जेव्हा, तिची नि माझी ... भेट
लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर
लग्न सोहळा; आयुष्यातील महत्वाचा, आनंदाचा क्षण; त्यात तो माझा खास मित्र. त्यामुळे त्याच्या लग्नाला, मी हजर राहणारच, मग ऑफिसमध्ये कितीही काम असो. निलेश, माझा जिवलग मित्र, राहायला आम्हीं दोघेही पुण्यात, पण त्याची रेशीमगाठ जुळली साताऱ्यात. मुलीकडची पार्टी मालदार , तीन दिवस धूमधडाक्यात लग्न समारंभ पार पडला, मी खूप धमाल केली. लग्नाचे वऱ्हाड दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी पुण्याला जायला निघणार होते, निलेश मला वऱ्हाडाबरोबर येण्यासाठी आग्रह करत होता. "एक दिवस आणखी सुट्टी घेतली तर काय फरक पडणार आहे",तो म्हणाला . मी त्याला हसून म्हणालो, "भावा, जर का उद्या ऑफिसला हजर राहिलो नाही तर सर मला विचारतील, लग्नात नवरीबरोबर जशी करवली जाते तसा तू नवऱ्यामुलाबरोबर करवला म्हणून गेला होतास काय" ? माझ्या या बोलण्यावर तो हसू लागला . "आज रात्री मी पुण्याला जायला निघणार आहे, तू हनिमूनला जाऊन ये, मग निवांत भेटूया", मी त्याला म्हणालो .
संध्याकाळी त्याच्या आईवडिलांना नमस्कार करून, नवरा-नवरीला शुभेच्छा देऊन मी पुण्याला जायला निघालो .
साताऱ्याचे कंदी पेढे विकत घेतले , बाजारात एक फेर-फटका मारला, रात्रीचे जेवण बाहेर हॉटेलमध्ये केलं आणि बरोबर दहा वाजता बस स्टॅंडवर पोहचलो.
उन्हाळ्याचे दिवस, उकाड्याने प्रचंड हैराण होत होतं, बस स्टँडला लागली होती, पण इंजिन गरम झालेले होते, प्रवासात गाडी बंद पडायला नको म्हणून ड्रायव्हर इंजिन थंड होण्याची वाट बघत होते. गाडी १०.४० ला सातारा बस स्टँडवरून सुटली, मी बुकिंग केलेल्या सीटवर बसलो, बाजूच्या सीटवर कोणी बसले नव्हते म्हणून जरा ऐसपैस बसलो. मस्त गार वारा खिडकीतून आत येत होता, जेवणही पोटभर झालं होते, तीन दिवस लग्नात नाचणे-फिरणे त्यामुळे मी खूपच दमलो होतो. बस सुटली, तसा मी लगेचच झोपलो. तासाभराने मला जाग आली, तेव्हा बस आसरे गावाच्या जवळपास पोहचत होती . पण, आता बस उसासे सोडू लागली होती, इंजिन पुन्हा गरम झाले होते, शेवटी ड्रायव्हरने छोटं हॉटेल बघून तिथे बस उभी केली, सर्व प्रवासी उतरले. हॉटेलमध्ये सर्व प्रवाश्यांनी ice
cream खाल्ले, तेवढ्यात एक काका ओरडले, "अरे, एक ice
cream त्या इंजिनला पण खाऊ घाला म्हणजे ते पण आपल्यासारखे थंड होईल , उकाडयाने ते देखील हैराण झाले आहे", त्यावर एकच हशा पिकला .
प्रवाश्यांचे एकावर एक आईक्रीम खाणे चालूच होते, तेही थंड होत होते आणि इंजिनही, साधारण पाऊण तास तिथे आम्हीं घालवला. साडे बाराच्या सुमारास कंडक्टरने आम्हां सर्वांना बसमध्ये चढायला सांगितले, ड्रायव्हरने बस सुरु करतांना 'गणपती बाप्पा' असे म्हणताच मोरयाSS म्हणून आम्हीं त्याला साथ दिली. पहिल्या सीटवरील काकी हात जोडून प्रार्थना करीत होत्या, हे गजानना , आमचा पुढचा प्रवास सुखरुपपणे, बस न थांबता होवो, ही तुझ्या चरणी विनंती , सर्वांनी त्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. मी कंडक्टरला बस पुण्याला किती वाजेपर्यंत पोहचेल? असे विचारताच त्याने ह्या स्पीडने आपण पहाटे ४ वाजेपर्यंत पोहचू असे सांगितले. पुणे स्टँडवरून रिक्षाने अर्ध्यातासात घरी पोहचेन, मग दोन-अडीच तास झोप काढीन, नंतर फ्रेश होऊन ऑफिसला जाईन, मी मनात पुढचा प्लॅन ठरवला आणि डोळे मिटले. माझ्या डोळ्यासमोर लग्नातील प्रसंग दिसू लागले, हळदीची मजा, लग्नमंडपात हार घालताना नवरा-नवरीची केलेली चेष्ठा, सप्तपदी चालत असताना नवरीला दिलेले आधुनिक सल्ले आठवताना मला हसू येऊ लागले. म्हणजे, माझे जेव्हा लग्न होईल तेव्हा पण अशाच गमती-जमती घडणार तर
.... आई, आता माझ्या पाठीशी लागेल, मित्राचे लग्न झाले आता तुझा नंबर, या विचाराने मी चक्क मनातल्या मनात लाजलो.
बस जेमतेम १५ किमी गेली आणि बंद पडली. सर्वत्र मिट्ट काळोख, फक्त रस्त्यावरचे काही लाईट्स चालू होते , रातकिड्यांचा किर्रर्रर्र आवाज, मधूनच कुत्र्याचा रडण्याचा आवाज ऐकू येई, रात्रीचा एक वाजून गेला होता. आता मात्र प्रवाश्यांनी आशा सोडली, बस काही लवकर चालू होणार नाही, ड्रायव्हर, कंडक्टर सहित सर्व प्रवासी खाली उतरले. बसून, बसून पाय दुखू लागले म्हणून काही प्रवासी रस्त्यावर येरझाऱ्या घालू लागले, काही रस्त्याच्या कडेला बसले, मी देखील पाय मोकळे करावे या उद्देशाने चालू लागलो.
थोड्या अंतरावर जाताच मला मागून कुणीतरी येत आहे असा भास झाला, मी चटकन मान वळवून पहिले तर एक तरुण मुलगी येताना दिसली. खांद्यापर्यंत रुळणारे केस, काळेभोर डोळे, गोल चेहरा, पांढऱ्या शुभ्र रंगाचा ड्रेस, इतकी सुंदर दिसत होती जणू काही एखाद्या पिक्चरची हिरोईन. तिला बघताच, मला तिच्याशी बोलायची इच्छा झाली, मग काय , 'नमनाला घडाभर तेल कशाला'. मी लगेचच हसून तिला विचारले, “काय, एकट्याच फेरफटका मारायला निघालात”!
ती हसून म्हणाली," हो , मी एकटीच प्रवास करत आहे". हसताना तिच्या गालावर काय सुंदर खळी पडत होती, माझी नजर हटेचना. तुम्हीं माझ्या बसमध्ये होता, पणss मी तुम्हांला पहिले नाही, मी तिला उत्सुकतेने विचारले .
"मी बस सुटण्याच्या वेळेला स्टँडवर पोहचले आणि माझी सीट पण शेवटची आहे, म्हणून कदाचित", ती बोलली . व्वा ! किती नम्रपणे बोलत आहे ही, आई तर खुश होईल
. मुलगी कशी नम्र पाहिजे, मागच्या आठवड्यात मावशीशी फोनवर बोलताना मी ऐकले होते, म्हणजे आईकडून
green signal , मी मनात म्हणालो .
“बस, लवकर चालू होण्याचे चिन्ह दिसत नाही, तोवर एक चक्कर मारून येऊया का ?” , असे मी तिला विचारताच तिने मानेने होकार दिला
.
सुहानी रात, में और तुम एक साथ, व्वा ! क्या बात , माझा मूड एकदम रोमँटिक होत चालला होता. रस्त्यावर फक्त आम्हीं दोघेजण नव्हतो, आणखी एक साक्षीदार होता, तो म्हणजे चंद्र .
सुधीर फडके यांचे 'पान जागे ,फूल जागे , भाव नयनी जागला , चंद्र आहे साक्षीला ' हे गाणे माझ्या कानात वाजू लागले आणि माझ्या मनाची खात्री झाली की, हिच ती माझ्या आयुष्याची जोडीदार, my
better half. हिंदी पिक्चरमध्ये जेव्हा हिरोला हिरोईन भेटते, तेव्हा कसे देव सिग्नल देतात, कधी वीज चमकते, कधी पाऊस पडतो, तर कधी जोराचा वारा सुटतो तसे मला तिच्या बरोबर चालताना कमालीचा गारवा जाणवत होता. सोसाटयाचा वारा सुटला होता, पण नेमके माझ्याकडे जॅकेट नव्हते , नाहीतर हिरोसारखे काढून तिला दिले असते.
ती माझ्या बरोबर एवढा वेळ चालत आहे, म्हणजे....
आग दोन्ही बाजूंनी लागली आहे तर ...
!
Love at first sight चा मला अनुभव येत होता, कदाचित तिलाही येत असेल, पण तिला विचारायची हिंम्मत होत नव्हती
.
आम्हीं बोलत बोलत बरेच दूर आलो होतो, आता बस काय, तो रस्ता देखील नीटसा दिसत नव्हता . माझ्या मनात चमकले, एकटी मुलगी एवढ्या लांब माझ्याबरोबर कशी काय आली, धीट आहे बुवा
! कदाचित, मी तिला प्रामाणिक, संस्कारी मुलगा असावा, बहुधा असेही वाटले असावे, या विचाराने मला माझाच अभिमान वाटू लागला.
हातावरील घड्याळाकडे नजर गेली. अरे बापरे ! दोन वाजले की, बसचे इंजिन एव्हाना थंड झाले असेल, चला, आता आपण वळूया, असे बोलून मी पाठीमागे वळलो तर बस येताना दिसत होती. मी तिला म्हणालो, "माझ्या बाजूची सीट रिकामी आहे , तुम्हीं बसू शकता , नाहीतरी पाठीमागे बसून शरीराची हाडं खिळखिळी होतात”, तिने माझ्याकडे एक चोरटा कटाक्ष टाकला.
अरुण दाते यांचे शब्द माझ्या कानांत गुणगुणू लागले ,
नव्हतेच शब्द तेव्हा , मौनात अर्थ सारे
म्हणजे
... ती बाजूच्या सीटवर बसायला तयार आहे तर
! मला आकाश ठेंगणे वाटू लागले.
बस जवळ येताच कंडक्टर ओरडला, “काय राव ! किती हाका मारल्या, आणि एकटंच बडबडताय, भूताचं भ्या नाही वाटतं, एकला चाललात ते आडवाटेला” !
“एकटा कुठे चाललोय? ह्या आहेत ना माझ्याबरोबर ! आपल्याच बसमधील आहेत , सीट नंबर ५१”, मी उत्तर दिले.
ड्रायव्हर आणि कंडक्टर हसू लागले . पुढे ड्रायव्हर बोलले, "
अहो भाऊ, बस आहे ५० सीटची मग ५१ नंबरची सीट येणार कुठून” ?
मी घाबरून बाजूला बघितले, तर कोणीच नव्हते, म्हणजेss.. मी एवढा वेळ कोणाशी बोलत होतो ? बसमधील प्रवासी ओरडले, भुताबरोबर. मी पटकन बसमध्ये चढलो, मला घाम फुटला होता, घशाला कोरड पडली. बसमधील सर्व प्रवाश्यांच्या नजरा माझ्यावर होत्या, माझे पाय उलटे तर नाहीत ना ! ते आवर्जून पहात होते.
मी ओरडून सांगितले, "अरे , घाबरू नका ! मी मनुष्यच आहे, चला आता, सुसाट निघूया , नाहीतर ती तुम्हां सर्वांनाच दिसेल". ड्रायव्हरने गाडी जोरात पळवली.
मी जागेवर बसलो, बाजूच्या सीटवर बॅग ठेवली कोणी बसू नये म्हणून, एक दीर्घ श्वास सोडला आणि माझ्या ओठी गाण्याचे बोल तरळू लागले
जेव्हा तिची नि माझी, रस्त्यात भेट झाली ,
गेली हवाच माझी , अन बोबडी ही वळली ,
जेव्हा ...
.. !!
Amazing ghost romance
उत्तर द्याहटवाThank you. Keep enjoying
हटवाWah ….
उत्तर द्याहटवा😊
हटवा👍
उत्तर द्याहटवाThanks
हटवा👍
उत्तर द्याहटवाThanks
हटवाNice Trupti
उत्तर द्याहटवाThank you. 😊
हटवा