डुलकी ...... प्रवासातली
लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर
येत्या शनिवारी, सौभाग्यवतीला घेऊन पिच्चरला जाऊया, मस्तपैकी बाहेर जेऊया आणि जमलंच तर एखादे गिफ्ट तिला देऊया असा मी मनात बेत आखत होतो. तेवढ्यात 'साहेबांनी बोलावलंय'असा सखाराम शिपायाचा कर्कश आवाज माझ्या कानावर आदळला. घड्याळात ५ वाजून २० मिनिटे झाली होती, खरंतर मी घरी निघण्याच्या तयारीत होतो आणि..... साहेबांनी बोलावले, कपाळावर एकदम आठ्या उमटल्या, त्या कशाबशा कमी करत प्रसन्न मुद्रेने मी साहेबांच्या केबिनमध्ये धडकलो. या सावंत बसा, साहेबांचा गोड आवाज म्हणजे काहीतरी मोठं काम असणार, असा मी मनात अंदाज बांधला. येत्या शनिवारी तुम्हांला पुणे-ब्रांचला जायचे आहे. 'आपका हुक्म सर आंखो पर' असे मनात म्हणत मी cabin बाहेर पडलो. 'Thank God’ बायकोला Saturday चा 'plan ' सांगितला नव्हता, नाहीतर आज संध्याकाळपासून 'भांड्याचे आवाज' आणि 'जेवणाचे हाल' सुरु झाले असते.
शुक्रवारी दुपारी कर्जतवरून पुण्याला जाणारी ३.२० च्या 'Passenger ' ट्रेन मध्ये चढलो. प्लॅटफॉर्मवर वडापाव चा घमघमाट सुटला होता. खरंतर, मी ऑफिस मधून lunch करून निघालो होतो, पण ... मला रहावले नाही, मी चटकन दोन वडापाव विकत घेतले, ट्रेनमध्ये बसलो आणि खायला सुरुवात केली. वडापाव पोटात गेल्यावर माझं मन तृप्त झाले आणि मला समाधानाची ढेकर आली.
ट्रेनमध्ये हळूहळू माणसे चढत होती पण माझा compartment अजून रिकामाच होता, जर कोणी आले नाही तर मस्तपैकी पाय लांब करून डुलकी काढीन असा मी विचार करू लागलो.
३. ३० ला ट्रेन सुरु झाली. इतक्यात प्लॅटफॉर्मवर एक जोडपे धावताना मला दिसले, कदाचित ते देखील 'Passenger' ट्रेन पकडण्यासाठी आले असावेत, दरवाज्याजवळ उभ्या असणाऱ्या माणसांनी तत्परतेने मदतीचा हात देऊन त्यांना ट्रेनमध्ये चढवले. 'हुश्श' असे म्हणत ते दोघे माझ्या बाजूच्या सीटवर बसले. माझी नजर नकळत त्यांच्याकडे वळली, त्यांच्या सौ. च्या नाकाचा शेंडा रागाने लालबुंद झाला होता, हे माझ्या चाणाक्ष नजरेतून सुटले नाही . आता आपला थोडा वेळ 'timepass' होईल, उशीर झाल्याचे खापर नेमकं कुणावर फुटतंय, हे पाहूया आणि मग निवांत डुलकी काढूया, असा मी विचार केला.
त्यांचे अहो म्हणाले, "Sorry माझ्यामुळे late झाला, पण तुझ्या चपळाईमुळे ट्रेन पकडता आली good”.
अरे! त्यांचे अहो म्हणजे साधा-भोळा सांब लढण्याअगोदरच शस्त्रे टाकली, मी मनात म्हणालो.
'अहोंच्या' या वक्तव्यावर सौं च्या नाकाचा शेंडा 'normal' झाला.
'ठीक आहे' असे सौं. करड्या आवाजात म्हणताच वातावरण निवळले.
खरं सांगू का, आमच्या मित्रांच्या 'gang' मध्ये याचे 'पळपुटा' असे नामकरण झाले असते. नोss 'timepass' चला, आता डुलकी काढूया, असे म्हणून मी डोळे मिटले.
खिडकीतून मस्त गार वारा डब्यात येत होता, जून महिना सुरु झाला होता, नुकतीच पावसाची सर येऊन गेली होती, मातीचा सुगंध साऱ्या आसमंतात दरवळत होता. ट्रेन सुरु होऊन साधारण तासभर झाला होता. लोणावळा स्टेशनला ट्रेन थांबली आणि चिक्की विकणाऱ्यांची ये-जा सुरु झाली, तसेच पॅन्टरीकार मधून देखील चहा, कॉफी, सँडविच विकायला येणाऱ्यांची वर्दळ सुरु झाली. लोकांचे चढणे-उतरणे सुरु होते. इतक्यात तीन भगिनी ट्रेनमध्ये चढल्या आणि माझ्या समोरच्या बर्थवर येऊन बसल्या. माझ्या अगदी समोर लाल रंगाचा ड्रेस घातलेली भगिनी बसली, तिच्या बाजूला निळ्या रंगाचा ड्रेस घातलेली भगिनी बसली आणि सर्वात शेवटी सफेद रंगाचा ड्रेस घातलेली भगिनी बसली. त्यांचा पेहराव पाहून त्या बहुतेक नवविवाहित असाव्यात असे मला वाटत होते.
मी आपले अंग सावरून खिडकीच्या बाजूला सरकून बसलो . बायका म्हणजे बडबड, तर आता डुलकी लागेल की नाही शंकाच होती, प्रयत्न करायला काय हरकत आहे! असे मी स्वतःशी बोलत पुन्हा एकदा डोळे मिटले पण कान मात्र जागे होते.
माझ्या समोरील भगिनी म्हणाली, "अगं तुझा निळ्या रंगाचा ड्रेस किती छान दिसतोय, कुणी घेतला गं" ?
त्यावर ती लाजून म्हणाली, "हा ड्रेस आमच्या 'ह्यांनी' घेतला, ती की नाही एक गंमतच आहे",असे बोलून तिने सांगायला सुरुवात केली.
मी पण झोपेला फाटा देत गंमत ऐकण्यासाठी कान टवकारले.
आमच्या लग्नाच्यावेळी सासूबाई सारखे 'ह्यांचे' गुणगान गात होत्या, माझा मुलगा हुशार आहे, त्याने कधीही पहिला नंबर सोडला नाही, पणsss मागील आठवड्यात मात्र माझा birthday
विसरले.
मग तू काय केले ? उरलेल्या दोघीनीं एका सुरात विचारले.
त्यावर ती पुढे बोलू लागली," मग काय दुसऱ्या दिवसापासून मी बाई हुशार, मी बाई हुशार येता जाता बोलत होते". सरते शेवटी रात्री माझ्यासमोर 'आमचे हे' हात जोडून उभे राहिले आणि म्हणाले," मी हुशार आहे, पण .... तुझ्याएवढा नाही" आता झालेल्या गुन्ह्याबद्दल काय शिक्षा देतेस?
मी चांगले दोन ड्रेस वसूल केले. तिच्या या पराक्रमाबद्द्दल, तिच्या मैत्रिणी very
good, very good म्हणत तिची पाठ थोपटत होत्या.
आता शेवटी बसलेली भगिनी बोलू लागली, "काल मी आमच्या 'ह्यांना' जुईची फुले आणायला सांगितली". त्यावर ते खवचटपणे मला म्हणाले," मी माझ्या मैत्रिणींना फक्त गुलाबाची फुले द्यायचो, त्यामुळे जुईची फुले मला ओळखता येणार नाही, हा हा हा ".
बापरे ह्यांचे 'अहो' भलतेच धाडसी आहेत. जिथे 'मैत्रीण' हा शब्द उच्चारायला लग्न झालेल्या पुरुषांना भीती वाटते, तिथे हा चक्क गुलाबाची फुले द्यायचो असे म्हणतोय. त्याच्या या धैर्याला मी मनोमन वंदन केले.
लाल रंगाचा ड्रेस घातलेल्या भगिनीला तिच्या मैत्रिणी विचारू लागल्या, अगं तुझ्या माहेरी non -veg खात नाहीत पण सासरी तर non -veg शिवाय चालत नाही, तुझ्या लग्नाला सहा महिने झाले, आता तुला non -veg बनवायला जमतं का? त्यांच्या या प्रश्नावर ती मुळूमुळू रडू लागली. अगं, रडायला काय झाले? दोघी मैत्रिणी आश्चर्याने विचारू लागल्या.
Non -veg म्हणजे माझा 'weak -point' माझी आई चेष्टेने म्हणते 'बोटी आणि घास लोटी' आणि ही non -veg मुळे रडतेय, नेमकं काय घडलंय हे ऐकण्यासाठी मी सर्वांगाचे कान केले.
त्यावर ती भगिनी डोळे पुसत आणि चहाचा घोट घेत बोलू लागली, " माझे मिस्टर त्यांच्या आईचे सारखे गुणगान गात असतात, माझी आई सुगरण आहे, तिच्या हाताला चव आहे". मागच्या आठवड्यात सासूबाई गावाला गेल्या होत्या, मला चांगली संधी मिळाली, मी ठरवले, उद्या रविवार आहे, मस्त non -veg चे जेवण बनवते आणि मिस्टरांना चकित करते. दुसऱ्या दिवशी सकाळी मी मार्केट मधून पापलेट, सुरमई आणि कोळंबी अशी वेगवेगळी मच्छी आणली. पापलेट फ्राय केले, कांद्यातील कोळंबी केली, सुरमाईचा रस्सा केला सोबत तांदळाची भाकरी, भात आणि सोलकडी पण बनवली. जेवण तयार झाल्याबरोबर मिस्टरांसाठी घाईघाईने ताट वाढले, त्यांनी आनंदाने घास तोंडात घातला, त्यावर मला विचारले, काऊ घास ठेवला का?
ए, काऊ घास म्हणजे काय? तिच्या मैत्रिणींनी उत्सुकतेने विचारले.
मी देखील knowledge मध्ये भर पडेल म्हणून नीट लक्ष देऊन ऐकू लागलो.
ती काऊ घास याबद्दल माहिती सांगू लागली, "माझ्या सासूबाई सांगतात, रोज
दुपारी जेवण तयार झाले की, त्यातील थोडे थोडे अन्न घ्यावे आणि कावळ्याला खायला घालावे त्यामुळे अन्नातील दोष दूर होतो". उत्साहाच्या भरात मी काऊ घास ठेवायचा विसरले होते. मी मिस्टरांना म्हणाले, " आता चटकन काऊ घास ठेऊन येते". त्यावर ते हसत म्हणाले " अगं नको, आज काऊ घास ठेऊ नको नाहीतर कावळे येथे फिरकायचे बंद होतील", सांगता सांगता तिला हुंदका फुटला.
अगं, कावळ्याला कुठे चवीचे ज्ञान असते, ते तुझी चेष्ठा करत होते, तिच्या मैत्रिणी तिला समजाऊ लागल्या.
मला हसू आवरेनासे झाले म्हणून, मी खिडकीबाहेर पाहू लागलो. आजच्या या प्रवासात माझ्या ज्ञानात खूप भर पडली, नवविवाहित बायकांच्या जोडीदाराकडून असणाऱ्या अपेक्षा, कुत्सितपणे बोलल्यावर त्यांना होणाऱ्या वेदना, त्यांच्या इच्छा या गोष्टींचा मला काहीसा उलगडा झाला होता. मी मनात खूणगाठ बांधली की, यापुढे सतर्कतेने वागायचे कारण.... माझेदेखील चार महिन्यांपूर्वीच लग्न झालेले आहे.
थोड्याच वेळात पुणे स्टेशन येईल अशी ट्रेन मध्ये announcement झाली, मी पुणे स्टेशनवर उतरण्यासाठी बॅग घेऊन दरवाज्यापाशी हसत उभा राहिलो.
चला आता, पुन्हा भेटूया, परतीच्या प्रवासात ....... डुलकी काढण्यासाठी.
माझ्या सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा . हे वर्ष तुम्हांसर्वांना आनंदाचे ,भरभराटीचे आणि वाचत राहण्याचे जावो हि ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
उत्तर द्याहटवाGo home and sleep man 😊😃😃
उत्तर द्याहटवाZopla 😴
हटवा