बाप्पा ... . .. खोटं बोलायचं ??
लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर
तनय , हल्ली लिलया खोटं बोलतो आणि उघडकीस
आले कि " तो मी नव्हेच " असा त्याचा पवित्रा असतो . अगदी परवाचीच गोष्ट , कोथींबीर वड्या बनवल्या होत्या
. 'अंजू' माझी मैत्रीण , तिला आवडतात म्हणून
तनय बरोबर पाठवल्या . रात्र झाली, तरी तिचा
'message' नाही म्हणून मीच शेवटी 'message' पाठवला ' कोथींबीर वड्या पचल्या का ? ' तसा तिचा ' reply ' आला , कुणी केल्या ? मी
समजून गेले .
आमची
हि स्वारी मोठेपणी ' वकील ' बनते
का ' राजकारणात' जाते कुणास ठाऊक , पण
त्यासाठी लागणारा 'गुण' मात्र त्याच्याजवळ होता . प्रकाश , त्यांचे वडील , मला
गमतीने बोलतात, " दोघांचे ऍडमिशन तुझ्या 'school' मध्ये केलंय , आता 'शाबासकी' दयायची का ' शिक्षा ' दयायची , ते तूच ठरव
.
पुढच्या
आठवड्यात ' गणेश चतुर्थी ' म्हणजे ' गणपती बाप्पा ' घरी येणार . मी कंबर कसून कामाला लागली , साफ -सफाई , वाण-सामान,
फराळाचे पदार्थ यात मी गुंतले होते, तर मुलांच्याही उत्साहाला उधाण आले होते, गणपतीसाठी आरास बनवण्यात ते मग्न झाले होते.
गणेश चतुर्थीचा दिवस उगवला , गणरायाला
२१ मोदकांचा नैवेद्य, किचन मध्ये माझी धावपळ चालू होती, पण बाहेर,
तनयची मात्र भूक लागली म्हणून आरडाओरड सुरु होती .
आई , "पेट में चूहे दौड रहे हैं"
तनय म्हणाला . त्यावर तनया हसून म्हणाली " परंतु, चूहे तो गणेशजी के
साथ गये हैं", दोघांची शाब्दिक बाचाबाची सुरु झाली. माझा स्वयंपाक तयार झाला , लगेचच नैवेद्याचे ताट
भरले , "आधी देवाची आरती मग जेवण" मी घोषित केले.
सुखकर्ता दुःखहर्ता ... आरती सुरु झाली. माझ्या कानात आवाज घुमला , "मोदकचोर ,मोदकचोर", मी दचकलो , कोण बोलतंय , आजूबाजूला पाहू लागलो . ते पाहून आई ओरडली , "अरे तनय, आरती चालू आहे ना ! मग जरा देवाकडे लक्ष दे , धीर धरवत नाही का तुला !” मी मानेनेच होकार दिला . पुन्हा माझ्या कानात आवाज घुमला , "मोदकचोर", आता मी घाबरलो; हा काही भास नाही; खरंच कुणीतरी बोलत आहे, "तनय, अरे ... तनय , इकडे -तिकडे काय बघतोस , मी बाप्पा ... गणपती बाप्पा बोलत आहे" .
"देवाss.. ! तू तर समोर आहेस आणि त्यात
मातीची मूर्ती , मग कसा काय बोलू
शकतोस ?" मी आश्चर्याने विचारले
. त्यावर बाप्पा म्हणाले "अरे वेड्या
, मगाशी पूजा करताना भटजींनी प्राण
-प्रतिष्टेचा मंत्र म्हणून मला सजीव केले , आता
मी पाहू शकतो , बोलू शकतो आणि ऐकू शकतो
म्हणून तर मला कळले कि, तू दोन मोदक लंपास
केलेस त्यामुळे आता माझा 'record ' होणार नाही . मी आश्चर्यचकित होऊन
विचारले , देवाss!! तुझा 'record ' समजले नाही मला
. तसे बाप्पा पुढे म्हणाले, " ह्या वर्षी मी आई-वडिलांना 'promise' केले कि मी एका घासात २१ मोदक खाईन पण, तू त्यातील २ मोदक खाल्लेस, त्यामुळे
माझा 'record' होणार नाही , बाप्पा हिरमुसले
.
तनय
म्हणाला, "बाप्पा , तुझे आई - वडील काय साधे -सुधे आहेत , ते म्हणजे ' देवांचा
देव महादेव' आणि
' आई माता पार्वती ' तुला काय अशक्य
आहे" .
त्यावर गणपती बाप्पा म्हणाले , " तुला काय वाटत तनय; आई-वडील देव म्हणजे 'सब फ्री'; असं नसतं रे मित्रा ; मला आणि कार्तिकेय दादाला अभ्यास करावा लागतो , परिक्षा द्यावी लागते मग आम्हांला
दिव्य शक्ती मिळते . तुम्हां मुलांना वाटतं कि , आपणच अभ्यास करतो , नाही कां ?
तनय म्हणाला
,"पण देवा ! आता काय करू , मोदक तर पोटात गेले”? बाप्पा हसले आणि म्हणाले,
" मी देखील लहानपणी तुझ्यासारखाच मोदक पळवून
खायचो म्हणून तर 'लंबोदर' झालो, लंबोदर म्हणजे
' मोठे उदर' म्हणजे तू पण आता 'लंबोदर' होणार हा,हा,हा गणेशजी जोरजोरात हसू लागले .
मी
पोटाकडे पहिले, तर माझे पोट हळूहळू मोठे होत होते, मी घाबरलो.
देवाss ! मला वाचव, मी रडवेला होऊन
बोललो . मोदक खाताना मला विचारलेस का तनय
? मग आता का हाक मारतोस ? बाप्पा म्हणाले
. बाप्पा , आता सर्व पाहुण्यांना कळेल कि मीच मोदक खाल्ले , मी मान खाली घालून बोललो
. त्यावर
बाप्पा रागावले व म्हणाले " मगाशी आई विचारत होती , तेव्हा का खोटं
बोललास ? तो मी नव्हेच म्हणून “.
देवा चुकले, माफ कर मला,
मी
रडत बोललो . तनय, आता त्याचा काय उपयोग ? नाहीतरी तुला, खोटं बोलायची सवय आहेच
नां ! आता सर्वांना समजेल ' You are a
liar '.
तनय
दादा, तुझे पोट मोठे का झाले ? संजू, माझा चुलत भाऊ विचारू
लागला . "दादा खोटं बोलला म्हणून त्याचे पोट मोठे झाले", आजोबा म्हणाले त्यावर घरातील
सर्वजण खो-खो हसू लागले. तशी बच्चे
कंपनीने देवासमोर साष्टांग नमस्कार
केला आणि हात जोडून बोलले, " बाप्पा आम्ही कधीही
खोटं बोलणार नाही , 'promise' . मी मात्र आता काकुळतीला
आलो होतो , पोट मोठे झाल्यामुळे शर्टाची बटणे केव्हाच तुटली होती , पोटं बाहेर डोकावू
लागले होते . " किती वेळा तुला सांगितले, कि खोटं बोलू नकोस , गोत्यात येशील,
पण तू काही ऐकले नाहीस", आई म्हणाली.
मोठ्या पोटामुळे मला उठता येईना,बसता
येईना, मी रडू लागलो. देवा ! तू कसं काय सांभाळतोस , भलं मोठं उदर
. त्यावर गणपती बाप्पा हसून म्हणाले
" अरे ! म्हणून तर मी उंदरावरून पडलो नां
! बिचारा उंदीर , त्याला माझा आणि माझ्या
उदराचा भार काही वाहता येईना ,तो 'लबाड चंद्र ' मला हसला . देवा , तुझ्याकडे ' दिव्य शक्ती ' म्हणून तू शाप दिलास पण
मी मात्र आता सगळ्यांच्या चेष्टेचा
विषय झालो आहे , मी रडत बोललो .
माझी
अशी बिकट परिस्थिती
पाहून आईच्या डोळ्यात
पाणी आले , माझ्या डोक्यावरून प्रेमाने
हात फिरवत म्हणाली, " बाप्पाला नमस्कार
कर आणि सांग कि,
यापुढे मी कधीही खोटं बोलणार
नाही , कारण कर्ता - करविता तोच आहे
“. मी
देवाला हात जोडून म्हणालो, " देवा , यापुढे मी कधीही खोटं बोलणार
नाही , मला माफ कर 'promise'. पोट कमी होतंय का
? हे बघण्यासाठी मी पोटावरून
हात फिरवू लागलो , तसा
आईचा आवाज कानावर
पडला , "अरे , कळतंय मला , कि तुला भूक लागली आहे
ते ! त्यासाठी पोटावरून हात फिरवून
दाखवायला नको ,जेवण वाढायला घेते मी" .
तसा मी घाईघाईत
म्हणालो ," आई मोदक , माझं वाक्य पूर्ण व्हायच्या
आत ती म्हणाली, " ते मला माहीत आहे,
तो मी ...
मी तिला थांबवत म्हणालो आई, "तो मीच आहे".
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा