आणि भूत ... झाले !
लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर
कुठे चाललास? आईने मला दरडावून विचारले. तिच्या या रणरागिणीच्या अवतारापुढे, माझे उत्तर घशातच अडकले. कुठे बरं जाऊन लपावे? म्हणजे आई मला शोधू
शकणार नाही, मी मनात विचार
करू लागलो आणि अचानक आठवले
की, गावाच्या बाहेर ओढयाजवळ एक पिंपळाचे झाड आहे, त्या झाडावर भूत राहते म्हणून त्या बाजूला
कोणी जात नाही म्हणजे तिचं जागा लपण्यासाठी 'safe' आहे असे मी मनाशी ठरवले. 'भूत' असं काही नसतंच, माझा मुळी विश्वासच नाही, पण…. जर भूत असलं तर, मी मनातून थोडासा घाबरलो खरा पण, भूत आईएवढे 'danger' नसेल असा विचार करून
हसू लागलो. शिरीष, काय झाले हसायला? अभ्यासात
लक्ष नाही का? आईने ओरडून विचारले तसा मी दचकलो, भानावर आलो आणि पुन्हा पुस्तकात
डोके खुपसले.
दुसऱ्या दिवशी शाळेतून घरी आल्यावर
जेवलो व लगेचच पुस्तके घेऊन राजूकडे अभ्यासाला
जातो असे मी आईला सांगितले, माझे बोलणे ऐकून
माझ्या माउलीला समाधान वाटले. पण, मी टवाळ
मुलगा, सरळ ओढ्याच्या दिशेला वळलो. सुनसान
जागा, आजूबाजूला चिटपाखरूपण दिसत नव्हते, मी थोडा टरकलो, काय करावे आता? शेवटी पिंपळाच्या पारावर बसलो व एक पुस्तक उघडून वाचू लागलो. थोड्यावेळाने माझ्या
लक्षात आले की, कोणीतरी माझ्या बाजूला बसले आहे, मी घाबरलो, जोरात ओरडलो, कोण आहेस रे तू? तो हसून म्हणाला 'मीss मुंजा' पिंपळाच्या झाडावर राहतो.
"ह्या ओढ्याजवळ कोणी येत नाही रे, मुलेदेखील
जवळपास खेळत नाहीत, एकटा पिंपळाच्या झाडावर बसून मी कंटाळलो, आज तुला बघितले म्हणून खाली उतरलो"
मुंजा म्हणाला. "अरे, तू तर चांगला
माणसासारखा बोलतोस" मी म्हणालो. त्यावर मुंजा म्हणाला, "मी चांगलं भूत
आहे, घाबरू नकोस, तुला पाहिजे ती मदत करीन". त्याच्या या बोलण्याने माझे डोळे
आनंदाने चमकले, "कुठलीही मदत करशील मला"? मी विचारले. मुंजाने मानेनेच होकार दिला. परीक्षेत मला उत्तरे सांगशील का? मी हळूच विचारले. " होsss सांगीन ना उत्तरे", मुंजा आनंदाने म्हणाला. "मला
तू पुस्तकांतील धडे वाचून दाखव, मी सर्व अभ्यास
लक्षात ठेवीन आणि परीक्षेच्या दिवशी तुला प्रश्नांची उत्तरे सांगीन", मुंजा म्हणाला. खरं तर, मला मनातून खूप आनंद झाला होता, पण मुंजाची परीक्षा घेतल्याशिवाय विश्वास कसा ठेवावा.
माझ्या हातात पुस्तके होतीच, मी लगेच त्यातील इतिहासाचे पुस्तक उघडून धडा वाचायला सुरवात केली, मुंजा नीट लक्ष देऊन ऐकू लागला, अगदी शहाण्यामुलासारखा! पण प्रश्न उत्तरांच्या 'section' मध्ये त्याची बोंब लागली, काहींना त्याने जन्माला येण्याअगोदर मारले, तर काहींना आपापसात लढवून जिंकवले, मुघलांच्या बाबतीत तर कोणाचा मुलगा, कोणाचा आजोबा याचा त्याला थांगपत्ता लागत नव्हता, तो माझ्यापेक्षाही 'ढ' आहे का? असे मला वाटू लागले. "अरे, खूप वर्षांनी आज मी अभ्यास केला, बुद्धीला गंज चढलाय ना माझ्या! कारण वापरतच नाही, मी जर रोज अभ्यास केला तर बरोबर लक्षात राहील", मुंजा म्हणाला. मलाही त्याचे म्हणणे पटले.
आता हा माझा रोजचा दिनक्रम झाला, शाळेतून
घरी आल्यावर पटकन जेवायचे व पुस्तके घेऊन मित्राकडे अभ्यासाला जातो असे सांगायचे
आणि सरळ ओढ्याकडे वळायचे, पण 'मित्र' म्हणजे
'भूत' हे काही माझ्या घरी माहीत नव्हते. पिंपळाच्या पारावर बसून, मी मुंजाला
पुस्तकांतील धडे वाचून दाखवायचो, मग आम्हीं
एकमेकांना प्रश्न विचारायचो, मला उत्तर आले नाही तर तो सांगायचा
आणि त्याला उत्तर आले नाही तर मी सांगायचो असा माझा अभ्यास मजेत चालला होता.
दुसऱ्या दिवशी, सकाळी शाळेत पोहचलो, राष्ट्रगीत म्हणून झाले, मग
आम्हीं वर्गात गेलो, एकामागून एक lectures चालू झाले. लंच ब्रेक संपला आणि मराठीच्या जोशी मॅडम वर्गात आल्या, त्यांनी सांगितले की, "उद्या मी तुमची
मराठीची test घेणार आहे, तरी सर्वांनी अभ्यास करून या". वर्गातील मुले ओरडू लागली, मॅडम ६ धडे आहेत, एका दिवसात कसा अभ्यास होईल? भूगोलाचे homework आहे, drawing चे book पूर्ण करायचे आहे, खूप अभ्यास आहे, पण जोशी मॅडमनी ऐकले नाही, lecture संपले तश्या त्या वर्गाबाहेर गेल्या. सर्वजण चिंतीत होते, पण मी मात्र निश्चिंत
होतो कारण, माझ्याजवळ भूत होते.
घरी गेल्यावर, मी test बद्दल मुद्दामच काही सांगितले नाही, चांगला result आला की, घरच्यांना एकदम चकितच करावे असे मी ठरवले. मी पटकन जेवलो व मराठीचे पुस्तक घेऊन तडक ओढ्याजवळ गेलो, मुंजाला सर्व काही सांगितले व आम्हीं दोघांनी लगेच अभ्यास सुरु केला. संध्याकाळपर्यंत माझा अभ्यास पूर्ण झाला, मी घरी जायला निघालो, मुंजाला सांगितले की, उद्या सकाळी मी तुला शाळेत घेऊन जाईन, माझ्या बेंचजवळ बस, मी तुला हळूच प्रश्न सांगीन, तू पुस्तकात उत्तर शोध व मला चटकन सांग. बघ, उद्या माझा पेपर पहिला सोडवून होतो की नाही ! सर्वांना आश्चर्य वाटेल, पण मित्रा, तू जसा मला दिसतोस तसा इतरांना दिसणार नाही ना! मी त्याला विचारले. त्यावर मुंजा हसला व म्हणाला, "अरे, तू माझा दोस्त आहेस ना! तुला, मला बघता यावे, यासाठी मी एक मंत्र म्हणतो,
"अक्कड बक्कड बंबे बोल,
मी आहे मुंजा, काय करू बोल"
आणि मी तुला दिसायला लागतो". "वा ! मस्त, म्हणजे तू फक्त मलाच दिसणार आणि उत्तरे सांगणार," मी आनंदाने म्हणालो. मग त्याला bye करून मी घरी जायला निघालो. संध्याकाळी माझी स्वारी खुशीतच घरी पोहचली, माझा आनंदी चेहरा पाहून आजी म्हणाली, "बाळ, खुशीत दिसतोस, कोणती मोठी कामगिरी बजावलीस का"? मी गप्प बसलो. खरंतर मोठी कामगिरी मी उद्या बजावणार आहे आजी,आणि ती एकदा फत्ते झाली की, तुम्हां सगळ्यांना आनंद होईल, मी मनात म्हणालो आणि आत गेलो.
दुसऱ्या दिवशी, सकाळी जरा लवकरच उठलो, बॅग भरताना आवर्जून मराठीचे पुस्तक घेतले, खरं पाहता ,पुस्तकाची गरज मला नव्हती, पण मुंजाला होती. मी घरून निघतांना नेहमीप्रमाणे देवाला नमस्कार केला आणि हसून म्हणालो, "हे बुद्धिदाता, आज 'test' आहे, मला काही नको फक्त मुंजाला तेवढी जास्त बुद्धी दे", अशी प्रार्थना करून मी निघालॊ. शाळेला जाताना पहिले ओढ्याजवळून मुंजाला बरोबर घेतले आणि मग शाळेत गेलो.
काय शिऱ्या, अभ्यास झाला का? माझे मित्र मला विचारू लागले, मी काहीच न बोलता वर्गात गेलो, बॅगेतून मराठीचे पुस्तक बाहेर काढले आणि मुंज्याच्या
हातात दिले. हाय रे कर्मा! मुंजा तर दिसत नव्हता, पण पुस्तक मात्र हवेत तरंगत होते,
ते पाहून सर्व मित्र हसू लागले. काय शिऱ्या, पुस्तक गायब व्हायला पाहिजे होते पण ते
तर हवेत तरंगत आहे, तुझी जादू चुकली वाटते, असे म्हणून माझी चेष्टा उडवू लागले. पुस्तक
तरंगत आहे, हे पाहून मला घाम फुटला, मी पटकन पुस्तक पकडले, बॅगेत टाकले आणि बॅग बंद
केली.
जोशी मॅडमनी वर्गात प्रवेश केला आणि लगेचच
पेपर वाटायला सुरुवात केली, भीतीने माझी बोबडीच वळली, मी झटकन डोळे बंद केले तसा गणपती
बाप्पा हसताना मला दिसू लागला, देवाने विचारले "काय शिऱ्या, बुद्धी नको ना तुला"! "देवा, माफ कर मला, पण आज वाचव! मी तुझ्यावर
विश्वास ठेवण्यापेक्षा भुतावर ठेवला, चुकलो देवा", मी म्हणालो. जोशी मॅडम पेपर
वाटत माझ्या बेंचजवळ आल्या, शिरीष, तुला बरे वाटत नाही का? असे मला विचारू लागल्या.
मी चटकन डोळे उघडले आणि पेपर हातात घेतला.
१. प्रश्न
- मामाच्या घरी कोण आले होते ? मी मुंजाला विचारले.
उत्तर - 'औरंगजेब ' मुंजा म्हणाला. औरंगजेब
घरी यायला मामा काय मुघल होता! मी म्हणालो .
त्याचे उत्तर मी स्वतःहून लिहिले.
२. प्रश्न - रामूच्या घरी कोणती जनावरे होती?
उत्तर- वाघ, सिंह, हरीण, कोल्हा .. अरे
थांब थांब, मी मुंजाला थांबवले. असले हिंस्त्र
पशू घरी ठेवायला रामूचे घर काय प्राणिसंग्रालय होते.
३. प्रश्न - शेतकरी धान्य कोठे विकत असे?
उत्तर- चंद्रावर.
अरे, चंद्रावर तर जीवसृष्टी
नाही मग तेथे धान्य कोण खाणार?
४. प्रश्न - 'थोरली आई' या पाठात .... मी प्रश्न पूर्ण करणार, त्याच्या अगोदरच मुंजा बोलू लागला.
'थोरली आई' हा मराठी चित्रपट फारच सुंदर होता, तिने घरासाठी केलेले कष्ट आठवले तर डोळ्यांत पाणी येते, मुंजा भलताच 'emotional' झाला. मी त्याला म्हणालो, "अरे वेड्या, तो चित्रपट भूतकाळात होता, मी वर्तमानकाळातील प्रश्न विचारला आहे".
तसा मुंजा भानावर आला व म्हणाला, "मित्रा, माझ्या डोक्यात सर्व विषयांची खिचडी झाली आहे, काय करू मी आता?". "जा, आता पिंपळाच्या पारावर आणि डोक्यातील खिचडी खात बैस", मी रागाने म्हणालो. तसा तो उठला आणि निघून गेला. मी test स्वतःहून दिली, सर्व प्रश्नांची उत्तरे विचारपूर्वक सोडवली. शाळा सुटली, मी घरी जायला निघालो. पण आज माझे मन कशातही लागेना! ना जेवणात, ना खेळण्यात, ओढ्याजवळ पण गेलो नाही, मनात सारखा मुंजाचा विचार येऊ लागला, मी चांगलं भूत आहे, मदत करीन तुला, promise केलं होतं, पण ऐनवेळी फसवलं. आजी बरोबर म्हणते, 'जो दुसऱ्यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला'.
दोन दिवसांनी पेपर मिळणार होता, मी घाबरतच शाळेत गेलो, lectures चालू झाले, लंच ब्रेक नंतर मराठीचा तास होता, डबा खाताना माझ्या मनांत विचारांचे काहूर उठले, किती मार्क्स मला मिळाले असतील? पास झालो असेल ना? कमी मार्क्स मिळाले म्हणून जोशी मॅडम रागावणार नाहीत ना? घंटा वाजली आणि लंच ब्रेक संपला. जोशी मॅडम आमच्या वर्गात आल्या, त्यांच्या हातात पेपरचा गठ्ठा होता, त्यांनी रोल नंबर प्रमाणे पेपर द्यायला सुरुवात केली. माझा नंबर आला, तश्या मॅडम खुर्चीवरून उठल्या, माझ्याजवळ आल्या, त्यांनी हात वर केला, मी घाबरलो, मला वाटले, कमी मार्क्स मिळाले, म्हणून मला पाठीवर 'धम्मक लाडू' मिळणार, पण जोशी मॅडमनी माझ्या पाठीवर शाबासकी दिली. जोशी मॅडम पुढे म्हणाल्या, "या परीक्षेत शिरीष पहिला आला आहे, त्याला २५ पैकी २५ मार्क्स मिळाले आहेत, असाच अभ्यास करत जा आणि यशस्वी हो. मला विश्वासच बसेना, मी स्वतःहून पूर्ण पेपर सोडवला आणि चक्क पहिला आलो, म्हणजे 'मी पास' आणि 'भूत नापास'.
पण आज, मला आनंद होण्याऐवजी दुःख वाटत
होते, कारण मी भुताला रागाने वाईट बोललो होतो.
शाळा सुटल्यावर घरी न जाता
सरळ ओढ्याजवळ गेलो, तिथे भूत काही दिसेना, मी जोरजोरात त्याला हाका मारू लागलो, तसा
मुंजा मान खाली घालून माझ्यासमोर उभा राहिला. "माफ कर मित्रा, मी तुझ्यावर रागावलो, पण तुझ्यामुळेच मी आज पहिला
आलो आहे", मी मुंज्याला म्हणालो. तसा
तो हसत म्हणाला, "तू पहिला आला आहेस, ते
तू केलेल्या अभ्यासामुळे, माझ्यामुळे नाही. अरे, वेड्या 'हुशार' किंवा 'ढ' असे काही नसते, तुमच्या सततच्या प्रयत्नांमुळे तुम्हीं यशस्वी
होत असता, तुझ्यातील आत्मविश्वास जागृत करण्यासाठी मला असे वागावे लागले"." केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे, असे रामदास स्वामी सांगून गेले, ते खरे आहे ना! " मुंजा म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून माझे डोळे पाण्याने डबडबले.
Nice
उत्तर द्याहटवाThank you
हटवाThank you
हटवाI am your daily reader why you are not posting any new story
उत्तर द्याहटवाThanks. New story will be posted shotrly.
हटवा😀
उत्तर द्याहटवा🙏
हटवा