जमलं रे जमलं
लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर
‘शुभ मुहूर्त’ या वधू -वर सूचक मंडळाने मुलामुलींना भेटता यावे, बोलता यावे यासाठी एका हॉलमध्ये 'पहाण्याचा' कार्यक्रम आयोजित केला होता. त्या ठिकाणी शारदाकाकू, त्यांचे यजमान आणि त्यांचा मुलगा राघव गेले होते . तेथे बरचसे पालक मुलामुलींसहीत आले होते, मंडळाचे कार्यकर्ते नोंदणी करून हॉलमध्ये पाठवत होते, काही कार्यकर्ते लोकांना बसवण्याची तसेच चहा -पाण्याची व्यवस्था पहात होते . राघवला हा कार्यक्रम नवीन नव्हता, कारण जवळपास दीड वर्ष तो अशा मंडळात जात होता पण अजून त्याच्या लग्नाचे सूर काही जुळत नव्हते.
राघवने BCom, MBA केले आणि तो आता एका बँकेत काम करत होता . शारदकाकूंना राघव हे एकच अपत्य होते . कालपर्यंत स्वतःचे घर ही कल्पना त्याला माहित नव्हती, आज सकाळी मंडळामध्ये एका मुलीने तुम्हीं
आईवडिलांबरोबर राहता पण, तुमचे स्वतःचे घर आहे का? असा प्रश्न
त्याला विचारला होता. थोड्यावेळाने तो
दुसऱ्या मुलीला भेटला, ती जॉब करणारी होती , शिष्टाचाराला अनुसरून तो म्हणाला, " पहिले तुम्हीं
बोला" , formal बोलणे झाल्यावर
तिने विचारले , तुम्हांला स्वयंपाक करता येतो का ? कितपत येतो? राघव न चिडता शांतपणे म्हणाला," मला मस्तपैकी कारल्याची भाजी बनवता येते
, तुम्हीं रोज डब्याला कारली न्याल का" ?
या दोन पहाण्याच्या
कार्यक्रमातच तो वैतागला , घरी जाऊया असे तो शारदाकाकूंना म्हणाला. शारदाकाकू शांतपणे त्याला म्हणाल्या ,"अरे,
आणखी एक-दोन मुलींना भेट, कदाचित त्यातली एखादी तुला आवडेल” पण त्याने ठामपणे नाही, असे म्हणताच
त्या नाईलाजाने निघाल्या. घरी जाताना , राघवने रस्त्यात देवाची पालखी जाताना बघितली, पालखीच्या पुढे काही संन्यासी साधू भगवे कपडे घालून टाळ वाजवत चालले होते, त्यातील काहींचे कपडे थोडे मळलेले होते तर काहींची दाढी वाढलेली होती तर
काहींचे केस लांब होते , ते पाहून राघवला हसू आले . तो शारदकाकूंना म्हणाला," पाहिले का आई ! संसारात न पडल्यामुळे त्यांना वेशभूषेचे काहीच महत्व वाटत
नाही आणि त्याच्या उलट बाबांना जराही मोकळीक नाही कारण त्यांच्या प्रत्येक
हालचालीवर तुझे बारकाईने लक्ष असते .
राघव, अगदी बरोबर ! राघवचे बाबा रागाच्या स्वरात बोलले.
तशा शारदाकाकू चिडून म्हणाल्या , “त्या साधूंना कंदमुळे खावी लागतात, आणि मी तुम्हांला चमचमीत , गोडधोड , नॉनव्हेजचे पदार्थ खायला घालते , हे लक्षात ठेवा ” त्यावर ते दोघेही गप्प बसले .
आजकालच्या मुलामुलींना
झाले आहे तरी काय ? compromise, adjustment हे शब्द त्यांच्याकडे नाहीच, प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या, मागण्या वेगळ्या, कठीण काळ आला आहे आता! शारदाकाकू सकाळच्या प्रसंगामुळे नाराज होऊन स्वतःशीच बोलत होत्या. दुपारचे जेवण उरकून राघव विश्रांती
घ्यायला त्याच्या रूममध्ये गेला , सकाळच्या प्रश्नांमुळे तो बैचेन झाला होता , शहरात स्वतःचे घर
, नोकर , bank balance , गाडी , किती मागण्या. या सर्व गोष्टी माझ्याकडे असायला मी काय कुबेराचा मुलगा आहे का? नकोच ते लग्न ! असे पुटपुटत राघवने mobile उचलला .
You tube बघताना त्याला काही वर्षांपूर्वीचा 'कही ना कही कोई है' हा कार्यक्रम दिसला. राघव मनात म्हणाला, कार्यक्रमात मुलं-मुली किती प्रेमळपणे बोलतात, हसतात, सगळे कसे छान वागतात पण real life म्हणजे फक्त व्यवहार. पुढे त्याला एक सुंदर कार्यक्रम दिसला , हॉलची सजावट पहाता राघवला वाटले की, एखाद्या उद्योगपतीच्या मुलाचा लग्नाचा video असावा, हॉलमधील माणसांचा भरजरी पोशाख, सौंदर्यवान मुली, हे पाहून तो क्षणभर स्तब्ध झाला. इतक्यात नारायण, नारायण असा आवाज येऊ लागला आणि नारदमुनी मंचावर आले. कार्यक्रमाची सुरवात गणेशस्तवनाने झाली, राघवला कुठला कार्यक्रम आहे याचा अंदाज येईना पण, हॉलची सजावट पाहून तो खुश झाला आणि मनोमन लग्नाचे मनसुबे रचू लागला. त्यानंतर नारदमुनी पुढे म्हणाले, "आता मंचावर एकेक करून मुला-मुलींनी या आणि आपली ओळख सांगा".
हे बहुधा नाटक असावे व त्यात नारदमुनी होस्ट आहेत असे राघवला वाटले . आता पुढे काय ? या उत्सुकतेने त्याने कार्यक्रम सुरु ठेवला.
दोन राजपुत्रासारखी दिसणारी
मुले मंचावर चढली, त्यांनी आम्हीं गजाननपुत्र क्षेम आणि लाभ आहोत अशी ओळख करून
दिली.
प्रेक्षकांतून एक
सौंदर्यवान मुलगी उभी राहिली, ती मंद स्मित करत म्हणाली, "गजानन बुद्धीचे देवता आहेत, कुठलाही प्रश्न चुटकीसरशी सोडवतात" ,गजाननपुत्रांनी मानेने होकार दिला. तिने पुढे विचारले, लग्नानंतर सासू-सुनेच्या भांडणात तुम्हीं कोणाची बाजू घ्याल? या प्रश्नावर ते भांबावले, काय उत्तर द्यावे त्यांना सुचेना, त्यांनी वडिलांकडे नजर टाकली, गणपती बाप्पाचा चेहरा चिंताग्रस्त झाला, ते पाहून दोघेजण
मंचावरून उतरून खाली येऊन बसले.
अशा
बेधडक सुरुवातीमुळे हॉलमध्ये भयाण शांतता पसरली. रागिणीपेक्षा ही मुलगी जरा जास्तच फास्ट आहे, असे राघवच्या
मनात येऊन गेले .
त्यानंतर एक मुलगी मंचावर
आली, तिचा ड्रेस अगदी रागिणीच्या ड्रेससारखा होता. रागिणी, तिला मी सकाळी वधू-वर मंडळात भेटलो, किती सुंदर दिसत होती ती! पण तुमचे स्वतःचे घर आहे का? या प्रश्नावर तिने मला निरुत्तर केले. मनात आले, तिला खरं सांगावे की, मी गव्हर्नमेंटच्या म्हाडा योजनेत फॉर्म भरलेला आहे, तुमचे नशीब जर
अनुकूल असेल तर माझा नंबर लगेचच लागेल , आता सारे काही तुमच्यावर अवलंबून आहे. अरे! रागिणीच्या विचारात ही मुलगी काय बोलली? ते मी ऐकलेच नाही. राघव कार्यक्रम मागे करण्याचा प्रयत्न करत होता पण, काही केल्या होतच नव्हता, शेवटी मागच्या मुलीच्या नादात पुढची मुलगी miss होऊ नये, असा विचार करत त्याने कार्यक्रम continue केला .
त्यानंतर तीन राजबिंडासारखी दिसणारी मुले मंचावर आली. त्यांनी आपली ओळख इंद्रपुत्र अशी करून दिली . प्रेक्षकांतून एक विचारणा झाली , देवांचे देव
इंद्रदेव , इंद्रपद प्राप्त करण्यासाठी आजपावेतो अनेकांनी यज्ञ , जप, तप, केले आहेत परंतु ते पद कोणीही प्राप्त करू शकले नाही , हे ऐकून पहिल्या
रांगेत बसलेल्या इंद्रदेवाचा चेहरा खुलला . इंद्रपदाची हाव नाही पण उप इंद्रपद मिळेल याची काही योजना आहे का ? या प्रश्नावर
इंद्रदेव मागे वळून प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला पाहू लागले, त्यांचा चेहरा काळाठिक्कर पडला होता. ते पाहून राघवला हसू आले आणि मनात विचार आला की, संपत्ती आणि सत्तेची हाव
देवांनादेखील सोडवत नाही . तेवढ्यात प्रेक्षकांतून दुसरा आवाज आला , आम्हांला
इंद्रपद वैगरे नको फक्त सोमरस life time मिळेल अशी व्यवस्था करा , या वाक्यावर एकच हशा पिकला . सुरेंद्र हसत म्हणाले ," अच्छा है ,बहुत अच्छा है ". निखळ मनोरंजन होत आहे या एकाच उद्देशाने मी कार्यक्रम पहात होतो.
त्यानंतर एक सुंदर गोरीपान
मुलगी मंचावर आली. तिने सर्वांना हसून अभिवादन केले . ती छान होती पण सौंदर्यात रागिणी तिच्यापेक्षा सरस होती. माझी रागिणी, छे माझी कसली ! साधी , सरळ मुलगी म्हणून लग्नासाठी विचारले, तर आई-वडिलांबरोबर .... म्हणजे स्वतःचे घर .... एव्हाना तिने स्वतःचे घर असलेला मुलगा life partner म्हणून निवडला असेल 😡. पण, मी तिचा इतका का विचार करतोय ?
त्यानंतर मंचावर
आलेल्या मुलाने आपली ओळख वरुणपुत्र अशी
करून दिली . तो पुढे म्हणाला ," आम्हीं फक्त स्वर्गातच नाही तर पृथ्वीलोकात देखील प्रसिद्ध आहोत, माणसे आमची आतुरतेने वाट पहात असतात ”.
प्रेक्षकांतून आवाज आला - गरज असताना, पण तुम्हीं काय ! केव्हाही बरसता.
वरुणपुत्र पुढे म्हणाला ," नुकतीच आम्हीं World -Tour केली ” .
पुन्हा प्रेक्षकांतून आवाज आला , म्हणून तर जगभर पूर आलेला होता, त्यानंतर जोरदार टाळ्या आणि शिट्या .
तेवढ्यात एक मुलगी बोलली,
पावसात नाचतो ,मोर आनंदाने
बहरूनी जाते सृष्टी, हिरव्या रंगाने
वरुणराजा देत असतो , अमृत
आणि त्यामुळे सृष्टी , होते
तृप्त
जमलं रे जमलं , टाळ्यांचा कडकडाट झाला. ती लाजून खाली बसली.
आता यानंतर मुलीचा नंबर असेल, प्रत्येकाला भेटून विचारण्यापेक्षा , मंचावर आपली ओळख सांगावी , it's good idea राघव स्वतःशीच
बोलत होता.
मी विचार करताना एक मुलगी मंचावर आली . मला एक गोष्ट जाणवली की, मंचावर येणाऱ्या प्रत्येक मुलीमध्ये मी रागिणीचा चेहरा
शोधत होतो, तिचे लांबसडक केस , पाणीदार डोळे , तिचा गोरापान , सुंदर चेहरा माझ्या नजरेसमोरून जातच
नव्हता , नको तिचा विचार नकोच, मी मनाशी पक्के ठरवले .
अचानक कार्यक्रमात वादळ आल्यासारखे झाले, मंच हलू लागला, त्याबरोबर आवाज आला, 'हर ,हर , शंभू , शिव , महादेवा' आणि भोलेनाथ मंचावर आले. त्यांनी रागाने त्रिशूळ आपटला व जोरात ओरडले, "काय चालवलय तुम्हां मुला-मुलींनी? पृथ्वीवरील मानवाप्रमाणे तुमच्या अपेक्षा वाढल्यात, आई-वडिलांचे ऐकायचे नाही, त्यांचे विचार तुम्हांला जुने, कालबाह्य वाटतात, अनुभव नसताना देखील स्वतःचेच खरं करायचे, आयुष्यात तडजोड करायला शिका". अग आई, हा भोळा शंकर तुझ्यासारखा बोलत आहे .
शारदकाकूंनी राघवच्या गालावर टिचकी मारली आणि म्हणाल्या, “अरे! झोपेत mobile वर काय बघतोय” आणि काय म्हणाला, भोळा शंकर, त्याची सिरीयल
संध्याकाळी आहे.
राघवने डोळे उघडले, अरेच्या, मी स्वप्न बघत होतो तर! आणि स्वप्नात पण वधू-वरांचा कार्यक्रम, राघव गालातल्या
गालात हसला.
"रागिणीचा होकार आला", शारदाकाकू हसत बोलल्या. राघवने आश्चर्याने विचारले, तिला तर स्वतःचे घर ... शारदाकाकू राघवला थांबवत म्हणाल्या, “रागिणी एकत्र कुटुंबात राहते, त्यामुळे तुला एकत्र कुटुंब आवडते की नाही हे पहाण्यासाठी तिने तो प्रश्न विचारला”.
"मुलगी चतुर आहे तर"! राघवचे बाबा हसत म्हणाले.
अगदी माझ्यासारखी , शारदाकाकू लाजत बोलल्या.
खूप गहन विषय अगदी स्पष्ट व मनोरंजक पद्धतीने मांडलेला आहे..कदाचित प्रत्येकाचा शेवट एवढा गोड गोड होत नाही परंतु या गोष्टीमध्ये तो मनाला भावाला... उत्कृष्ट लिखाण..
उत्तर द्याहटवामनोरंजन करण्याचा छोटासा प्रयत्न , धन्यवाद 🙂
हटवाKhup chan lihile aahe
उत्तर द्याहटवाअभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙂
हटवाछान निर्मिती
उत्तर द्याहटवाप्रोत्सानाबद्दल आभारी आहे.
हटवाKhup sunder lihile aahe
उत्तर द्याहटवाअभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद .
हटवाखूप मस्त लिहिली आहेस..वाचताना डोळ्यासमोर चित्रं उभं राहिलं..इतकं सहज लिहिल आहेस..
उत्तर द्याहटवागोष्ट मनाला आवडली की डोळ्यासमोर चित्रं उभं रहातं , धन्यवाद
हटवाखूप छान मांडलाय विषय
उत्तर द्याहटवाएक छोटासा प्रयत्न , धन्यवाद
हटवाथोडक्यात मांडलेला एक व्यावहारिक विचार, सुंदर प्रयास....
उत्तर द्याहटवाYour feedback is really valuable for me. Thank you.
हटवाKhup chan
उत्तर द्याहटवाThanks for your comments. Wish you a very happy Diwali.
हटवा