Fool... to.... Cool

 लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर

        आज  १ एप्रिल, महिन्याचा पहिला दिवस , 'एप्रिल फूल बनाया , तो  उनको गुस्सा आया'  नवरा आरशासमोर केस विंचरताना मजेत गाणं गुणगुणत होता आणि मी किचनमध्ये ओट्याजवळ, उकाड्याने हैराण होत, नाष्ट्यासाठी  थालीपीठ बनवत होते, मनात राग उसळत होता, मला fool बनवण्यासाठी तुम्हांला १ एप्रिलची काय गरज आहे ! घरात मदत करायला नको म्हणून ऑफिस मध्ये काम आहे, असं सांगून घरातून पळ काढता , ते मला कळत नाही का ! माझी आतल्या आत धुसफूस चालू होती . 

     पूर्वी घरात सासू-सासरे होते त्यामुळे बोलायची सोय नव्हती,  भीतीने शब्द घशातच अडकायचे, आता त्यांची डायरेक्ट वर बदली झाली आहे, पण 'खायला आधी आणि कामाला कधीतरी 'ही नवऱ्याची आणि मुलाची सवय माझ्या अंगवळणी पडली आहे .                  

         घड्याळात पहिले तर ८.३० वाजले होते ,म्हणजे तिच्या येण्याची वेळ झाली, उगाच तिच्यासमोर शाब्दिकयुद्ध नको, असे  मनाशी म्हणत मी पुढील कामे करू लागली. सतीशला नाष्ट्यासाठी थालीपीठ आणि ऑफिसचा डबा डाईनिंग टेबलवर ठेऊन दिला, माझा ऑफिसचा डबा भरला आणि कॉलेज मधून आल्यावर, संजूसाठी दुपारचे जेवण डब्यात ठेऊन मी आवरण्यासाठी रूमकडे वळले. मी  घड्याळात पहिले तर ८.४५ वाजले होते, तरी ही  अजून आली नाही, मला ९.३० ला निघायचे असते, ठाऊक आहे तिला, ऑफिसला  १० चे 'biometric attendance' आहे, ते चुकायला नको. आज महिन्याचा पहिला दिवस, मला वेळेवर पोहचायचे आहे, मी स्वतःशीच पुटपुटत होते, शेवटी मी तिला फोन केला .  अगं काय झालं ? कुठे पोहचलीस तू ? ८.४५ झालेत; ९.३० मला निघायचे असते; काल बोललीस, ताई उद्या महिन्याचा पहिला दिवस; लवकर येते आणि अजून तुझा पत्ता नाही;  ती काही बोलण्याच्या आताच मी तिच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरु  केला.                   

           " ताई, आज माझ्याकडे पाणी आले नाही", ती शांतपणे म्हणाली . पण त्याचा इथे काय संबंध ? मी जरा रागानेच  विचारले.

 "ताई, तुम्हीं कसं म्हणता , एकदा का माझा वरचा 'बंगला' फिरला, की मी कुणाचेही ऐकत नाही , तसं आज माझा  वरचा 'बंगला' फिरला म्हणून मी पण कुणाचे ऐकले नाही, सरळ सुट्टी घेतली .

   म्हणजे, सकाळी 'एप्रिल फूल बनाया' हे गाणं नवरा माझ्यासाठी गात होता तर......आता  माझा बंगला फिरायची वेळ आली होती, खूप चिडले, खरंतर  मार्च ending ची कामे करून मी दमले होते,  ठरवलं,  आज सरळ सुट्टी घ्यावी आणि आराम करावा. सोफ्यावर बसून साहेबांना 'व्हाट्सअँप मेसेज ' पाठवला  ' I will not come today due to health issue ' .  

     मोबाईल मध्ये Contact list बघतांना मला रमाचा नंबर दिसला, तिला भेटून जवळपास ४ ते ५ वर्ष उलटली होती.  रमा माझी मावसबहीण, कल्याणला शिवाजीचौकला राहते. माझ्याहून दोन वर्ष लहान; पण आम्हां दोघींचे खूप पटायचे; अगदी  एकमेकावाचून पान हलायचं नाही; ती लहानपणी शाळेला सुट्टी पडली की दुसऱ्या दिवशीच आमच्या घरी यायची ते अगदी शाळा सुरु होईपर्यंत रहायची; चांगला महिना-दीड महिना आमच्यकडे मुक्काम असायचा; तरीदेखील घरी जाताना  तिच्या डोळ्यांत पाणी यायचे. मी मनाशी पक्कं ठरवलं, आज तिला 'sweet surprise ' देऊया, नाहीतरी सकाळी फजिती झाली आहेच निदान दुपार तरी आनंदात घालवूया. मी राहते ठाण्याला, रिक्षाने ठाणा स्टेशनला जायला १० मिनिटे, पुढे ट्रेनने कल्याणला जायला ३० मिनिटे आणि कल्याण स्टेशनवरून रिक्षाने शिवाजीचौकला जायला ७-१० मिनिटे म्हणजे  साधारण एका तासात मी तिच्या घरी पोहचेन. 

         घड्याळात पहिले तर १०.00 वाजले होते . मीरा, रमाची गोड मुलगी आता कॉलेजला जायला निघाली असेल, रमा देखील कामात बिझीअसेल, मी पण झटपट आवरते आणि तडक कल्याणला जायला निघते .           

           घरातून निघताना  १०.३५ वाजले होते. सुदैवाने रिक्षा बिल्डिंगच्या गेटजवळ मिळाली,  ट्रॅफिक पण नव्हते , अगदी १० मिनिटांत स्टेशनला पोहचली, तिकीट घेतले आणि प्लॅटफॉर्म  नंबर २ कडे वळली .  मी  ११.०२ च्या कल्याण ट्रेन मध्ये चढली, ट्रेन बऱ्यापैकी खाली होती, मला खिडकी जवळची जागा मिळाली, मी चटकन जागेवर बसली, ट्रेन सुटली तसं माझं मन भूतकाळात गेलं , कल्याण कधी आलं मला  कळलेच  नाही.  स्टेशनच्या बाहेरच रिक्षांची रांग होती , शिवाजी चौक सांगून मी रिक्षात बसले . माझ्या मनात धाकधूक वाढू लागली, उत्साहाच्या भरात मी तिला फोन केला नव्हता, आता जरss ती घरी नसली तर ........ आपल्या आनंदावर विरजण पडेल.  पण ,आता विचार करून काय उपयोग ? बराच उशीर झालाय! कारण रिक्षा तिच्या सोसायटीच्या आत आली आहे .  रिक्षाचे भाडे  देऊन , मी बिल्डिंगच्या लिफ्टमध्ये चढली , ३rd  floor चे बटन दाबले, आता मात्र मला भिती वाटू लागली , घरात असेल ना ती ! कुठे फिरायला गेले नसतील ना ! पाहुणे वैगरे आले असतील का? विचारांच्या तंद्रीत मी तिसऱ्या मजल्यावर उतरली,  रूम नंबर ३०२ ची बेल वाजवली . तिने दार उघडले , सीमाss , किती वर्षांनी भेटतेस ! असे  बोलत तिने चक्क मला मिठीच मारली, आमच्या दोघींचे डोळे पाणावले.   स्वतःला सावरत ती म्हणाली, "ये ग सीमा , बरं केलं , सुट्टी घेऊन माझ्याकडे यायचा बेत केलास, खायला काय बनवू ? गोड शिरा की तिखट शिरा , फोन केला असता तर बनवूनच ठेवला असता.

     "आता काही नको ,  मी सकाळी थालीपीठ बनवले होते, ते खाऊनच निघाली आहे,  तू फक्त सरबत बनव", मी तिला म्हणाले.  मग, जेवणासाठी वेगळं काय बनवू ? ती पुन्हा विचारू लागली. मी घरी, नवऱ्याची आणि मुलाची  फर्माईश पुरी करत असते आणि आज रमा माझी फर्माईश विचारात होती , मला खूप बरं वाटलं, पण तिला सांगितले, जेवण बनवण्यात वेळ घालवू नको , काहीतरी बाहेरून मागावूया, आज आपण फक्त गप्पागोष्टी करूया, पाचच्या सुमारास मला निघावं लागेल, घरची उरलेली काम करायला !      

          बरं, मी आवळ्याचे थंडगार सरबत करून आणते, तोपर्यंत हात-पाय धुवून घे, ट्रेनमधून आली आहेस आणि गरम ही फार होतंय असे बोलून  ती किचनकडे वळली आणि मी बाथरूमकडे, तोच 'doormat' वरून तिचा पाय सरकला.  धप ss असा  जोरात आवाज आला, मी चटकन बाथरूम मधून बाहेर आले आणि पहाते तर काय ! रमा उताणी पडली होती.  मी चटकन पुढे होऊन तिला उठायला मदत केली. रमा, तुझ्या डाव्या पायाच्या घोट्याजवळ मार लागला आहे असे वाटते , कारण तो भाग थोडा लालसर झाला आहे, हाताला काही दुखापत झाली आहे का ? मी विचारू लागली . 

 "काही दुखापत झालेली नाही, घाईघाईत पाय सरकला, बसं, निमित्त झालं, तू बैस, मी सरबत आणते" , रमा म्हणाली.

      मला चिंता वाटू लागली, तेवढ्यात तिने आवळा सरबत करून आणलं, माझं लक्ष तिच्या पायाकडे होतं, पाय दुखत आहे का ? तुझ्या चालण्यात फरक जाणवतोय, मी तिला विचारले.

 "काही विशेष नाही गं , रात्री झोपतांना मलम लावीन आणि पाय शेकवीन, तू काळजी करू नकोस, सरबत पी", ती म्हणाली .

  खरंतर सरबत गोड होतं, पण ... माझ्या तोंडाची चव मात्र कडू झाली होती. 

       "रमा , पाय सुजतोय, आपण डॉक्टरकडे जाऊया", मी  तिला म्हणाले .

      "अगं, डॉक्टर आता नको, सीमा तू उगाच काळजी करतेस ", ती विषय टाळू लागली.

     रमा, आपण चाळीशी पार केली आहे, आपली हाडं आता मजबूत नाहीत, पाय सुजतोय म्हणजे 'fracture' असण्याची शक्यता आहे, तू orthopedic doctor चा नंबर सांग, मी फोनवर अपॉइंटमेंट घेते, आपण पटकन जाऊया. एकदा डॉक्टरांनी पहिले, की मनाला निश्चिंती, माझ्या या बोलण्यावर तिने Dr. Bapat यांचा नंबर दिला, घड्याळात पहिले तर , १.१० वाजले  होते, मी चटकन नंबर  'dial'  केला तसा पलीकडून आवाज आला, लगेचच पेशन्टला घेऊन या, डॉक्टरांचे भाऊ आले आहेत, ते घरी जायला निघणार आहेत .  

            मी सोसायटीच्या वॉचमनला रिक्षा आणायला सांगितली व रमाला घेऊन तडक क्लिनिकला गेली. डॉक्टर, रमाच्या परिचयाचे होते, त्यामुळे मी निर्धास्त झाले. डॉक्टरांनी प्रथम X-ray काढायला सांगितला, X-ray हातात आल्यावर ते पुढे म्हणाले "रमाताई , fracture नाही पण ligament tear झाले आहेत , पायाची सूज उतरायला १५-२० दिवस लागतील, तरीही एक ते दिड महिना तुम्हांला आराम करावा लागेल, गोळ्या आणि मलम लिहून देतो, १५ दिवसांनी पाय दाखवायला या, घाबरायचे कारण नाही . 

            डॉक्टरांचे बोलणे ऐकताच माझा चेहरा झर्रकन उतरला, रमाला 'surprise ' दयायला आले नसते तर हा प्रकार घडलाच नसता, मी स्वतःला दोष देऊ लागले.  डॉक्टरांनी, रमाकडे माझी चौकशी केली.  रमाने, ही माझी मावसबहीण सीमा,  ठाण्याला रहाते, Telephone Exchange ला कामाला आहे असे सांगितले .  Telephone Exchange हे नाव ऐकताच डॉक्टर म्हणाले , " माझा मामेभाऊ पण तेथे कामाला आहे , असे म्हणून त्यांनी शिऱ्या, अरे इकडे ये , तुझ्या डिपार्टमेंटच्या मॅडम आल्या आहेत. डॉक्टरांचे भाऊ रूमच्या दारात  उभे राहिले, त्यांना पहाताच माझे अवसान गळाले कारण ते आमच्या department चे head-clerk म्हणजे शिरीष साहेब होते. आजच सकाळी मी त्यांना 'I will not come today, due to health issue’ असा message पाठवला होता आणि ते माझ्यासमोर दत्त म्हणून उभे, काय बोलावं मला कळेचना, पोटात भितीचा गोळा उठला.

         शिरीष साहेब हसत म्हणाले, "मी ह्यांना ओळखतो, सौ . सीमा भागवत, Account department ला त्या आहेत". माझी मान शरमेने खाली गेली, एखाद्याची चोरी पकडल्यावर  कशी त्याची अवस्था होते, तशी आता माझी अवस्था झाली होती. मी साहेबांना 'sorry' म्हणाले, ते हसले . मी पुढे बोलू लागली, मागील दोन महिने, सतत काम करून मी दमले होते , त्यातच सकाळी बाईपण कामाला आली नाही, खूप राग आला, सरळ सुट्टी मागितली असती तर तुम्हीं कदाचित आढेवेढे घेतले असते म्हणून मेसेज पाठवला, मी एका दमात सारं काही खरं खरं सांगितलं.

        सर , डॉक्टरांना म्हणाले, " आमच्या सीमा मॅडम हुशार आहेत , कामात कुठलीही चालढकल नाही , perfectionist आहेत". ते माझ्याकडे वळून म्हणाले,"मॅडम, तुमचा मेसेज बरोबर होता, 'health issue ' पण तो कुणाचा हे लिहिले नव्हते , त्यांच्या या बोलण्यावर आम्हीं सारे हसू लागलो . क्लिनिक मधून निघताना सहज घडयाळाकडे नजर गेली, २.४० वाजले होते , आमच्यामुळे तुम्हांला जेवायला उशीर झाला , रमा बोलली .

       तुमचेही जेवण राहिले आहे ना ? शिरीष सर माझ्याकडे आणि रमाकडे बघून विचारत होते .  "हो, आता घरी जाताना पार्सल घेऊन जातो", रमाने  सांगितले  .

        "थांबा आता ! समोरच्या हॉटेल मधून जेवण मागवतो, जेवूनच घरी जा", सर म्हणाले. मी सरांकडे बघतच राहिले, नेहमी कडक आणि शिष्ट वाटणारे सर आज मवाळ आणि प्रेमळ वाटत होते, शेवटी न रहावून मी विचारले, "सर , तुमचा खरा चेहरा कोणता" ?  "मॅडम ऑफिसमध्ये कडक आणि ऑफिसच्या बाहेर मात्र मनमिळाऊ , आपण सरकारी कर्मचारी आणि सगळे तुमच्यासारखे कामात चपळ नसतात, काही लोक कामात टंगळ-मंगळ करतात, आपले काम दुसऱ्यावर ढकलतात आणि त्याहून complaint करायची सोय नाही,  कारण सरकारी यंत्रणेमार्फत नियुक्त  झालेले असतात, जर का ऑफिसमध्ये कडक राहिलो नाही तर लेकाचे मलाच कामाला लावतील",  हसत हसत सर सांगू लागले .                    

       जेवणानंतर सरांना आणि डॉक्टरांना ' थँक यू ' म्हणून आम्हीं निघालो .

      घरी पोहचलो तेव्हा ४ वाजले होते, "रमा सॉरी, माझ्यामुळे तुला त्रास झाला", तिचे हात मी हातात घेत  म्हणाली.

       चल, वेडाबाई कुठली ! मनासारखं घडायला आपण काय ब्रह्मदेवाच्या मुली आहोत, आम्हीं दोघी हसू लागलो.  तेवढ्यात बेल वाजली, मीरा आली, मला पहाताच खुश झाली, मावशी तू दोन दिवस रहा , म्हणून हट्ट करू लागली, तिला शांत करत मी घडलेला वृत्तांत सांगितला.

       मीरा सांगू लागली,"  आई सतत काम करत असते , बाबा सकाळी लवकर ऑफिसला जातात  आणि मी कॉलेजला जाते, तिची धावपळ होत असते, ती विश्रांती पण घेत नाही, म्हणून देवाने  तिला सक्तीची विश्रांती दिली आहे ".  मावशी, तू काळजी करू नकोस कारण आजच माझी परिक्षा संपली आहे, उद्यापासून  मला सुट्टी, हे मीराचे बोलणे ऐकताच मला हायसे वाटले. तिने बनवलेला चहा पिऊन मी  सहा वाजता निघाले .           

       ट्रेनमध्ये बसल्यावर, माझ्या डोळयासमोर घरचे चित्र दिसू लागले. सकाळी रागारागात काही कामे टाकून निघाले होते, ती कामे माझी वाट बघत असतील,  रात्री जेवणासाठी काय करावं ? संजू कॉलेज मधून आला असेल, सतीशपण तासाभरात येतील, विचारांच्या तंद्रीत मी  घरी  केव्हा पोहचले, कळलंच नाही.  मी बेल वाजवली , संजूने दरवाजा उघडला, काय आश्चर्य ! घरातील सर्व कामे झाली होती, वस्तू जागच्या जागी लागल्या होत्या, घर अगदी नीटनेटकं होते, कामे संजूने केली का तिने संध्याकाळी येऊन केली , मला कळेचना . 

   किचन मधून लसणीच्या फोडणीचा घमघमाट येऊ लागला, आत कोण आहे ? हे पाहण्यासाठी  मी किचनकडे वळली, तर सतीश माझ्या आवडीचे झणझणीत पिठलं बनवत होते. मला पहाताच म्हणाले, " सीमा, तांदळाच्या सात भाकऱ्या आणून ठेवल्या आहेत , थोडा भात देखील  कुकरला लावला आहे, आणि पिठलं; पुरेल  ना आपल्याला! रमाने फोन करून मला सारं सांगितलं आहे. सतीश पुढे सांगू लागले , "आज  तुला  'sweet surprise' देऊया म्हणून ऑफिस मधून लवकर घरी आलो , सारी कामे केली आणि जेवणपण  बनवले ", मी सतीशकडे बघतच राहिले .

     तू दमली आहेस ना ! जा फ्रेश हो, तोपर्यंत मी जेवण डाईनिंग टेबलवर ठेवतो. मी बाथरूमकडे वळली , सतीश गाणं गुणगुणू लागले  ,' एप्रिल फूल बनाया , तो .....

गाणं  ऐकताच मी नकळत रडू लागले.          


Click here to go back to themarathistory.com

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जमलं रे जमलं

आणि माझा . . . झाला

चला, श्रीमंत होऊया ...! 💰