मी कोण होणार ……..

 

 लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर

     आज,  मला नवीन ठिकाणी आणले आहे , येथे फुलांची  सुंदर  सजावट केली  आहे , दिव्यांची रोषणाई आहे, रंगीबेरंगी फुगे लावलेले आहेत , खूप छान वाटत  आहे  देवा ! भिंतीवर पण काहीतरी लिहिलेले दिसतंय,  पण झाकलेले  आहे का बरं ? कळत नाही  मला . 

      बापरे  ! किती  ही  माणसे ! हॉस्पिटल नंतर आजच,  मी इतकी  माणसे बघत आहे. आजोबा हसत - खेळत कुणाबरोबर  बोलत  आहेत , बहुतेक  ते  त्यांचे मित्र असावेत . आजी पण सारखं माझा  सोनू , माझा  सोनू म्हणून ह्या लोकांना सांगत आहे,  कदाचित  ते  तिचे  नातलग  असावेत .  आई - बाबा  तर  लोकांच्या गराड्यातच  आहेत , मित्र - मैत्रिणी काय , नातेवाईक काय, नुसती  धमाल . काका जरा कामात दिसतोय , नाहीतर मला बघताक्षणीच शिटी मारतो , काय सागूं देवाss काकाची शिटी म्हणजे जणू काही कोकिळेची कुंजनच .   

      कुणीतरी कुजबुजतोय  शाळा ,शाळा. अडीच वर्षाचा झाला कि 'Play  group ' सुरु होईल , मग  कुठले बोर्ड ? State  , CBSE  , ICSE का  International ? एक  काकी  म्हणाली " माझा बाळ State Board ला आहे , दुसरे एक  काका  म्हणाले " माझी  छकुली CBSE ला  आहे . देवा ss   शाळा म्हणजे मुलांनी जायचे ठिकाण , हे  मला आज समजले , म्हणजे माझी पण रवानगी शाळेत होणारचं , नाही  का ! हे  आजोबा काय बरं  म्हणत आहेत , बाबा सारखा 'Engineer' होणार का आई सारखा 'CA' . बापरे किती मोठे शब्द ! काका सारखा 'Doctor' तरी  होशील का ? Doctor मला माहीत देवा ! कारण  त्यांच्याच मदतीने मी  आईच्या गर्भातून बाहेर आलो . शाळेनंतर पण पुढे शिकावं लागते, असं वाटतंय.  मला खूप  बुध्दी   दे,  हा  देवा ! please.   

     मला ह्या हातातून - त्या हातात , इकडून -तिकडे सारखे फिरवत आहेत , आवळणे - चिवळणे चालूच आहे , पुरता दमून  गेलो  मी  बुवा . तेवढ्यात एका छोट्या दादाने मला उचलून घेतले , त्याच्या हाताचा स्पर्श किती कोमल आहे , अरेच्या , हा तर मुलांचा घोळका आहे , माझेच दादा आणि ताई आहेत ना ते ! त्यांच्या   स्पर्शात मला  प्रेम , माया , काळजी  यांची  जाणीव झाली.  कुणी  माझ्या गालांचा पापा घेतंय  ,तर  कुणी माझा हात  आपल्या हातात घेऊन कुरवाळतोय ,माझ्याबरोबर फोटो काढण्यासाठी तर चढाओढच लागली आहे , मीही  खूप  मज लुटली  देवा , राहून - राहून वाटत होतं तू  हि  जर माझ्याबरोबर असता तर .....

     बाबा वर्गात 'topper ' होता तू पण तसाच हुशार होणार का ? असं कुणीतरी कुत्सितपणे विचारीत आहे कारण त्यांच्या हाताचा स्पर्श मला प्रेमाचा वाटत नव्हता , आपुलकीचा वाटत नव्हता . कुणी प्रेमाने माझ्याकडे बघत आहे, तर कुणी ईर्षेच्या भावनेने बघत आहे.   बघू , बघू  मोठा  झाल्यावर काय दिवे लावतो ते ! असे भाव काहींच्या डोळ्यात दिसत आहेत . मला भिती वाटू लागली आहे देवा ..  या जगात प्रेम करणारी तसेच निंदा करणारीही माणसे आहेत तर ! तू सदैव माझ्याबरोबर रहा , म्हणजे मी  निर्भय राहीन , निश्चिन्त राहीन. तुझ्याकडे कसं  सगळं  छानच छान, राग  नाही , निंदा  नाही फक्त  प्रेम आणि प्रेमच .     

    एवढ्यात आईने मला जवळ घेतलं ,गालावरून हात फिरवला ,बरं  वाटलं , अगदी सुरक्षित हातात आलो . मला सजवलेल्या पाळण्यात ठेवलं ,आत्याने कानांत कुर्रर्र केलं ,तसं झाकलेले नाव सर्वांसमोर आले  "सार्थक " म्हणजे आजपासून  मला या नावाने ओळखणार तर ! आत्याने माझ्यासाठी " लिबोणीच्या झाडामागे " हे गाणे गायले किती गोङ आवाज आहे  तिचा ! ऐकतच रहावं असं वाटत होतं . लोकांनी भेटवस्तूंचा अक्षरशः पाऊस पाडला , पण खरं सांगू का देवा !  तुझा आशीर्वादच मला लाखमोलाचा वाटला. जेवणाला सुरवात झाली , आई - बाबा सर्वांना आवर्जून विचारीत होते , सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला . आजी - आजोबांनी  सर्वांना हसून  निरोप  दिला .

     हॉल शांत झाला , आईने मांडीवर घेतले ,आजीने हातात काहीतरी घेतले व म्हणाली माझ्या सोनूची दृष्ट काढते ,काहीतरी पुटपुटत होती ,मला मजाच वाटली . आजी म्हणाली " माझ्या सोन्या , करिअर बनवायला देवाचा आशीर्वाद आणि आई - बाबांचे प्रयत्न असणारच आहेत, पण सर्वप्रथम तू  एक चांगली व्यक्ती हो . कर्तृत्ववान व्यक्ती होण्याअगोदर सुसंस्कृत व्यक्ती होणे हे  महत्वाचे आहे ,असे बोलून तिने डोळे भरून माझा गोडं पापा घेतला अगदी देवा तुझ्यासारखा .

     आता , मला झोप येत आहे देवा ... बरं तर मी  झोपतो , उद्या भेटूया , good night .       


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जमलं रे जमलं

An Evening in SwargLok

जादूची डायरी.... ✍