मी पाहिलेले .... भू sss त

 

 लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर

              आज  परिक्षेचा रिझल्ट लागला , मी सहावीतून सातवीत गेलो , आता मला स्कूलमध्ये NCC  हा विषय येणार , "खाकी रंगाचा युनिफॉर्म , शूज , कॅप  वा! मस्त आणि त्या युनिफॉर्म मध्ये मी शूरवीरासारखा दिसणार" मी म्हणालो. त्यावर बाबा म्हणाले " अहो राजे, लाईट गेली कि कळेलच कोण शूरवीर आहे ते ! घरातील सर्वजण खो -खो हसू लागले.  तेवढ्यात माझा मित्र राजू आला . राजू म्हणाला " माझे काका कोकणातून आले आहेत , ते आम्हांला छान छान गोष्टी सांगणार आहेत " तू  पण येतोस का ऐकायला ? मी घड्याळाकडे बघितले , रात्रीचे १० वाजले होते .  अरे , काळजी करू नको , १ तासात गोष्ट संपेल , राजू म्हणाला . मी मनात विचार केला , १ तास म्हणजे ११ वाजतील , म्हणजे आणखी रात्र होणार.  माझा चेहरा बघून बाबा म्हणाले " मी येऊ का तुला न्यायला "? आई किचन मधून बोलली " अहो , आता तर तो म्हणाला नां , कि मी शूरवीर आहे ते ! मग तुमचा विश्वास नाही बसत का ? आईच्या या बोलण्यावर मला आता जायलाच हवे होते . 

          " राजू थांब , मी येतो" मी म्हणालो . आम्हीं दोघे जण त्याच्या घरी गेलो, तोपर्यंत माझे दुसरे पाच - सहा मित्र तेथे आले होते .  राजूचे घर माझ्या घरापासून १५ ते २० मिनिटांच्या अंतरावर होते , त्याचे घर बैठे असून समोर मोठे अंगण होते . अंगणात आम्हां मुलांना बसायला सतरंजी अंथरली होती व काकांकरीता आरामखुर्ची ठेवली होती . राजूने आम्हां सर्वांची ओळख काकांना करून दिली तसेच काकांच्याबद्दल देखील माहिती सांगितली.  राजूचे काका बंदर खात्यात काम करत होते त्यामुळे त्यांची नोकरी गावापासून लांब बंदरावर असायची , रात्रीच्या वेळी विचित्र आवाज यायचे पण काका खूप धीट आहेत, ते कधीही घाबरले नाहीत. काकांची माहिती ऐकून सर्वांनी त्यांना 'भुताची गोष्ट ' सांगण्याची 'request' केली. बाहेर मिट्ट काळोख , रातकिड्यांचा किरर्रर्र  आवाज , आजूबाजूच्या परिसरात भयाण शांतता आणि त्यात भुताची गोष्ट माझी तर घाबरगुंडीच उडाली , पण सर्वांच्या हट्टापुढे माझ्यासारख्या पामराचे काय चालणार !    

         काकांनी घसा खाकरून गोष्ट सांगायला सुरुवात केली , पण माझे लक्ष तर हातावरील घड्याळाकडे होते .  आता १० वाजून २० मिनिटे झाली , गोष्ट संपायला ३० मिनिटे लागतील म्हणजे १० वाजून ५० मिनिटे होतील , बापरे ! त्यानंतर घरी एकटे जायचे.  पपू आणि केशव माझ्याबरोबर आहेत पण त्या दोघांचे घर पहिले येते पुढे १० मिनिटे मला एकटेच जायचे आहे. आजच मी फुशारकी मारली कि शूरवीर आहे आणि नेमका राजू पण आजच बोलवायला आला , मला दरदरून घाम फुटला.  "सर्वेश ठीक आहेस ना ! भिती वाटते का ?" काकांनी मला विचारले .  मित्र हसतील या विचाराने ' नाही काका , भिती नाही वाटतं , फक्त गरम होतंय असे मी म्हणालो.      

        पुढे काकांनी काय गोष्ट सांगितली मला काहीही माहीत नाही , माझे लक्ष फक्त देवाचा धावा करण्यात आणि घड्याळाचा काटा बघण्यातच होते. शेवटचे वाक्य मी ऐकले, काका सांगत होते " मुलांनो समजले नां आता , कि भुताचे पाय वाकडे असतात , हात फार लांब असतात , दात सुळ्यांसारखे लांब असतात ह्या सर्व भ्रामक समजूती आहेत, भूत देखील माणसांप्रमाणेच असते .  "चला , आता निघा , रात्र फार झाली आहे , काळजीपूर्वक घरी जा " काका म्हणाले.  तसे आम्हीं सर्वजण निघालो , बोलता, बोलता केशव आणि पपू  चे घर आले , मला ' Bye' करून ते दोघे घरी गेले .          

        आता  मी एकटाच घरी जायला निघालो , रस्त्यावर चिट-पाखरू नव्हते , मधूनच  कुत्र्याचे भुंकणे ऐकू येत होते , मी  जोरजोरात ' हनुमान चालीसा ' म्हणायला सुरुवात केली ' जय हनुमान, ज्ञान गुन सागर ' इतक्यात माझ्या कानावर अस्पष्ट आवाज ऐकू आला ' सर्वेश ... SS  थांब ss  मी .... प sss ण  येतो '. माझी ' solid ' टरकली , पळावे तर पायातील शक्तीच नाहीशी झाली. जमेल तसे 'fast ' चालण्याचा प्रयत्न करत होतो , पण ..... हळूहळू आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागला म्हणजे 'भूत ' माझ्या जवळ येत आहे हे नक्की . काका मगाशी म्हणाले " भूत देखील माणसांप्रमाणेच असते , अगदी बरोबर आहे, नाहीतर एव्हाना  'Horror  film' सारखे  भूत उडी मारून माझ्यासमोर आले नसते का ! हात लांब करून मला पकडले नसते का ! माझ्या घशाला कोरड पडली , मी  घराच्या जवळ जवळ पोहचलो होतो .  आता तर आवाज आणखी जोरात येऊ लागला , मी  मागे वळून पहिले तर पांढरे कपडे घातलेले , हात वारे करणारे , माणसांसारखे सरळ पाय असणारे फक्त 'दात' तेवढे दिसणारे 'भूत ' माझ्याजवळ येत होते .  माझी बोबडीच वळली आणि मी तिथेच बेशुद्ध झालो , पुढे काय घडले ? मला काहीच माहित नाही .  सकाळी उठलो  तेव्हा मी बेडवर होतो , आजीने  मला विचारले " बाळ , आता  बरं वाटतंय ना ! काल रात्री  आपल्या घरापाशी तू चक्कर येऊन पडलास.  मी आजीला हळूच म्हणालो " भूत बघितले ना , म्हणून घाबरलो.  सर्वजण जोरजोरात हसू लागले , आईने बेडरूमचा पडदा बाजूला केला , तसे ते भूत पुन्हा दिसू लागले , दिवसापण ' भूत ' दिसते आई , मी जोरात ओरडलो .

     अरे , वेड्या हा माझा चुलत भाऊ 'दामू' आजोबा म्हणाले . रंगाने फारच काळा , काळोखात तर ओळखू येईना म्हणून  लहानपणापासून तो  फक्त पांढरे कपडे घालतो , हा sss हा sss हा .  सगळयांच्या हसण्यात मी पण हळूच सामील झालो .


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जमलं रे जमलं

An Evening in SwargLok

जादूची डायरी.... ✍