जादूची डायरी.... ✍

 

लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर

  ए तनु , आता माझा नंबर ना ! तू कशी काय खेळतेस ? मी तनुच्या हातातील चिपी खेचत म्हणाले.

"शरू, तुला चान्स दिला होता, तेव्हा तू पडली आणि आऊट झाली," तनु मला चिडून म्हणाली.

"तेव्हा माझा पायात पाय अडकला आणि मी पडले , आऊट कशी काय झाली"? मी तनुला रागात विचारले.

आमच्या दोघींच्या भांडणात, आता बाकीच्या मैत्रिणी पण सामील झाल्या. आमच्या भांडणाचा आवाज ऐकून, माझी आजी बाहेर आली .

पोरींनो खेळता का भांडता ? तिचा आवाज ऐकून आम्हीं शांत झालो .

आजी पुढे म्हणाली, पोरींनो हे तुमचे मजेचे दिवस खेळा, बागडा, मजा - मस्ती करा पण भांडू नका . उद्या मोठ्या होऊन, लग्न करून सासरी गेलात कि एकमेकींचे तोंड देखील दिसणार नाही , मग बालपणीचे दिवस आठवाल आणि एकमेकींना भेटायला तळमळाल, असे बोलून आजी घरात गेली.

बाहुला - बाहुलीचे लग्न लावता लावता एक दिवस आपले पण लग्न होणारया विचाराने आम्हीं साऱ्याजणी सुन्न झालो.

दिवसामागून दिवस जात होते , शालेय जीवन संपवून , आम्हीं कॉलेजमध्ये प्रवेश केला होता . भांडणाची जागा आता समजूतदारपणाने घेतली होतीरुसवे - फुगवे, हेवे - दावे जाऊन आता एकमेकींची ओढ लागत होती .

Graduation चा पेढा आजीला भरवला, तर तिने मला मिठीच मारली.

" माझी बाहुली मोठी झाली” माझ्या गालाचा पापा घेत आजी म्हणाली. तिचे डोळे पाण्याने भरले, तिच्या बोलण्याचा अर्थ माझ्या लक्षात आला, नकळत माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळले. त्या रात्री तिने मला चार समजुतीच्या गोष्टी सांगितल्या.

आजी म्हणाली, “लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, पण ते टिकवणे आपल्या हातात आहे, आपल्या हाताची पाच बोटे देखील सारखी नसतात मग सर्वांचे स्वभाव सारखे कसे असणार " ?

संसार म्हणजे रथाची दोन चाकं , नवरा आणि बायको , जर चाकं एकमेकांबरोबर राहिली, तरच रथ पुढे जाईल आणि चाकांनी एकमेकांची साथ सोडली तर मात्र रथ भरकटला जाईल, आजी मला समजावून सांगत होती. तिचे बोलणे ऐकता ऐकता, मला कधी झोप लागली ते कळलेच नाही.

त्यानंतर मी लवकरच बोहल्यावर चढले आणि सप्तपदी चालत माहेर सोडून सासरी आले .

मुंबईतील गिरगांव येथे आमचे 'छोटेखानी' घर, त्यात सासू-सासरे, आम्हीं दोघे आणि त्यांची लहान बहीण राहत होतो . मी खूप बोलणारी, मनात आडपडदा न ठेवणारी तर प्रकाश म्हणजे शांत, अबोल त्यामुळे मला त्यांच्या मनाचा थांगपत्ता लागत नव्हता.

मनात स्वप्न घेऊन मी सासरी प्रवेश केला , पण स्वप्न लवकरच विरून गेले आणि सत्य समोर आले . सासूबाईंचे सततचे आजारपण, पैशांची कमतरता त्यातून होणारे वाद हे पाहून मी नोकरी करू लागले . त्यानंतर प्रतीकचा जन्म, मग तर आयुष्य जणू काही 'तारेवरची कसरत' झाले. आजी म्हणायची, लग्न झाल्यावर मैत्रिणींची आठवण येईल , पण ती आठवण काढायला वेळ कुणाकडे होता ? मला तर दिवसाचे २४ तास पण अपुरे पडायचे .

कधी कधी वाटायचं , धावत जावं आणि आजीला सांगावं ' भातुकलीचा खेळ आणि संसाराचा खेळ खूप फरक आहे' , पण तोपर्यंत तिने जगाचा निरोप घेतला होता. बाहुला - बाहुलीच्या लग्नात दुःख , वेदना या गोष्टीनां जागाच नसते , पण खऱ्या लग्नात 'सुख - दुःख' लपंडाव खेळत असतात .

प्रकाश weekend ला म्हणजे दर ' शनिवारी ' डायरी लिहीत असत , ते त्यांचं personal होतं , त्यामुळे डायरीला हात लावण्यास सक्त मनाई असे . कितीही उशीर झाला तरी डायरी लिहिल्याशिवाय ते झोपत नसत . मला नेहमी वाटे , जिवंत माणसाशी बोलण्यापेक्षा त्यांना निर्जीव गोष्टींशी बोलायला जास्त्त आवडते.

माझ्या मनात अस्सा राग उफाळून यायचा , मला शोभा गुर्टुचें 'माझिया प्रियाला प्रीत कळेना ' हे गाणे आठवायचे .

' लग्नाचा वाढदिवस ' म्हणजे जून महिन्यातील एक तारीख इतकेच काय ते महत्त्व! कालांतराने सासू - सासऱ्यांना देवाज्ञा झाली, प्रतीकचे शिक्षण पूर्ण झाले, पण या साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडताना लग्नाची २५ वर्षे कशी गेली, मला कळलेच नाही.

पूर्वी कधीतरी मला वाटायचे ; जरा निवांत बसूया ; स्वतःला काही वेळ देऊया पण ते कधीही शक्य झाले नाही; आज घर शांत होते पण मन मात्र आठवणींनी ओसंडून वहात होते .

संध्याकाळ झाली आणि सवयीप्रमाणे चहाचा कप घेऊन मी गॅलरीत आले , गाड्यांचे आवाज , माणसांची वर्दळ , दुकानांतील गर्दी सारे काही नेहमीप्रमाणे चालू होते.

मागील २५ वर्षात सप्तपदी मधील एकही वचन मी विसरले नाही, पण प्रकाश यांनी हि वचने निभावली का ? माझे मन या प्रश्नांचे उत्तर शोधत होते ,डोक्यात विचारांचे काहूर माजले होते . मी रागाने हातातील चहाचा कप जोरात दाबला, तसा कपातील चहा डचमळला आणि माझ्या बोटांवर सांडला , बोटांना चटका लागला तशी मी भानावर आले .

तेवढ्यात मी बेलचा आवाज ऐकला ; दार उघडले ; प्रकाश आले होते.

" कुठे होतीस? किती वेळा बेल वाजवली? " प्रकाश म्हणाले.

गॅलरीत उभी होते , मी त्यांना सांगितले . माझ्या आवाजातील संथपणा पाहून त्यांनी ताडले कि माझे काहीतरी बिनसलं आहे .

चहाचा कप टेबलवर ठेवत मी म्हणाले ," तुम्हीं चहा घ्या ".

रागावलीस का ? त्यांनी विचारले .

" त्याने काही फरक पडणार आहे का? " मी म्हणाले.

त्यांचा ' चहा ' पिऊन झाला, हे पाहून मी दुसऱ्या रूममध्ये निघून गेले .

कामाच्या गडबडीत , घरातल्या माणसांच्यात, मला कधी मोकळेपणाने बोलताच आले नाही , आज वेळ होता , पणss तोंडावाटे शब्द फुटेनात . जेवताना पण फारसे बोलणे झाले नाही , डोकं दुखतंय असे सांगून मी बोलायचे टाळले. अकरा वाजले तशी मी बेडरूममध्ये गेले , शनिवार असल्यामुळे प्रकाश डायरी लिहावयास गेले .

' झोप ' देखील एक कमालीची गोष्ट आहे, जर शरीर दमले असेल तर पटकन येते पण जर का मन दमले असेल तर काही केल्या येतच नाही. प्रकाश बाजूला येऊन झोपले पण माझी झोप उडाली होती. घड्याळात दोनचे ठोके ऐकले आणि सरळ उठून बसले; पेल्यातील पाणी प्यायले; चष्मा लावला; बाहेर आले आणि हळूच बेडरूमचा दरवाजा लोटून घेतला.

प्रकाश पुस्तकांचे कपाट lock करायला विसरले होते . मी चटकन कपाट उघडले; एकाच रंगाच्या , एकाच प्रकारच्या जवळपास ११ - १२ डायऱ्या कपाटात व्यवस्थित ठेवलेल्या होत्या .

मी क्रमांक १ ची डायरी उचलली आणि आरामखुर्चीत येऊन बसले.

डायरीचे पहिले पान उघडले , त्यावर आम्हां दोघांचा पहिल्यांदा भेटलो , तो फोटो होता , बाजूला तारीख लिहिली होती व खाली वाक्य लिहिले होते ' मला आयुष्याचा सूर गवसला '. ते वाक्य वाचले आणि मी २५ वर्ष मागे गेले, तो क्षण माझ्या डोळ्यासमोर आला तेव्हा मी बावरलेली , घाबरलेली होती आणि आता ... नकळत ओठांवर हसू आले . मी दुसरे पान उलटले , त्यावर आमचा साखरपुड्याचा फोटो होता , बाजूला तारीख व खाली लिहिले होते ' आयुष्याचा जोडीदार ' .

मी तिसरे पान उलटले , त्यावर आमचा लग्नाचा फोटो होता , बाजूला तारीख व खाली लिहिले होते ' साताजन्माची सोबतीण '.

मी क्रमांक २ ची डायरी काढली , पहिल्या पानावर प्रतीकच्या जन्माच्या वेळचा फोटो होता , बाजूला तारीख व खाली लिहिले होते , ' प्रेमाच्या वेलीवर बहरलेले फूल'. मी डायरीची पाने पटापट उलटू लागली. एका पानावर मी थांबले , तो प्रतीकचा Nursery मधला फोटो होता, बाजूला तारीख व लिहिले होते, 'छडी लागे छम छम, विद्या येई घम घम'.

मी क्रमांक ४ ची डायरी काढली , त्यात माझा आजारी असतानाचा फोटो होता , तो फोटो पाहून मी नकळत भूतकाळात गेले. तेव्हा सासूबाई अंथरुणाला खिळल्या होत्या प्रतीकची शाळा , माझं ऑफिस हे सारे करता करता माझा जीव मेटाकुटीला यायचा . घरात ताण - तणावाचे वातावरण होते , प्रकाश एकही शब्द बोलत नव्हते त्यामुळे माझी चिडचिड व्हायची , मला वाटायचे , किती असंवेदनशील माणूस आहे हा ! मी एक दीर्घ श्वास घेतला व स्वतःशी पुटपुटले, तेही दिवस निघून गेले.

मी फोटो खालील वाक्य वाचले ,' शरयू , मी तुझा ऋणी आहे ' वाक्य वाचताना टचकन माझ्या डोळ्यात पाणी आले, त्यांनी मनातील भावना डायरीत व्यक्त केल्या होत्या .

एखाद्या लहान मुलाला खूप खेळणी मिळाल्यावर, ते कसे भांबावून जाते तशी माझी अवस्था झाली होती

मी क्रमांक ८ ची डायरी काढली, प्रतीकने बारावीला ८७% मार्क्स मिळवले, तेव्हा शाळेतर्फे त्याचा सत्कार झाला होता , तो फोटो डायरीत चिकटवलेला होता'मी फक्त नावाचा प्रकाश, पण तू आमच्या जीवनाचा खराखुरा प्रकाश' असे वाक्य फोटोखाली लिहिले होते.

घड्याळाचे टोले पडत होते , रात्र हळूहळू पुढे सरकत होती पण मी मात्र हळूहळू मागे जात होते .

मी क्रमांक १० ची डायरी कपाटाबाहेर काढली , काही पाने उलटल्यावर मला सासऱ्यांचा फोटो दिसला , त्यांच्या मृत्युची तारीख बाजूला लिहिली होतीखालील वाक्याची शाई पसरली होती , बहुतेक त्यांच्या डोळयातील अश्रू त्यावर पडले असावेत , त्यामुळे अक्षरे अस्पष्ट झाली होती.

सुखाचा प्रसंग असो वा दुःखाचा प्रसंग असो , रोमांचक क्षण असो वा हळवा क्षण असो , प्रकाश यांचा चेहरा नेहमी निर्विकार असायचा, मला नेहमी वाटायचे , किती भावनाशून्य माणूस आहे हा ! पण मी चुकीची होते , कदाचित त्यांना समजून घेण्यास मीच कमी पडले असावी.

मला समोरचे काही दिसेना कारण डोळयात अश्रूंची दाटी झाली होती , मी चष्मा काढला , डोळे पुसले व पुढच्या नंबरची डायरी उचलली . पाने उलटताना मी अचानक थांबले, डायरीतील फोटो आमच्या राहत्या घराचा म्हणजेच नवीन घराचा होता , घरात शिफ्ट झालो त्यादिवशीची तारीख लिहिली होती , खाली लिहिले होते ' आमचं घरकुल '.

नवीन घरात शिफ्ट झाल्यावर मी नोकरी सोडली व प्रतीकवर पूर्ण लक्ष केंद्रित केले . तो Software Engineer झाला आहे , त्याला बँगलोरला मोठ्या IT firm मध्ये जॉब मिळाला आहे, सोमवार पासून तो जॉईन करणार म्हणून काल सकाळी त्याला Airport ला सोडले.

घड्याळात सातचे ठोके पडले ; पक्ष्यांचा किलबिलाट चालू झाला ; माझी नजर गॅलरीकडे गेली, तेथील टेबलवर एक डायरी दिसली , मी चटकन उठले आणि गॅलरीत गेले . मी टेबलवर ठेवलेली डायरी उचलली , डायरीत पेन ठेवलेले पान उघडले , त्यावर काल सकाळी गाडीत काढलेला आमच्या तिघांचा फोटो होता , खाली लिहिले होते 'खरा संसार सुरु झाला’. जणू काही एखादा चित्रपट डोळ्यासमोर यावा, तशी मागील २५ वर्षे माझ्या डोळ्यासमोर आली .

शरयू , प्रकाश यांची हाक कानावर आली , मी चटकन हातातील डायरी पाठीमागे लपवली .

सकाळी पाहिले तर तू बेडरूममध्ये नव्हतीस , अजून राग गेला नाही का तुझा ? चहाचा कप हातात देत प्रकाशनी मला विचारले. मी हसले.

हसतेस का ? काय झाले ? त्यांनी मला विचारले .

मला ना जादूची डायरी मिळाली , असे म्हणत मी लपवलेली डायरी त्यांना दाखवली, या डायरींनी माझे समज - गैरसमज, रुसवे - फुगवे सारे काही दूर केले .

ते मला म्हणाले , "शरयू , मागील २५ वर्षात घडलेल्या साऱ्या घटनांची नोंद मी ठेवली आहे , आता पुढील २५ वर्षात घडणाऱ्या गोष्टींची नोंद तू ठेवली पाहिजे" .

आज कुठलीही तमा न बाळगता , मी प्रकाशनां कडकडून मिठी मारली .



टिप्पण्या

  1. प्रत्युत्तरे
    1. अप्रतिम लेखन. सुरेख विचार व्यक्त करून भूतकाळातील आणि वर्तमानातील नवीन संकल्पना मांडली आहेस. छान!

      हटवा
    2. मनापासून गोष्टीचा आनंद घेऊन दिलेल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद.

      हटवा
  2. अतिशय सुरेख... संपुर्ण जीवनपट अगदी मोजक्या शब्दांत व्यक्त केला आहे... विषयाची निवड अगदी सर्वांच्या आयुष्यातील....

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जमलं रे जमलं

An Evening in SwargLok