं व्हायचं ह्याचं ? देवाने त्याला कमी बुद्धी दिली आहे का" ?
"ए वेडे कमी किंवा जास्त बुद्धी असा प्रकार नसतो, देव सर्वांना समान बुद्धी देतो," श्याम म्हणाला.
मग पोरगं माणसं सोडून गाई -गुरांबरोबर का रमते ? तिने रडत विचारले.
दोघांची बाचाबाची सुरु झाली . तेवढ्यात श्यामची आई देवळातून परत आली . ती म्हणाली," उगाच चिंता करू नका , आपण एक पूजा करूया , देव सर्व काही ठीक करेल”. ते दोघेही तयार झाले .
श्यामची बायको म्हणाली , " परीक्षा संपल्यात , सुट्टी सुरु होईल , लगेचच पुढच्या आठवड्यात पूजा ठेवूया" .
त्या तिघांच्या चर्चेनंतर असे ठरले की , व्हरांड्यात ऐसपैस जागा आहे , तिथे पूजा मांडूया , लोक दर्शनाला येतील व बाहेरच्या बाहेर जातील , उगाच घरात गोंधळ नको , पूजेला सोहमला बसवूया , म्हणजे त्याला देवाचा direct आशीर्वाद मिळेल.
ठरल्याप्रमाणे तयारी सुरु झाली . श्यामने फळे , फुले , पूजेचे सहित्य सारे काही आणले, प्रसाद देण्यासाठी केळीचा घड आणला . सोमवार पूजेसाठी ठरवण्यात आला , सकाळीच पूजा सुरु झाली , सोहम भटजींनी सांगितल्याप्रमाणे पूजा यथासांग करत होता , घरातील मंडळी त्याच्या बाजूला बसली होती . तेवढ्यात एक गाढव चरत चरत व्हरांड्याजवळ येत होते , गाढव केळी खाईल या भीतीने श्याम उठला व काठी घेऊन गाढवाला मारायला धावला.
' थांबा' असा सोहमचा आवाज आला. श्यामला कळेना, सोहमला जनावरांसाठी इतकी भूतदया का आहे?
सोहम शांत होता आणि गाढव हसत होते .
घरातील मंडळींना कळेना , नेमकं काय चालले आहे ?
सोहम गाढवाला म्हणाला ," थांब मित्रा ".
श्याम चिडला व म्हणाला ," गाढवाला मित्रा म्हणतोस , कोण आहे हा" ?
"हे गंगीचे शिंगरू आहे ", सोहम शांतपणे म्हणाला.
तो पुढे म्हणाला," आज सर्वांना सत्य कळले पाहिजे, परमेश्वरासमोरबसून मी खोटं बोलू शकत नाही, या मृत्युलोकात आम्हीं दोघे एकत्रच आलो, विमानात हा माझ्या बाजूला बसला होता, पण ह्याची झोळी आकाराने मोठी होती, देवाने त्याला जास्त दिले या ईषेपोटी मी झोळीची अदलाबदल केली, पण ती झोळी म्हणजे आपले 'नशीब', हे मला ठाऊक नव्हते”.
घरातील मंडळी सोहमकडे आश्चर्याने पाहू लागली , कारण आज पहिल्यांदा तो व्यवस्थितपणे सांगत होता .
" प्रत्येकाने आपापल्या झोळीचा आनंद घ्यावा, दुसऱ्याकडे असूयेने पाहू नये, दुसऱ्याच्या झोळीकडे लक्ष दिले की, माणसाचा गाढव होतो," सोहम शांतपणे म्हणाला.
म्हणजे
,
जे
जे गंगीच्या पोराला मिळाले
,
ते
ते आता तुझ्या बाबतीत घडणार
तर ! श्यामची
बायको बोलली.
गाढवाने
hee
-haw म्हणून
तिच्या म्हणण्याला दुजोरा
दिला .
हे ऐकून श्याम मटकन खाली बसला .
अतिशय सुंदर गोष्ट. 👌👌👌
उत्तर द्याहटवाअभिप्रायाबद्दल धन्यवाद .
हटवाKhup chan writing keli aahe life ch sar short n sweet madhe saglita aahe
हटवाधन्यवाद . ठरलं तर मग ! आनंद लुटायचा 😊
हटवाKhup chaan, keep it up, looking for more
उत्तर द्याहटवाThanks for the motivation
हटवाखूप छान संदेश या गोष्टीतून मिळतो खूप छान लिहिले आहे
उत्तर द्याहटवाअभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद . त्यामुळे लिखाणास स्फूर्ती मिळते 🙏
हटवागोष्ट खूप सुंदर आहे. Keep it up...
उत्तर द्याहटवाप्रोत्साहन दिल्याबाद्द्दल धन्यवाद 🙏
हटवानेहमीप्रमाणेच खूप सुंदर !!! छान गोष्ट आहे ..
उत्तर द्याहटवाThanks for regular reading the story
हटवाआयुष्याचा समतोल सांगण्याचा प्रयत्न. सुरेख लिखाण.
उत्तर द्याहटवाएक छोटासा प्रयत्न , धन्यवाद 🙂
हटवा