स्वच्छता....... एक सामाजिक उपक्रम

 

       लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर

        चौथीचा वर्ग चालू आहे, तिसरा सायन्सचा तास सुरु होणार, भोळे बाई येतील म्हणून मुलामुलींनी पुस्तके, वह्या बेंचवर काढून ठेवली. भोळे बाई म्हणजे कडक शिस्त, स्वच्छता, नीटनेटकेपणा त्यामुळे वर्गात बाईंचा दरारा असायचा.

           इतक्यात शिपाई वर्गात आला, भोळे बाई आज आल्या नाहीत, पिरियड ऑफ आहे, असे सांगून निघून गेला. व्वा! एकच गलका, ग्राउंड वर जाऊया का? काय काय खेळूया? खो-खो, फुटबॉल, पकडा-पकडी, मुलांचे प्लॅनींग सुरु झाले. एवढ्यात ताईसारखी दिसणारी मुलगी वर्गात आली, "आज मी तुमचा सायन्सचा तास घेणार आहे", ती म्हणाली. आमचे चेहरे हिरमुसले. तशी ती हसत म्हणाली, "घाबरू नका, अभ्यास घेणार नाही, एक छानशी गोष्ट सांगणार आहे, खेळ नाही तर निदान गोष्ट तरी चालेल ना"! तिने विचारले. हो, एका सुरात आम्हीं ओरडलो. 

     ती हसत म्हणाली, "तुमचा वर्ग किती छान आहे, पुस्तके, वह्या बेंचवर व्यवस्थितपणे ठेवल्या आहेत, सर्वजण शिस्तीत बसले आहेत , फळ्यावर तासाचे नाव, शिक्षिकेचे नाव सुंदर अक्षरांत लिहिले आहे, तुम्हां सर्वांना स्वच्छता, नीटनेटकेपणा आवडतो का" ? भोळे बाईंना आवडतो ,सर्वजण ओरडले. आणि तुम्हांला स्वच्छता आवडत नाही का ? तिने हसून विचारले . सर्वजण चिडीचूप  बसले.

    बरं, मी आज तुम्हांला माझ्या लहानपणीची गोष्ट सांगणार आहे, मुलांनी कान टवकारले. माझे बालपण गावात गेले, तिथे एक मोठा वाडा होता, वाड्यात सात-आठ घरे होती. आम्हीं सर्व मुलं-मुली एकत्र खेळायचो. "आम्ही पण रोज खेळतो" मीनू म्हणाली. "व्हेरी गुड",ती हसून म्हणाली. आमच्या वाड्यासमोर रोज सकाळी एक घंटा गाडी यायची, त्यावर लिहिले होते 'माझा खाऊ, मला दया'  खाऊ आणि कचरा ,मला कोडं वाटायचं. उन्हाळ्याच्या सुट्टीत, एके दिवशी आजोबा आम्हां सर्वांना फिरायला घेऊन गेले. एका डोंगराजवळ आम्हीं पोहचलो पण तेथे सर्वत्र दुर्गंधी पसरली होती, माश्या घोंघावत होत्या, आजूबाजूला कचरा दिसत होता. आजोबा, असा, कसा हा डोंगर ? माती नसून कचरा दिसत आहे, मी विचारले.

     "हा नैसर्गिक डोंगर नाही, कृत्रिम डोंगर आहे, मानवनिर्मित डोंगर आहे", आजोबा हसून म्हणाले. म्हणजे काय ? आम्हीं सर्वांनी आश्चर्याने विचारले. आपण सर्वजण जो कचरा टाकतो, तो कचरा सफाई कामगार उचलतात आणि येथे आणून टाकतात, हळूहळू कचरा वाढत वाढत जाऊन त्याचा डोंगर तयार झाला आहे, आजोबांनी सांगितले. 'कचऱ्याचा डोंगर' आम्हीं सर्वांनी कुतूहलाने विचारले. आजोबा पुढे म्हणाले, " पाहिलेत का? आजूबाजूला माणसे राहतात, त्यांना किती त्रास होत असेल? सततची दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य, पावसाळ्यात कचरा वाहून चहूकडे पसरतो, त्यामुळे परिसरातील लोकांना आजारपणाला सामोरे जावे लागते". मग ते लोकं मास्क का वापरत नव्हते? राजूने  तिला विचारले. कोरोना काळात सतत मास्क लावणे तुला आवडत होते का? तिने विचारले. राजूने मान हलवून नकार दिला. मग, पुढे काय झाले? प्रियाने विचारले.  

    "सांगते ना! अजून गोष्ट संपायची आहे",ती हसून म्हणाली. आम्हीं सर्वांनी आजोबांना विचारले, पण आता काय करणार? तुम्हीं कोणकोणती खेळणी वापरता? आजोबांनी आम्हांला विचारले. बॅट-बॉल, बॅटमिंटन, किचन-सेट (लाकडाचा/स्टीलचा), बाहुली, पत्ते, रिमोटची कार, आम्हीं सांगू लागलो. "पुरे पुरे",आजोबा म्हणाले. खेळतांना खाऊ पण घेताना? आजोबांनी विचारले. होss आम्हीं एका सुरात ओरडलो . वापरून वापरून तुमची खेळणी तुटतात, बाहुलीचे कपडे जुने होतात, फाटतात, मग हट्ट धरून आईकडून नवीन फ्रॉक शिवून घेता, खाऊ खातांना सांडत पण असेल नाही का? आजोबांनी पुन्हा विचारले. होय आजोबा, मग सर्व कचरा एकत्र गोळा करतो आणि कचऱ्याच्या डब्यात टाकतो,आम्हीं सांगितले. "बाळांनो कचरा गोळा करता, ही उत्तम गोष्ट आहे, पण त्याबरोबर तो वेगवेगळा करणे हे देखील गरजचे आहे", आजोबा म्हणाले.  म्हणजे काय हो आजोबा? सर्वांनी एकदम विचारले.

     बाहुलीचा जुना फ्रॉक, बाहुलीच्या वस्तू, कागद, फाटलेले पत्ते, प्लास्टिकच्या वस्तू, प्लासटीकच्या पिशव्या, थर्माकोलचे कप, धातू म्हणजे मेटलच्या वस्तू  हा झाला - सुका कचरा

      खायचे पदार्थ, फळांच्या साली, भाजीपाला, शिळे अन्न  हा झाला - ओला कचरा

     जर तुम्ही, असा कचरा वेगवेगळा केला तर सुका आणि ओला कचरा यावर प्रक्रिया करणे सोपे जाईल, त्यामुळे कृत्रिम डोंगर तयार होणार नाहीत आणि प्रदूषण पण वाढणार नाही, आजोबांनी सांगितले. मग त्यांनी सर्वांना चॉकलेट दिले व "चला निघूया आता, अंधार पडायला लागला आहे,"असे म्हणाले. चॉकलेट खाल्यावर आम्हीं सर्वांनी चॉकलेटचे रॅपर एका पिशवीत गोळा केले व जोरात ओरडून सांगितले - हा झाला सुका कचरा. "शाब्बास बाळांनो", आजोबा आनंदाने म्हणाले.

     बेल वाजली, तास संपला, तिने विचारले, मुलांनो तुम्हीं या गोष्टीतून काय शिकलात ? ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून आपला परिसर, घर आणि शाळा स्वच्छ ठेवणे, आम्हीं ओरडून सांगितले. पुन्हा कधी वर्गावर येणार गोष्ट सांगायला? मॉनिटरने विचारले. तिने भोळे बाईंचे नाव पुसून 'सीमा कदम' असे  फळ्यावर लिहिले. थँक्यू, आम्हीं आनंदाने म्हणालो.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जमलं रे जमलं

आणि माझा . . . झाला

चला, श्रीमंत होऊया ...! 💰