Second हनिमून... 🧡
लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर
तनयाला Bio-technology साठी पुण्याच्या गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन मिळाले, तिचे शालेय आणि ज्युनिअर कॉलेज शिक्षण कोल्हापूरला झाले होते, मे महिना तनयाच्या शॉपिंग मध्ये गेला. जूनच्या पहिल्या आठवड्यात, तनया पुण्याला जायला निघणार होती. ठरल्याप्रमाणे आज सकाळी ती पुण्याला जायला निघाली, घरातून निघाल्यापासून तनुजा तिला सारख्या सूचना देत होती, एकटी बाहेर जाऊ नको, मैत्रिणींबरोबर रहा, खाण्याकडे लक्ष दे, बाहेरचे जास्त खाऊ नको. शेवटी तनया म्हणाली,"आई आता बस, उरलेल्या सूचना मोबाईलवर पाठव". इतक्यात ट्रेनचा हॉर्न वाजला आणि ट्रेन सुटली. तुषार आणि तनुजा घरी जाण्यासाठी गाडीत बसले. इतका वेळ दाबून ठेवलेला हुंदका बाहेर पडला आणि तनुजा रडू लागली. तनुजाचे रडणे तुषारला अपेक्षित होते, कारण मागील अठरा वर्षे तनया हेच तनुजाचे विश्व होते. त्याने अनेक वेळा तनुजाला समजावण्याचा प्रयत्न केला होता, तनया आता मोठी होत आहे, तू एखाद्या नोकरीचा विचार करू शकते, तुला जर धंद्याची आवड असेल तर मी तुला नक्की मदत करीन, लायब्ररी लावतेस का? म्हणजे वाचनात रमशील, पण तनुजाने कधीही ऐकले नाही. ती दिवसभर तनया, तिचा अभ्यास, तिचा क्लास, तिचे खेळणे आणि खाणे याचाच विचार करायची आणि त्या विचारात ती कधी, कधी तुषारला पण विसरायची.
ते दोघे घरी पोहचले तरी तनुजा गप्प होती. ते पाहून तुषार म्हणाला," तनया पुढील शिक्षणासाठी, उज्वल भवितव्यासाठी पुण्याला गेली आहे, तुला तर खूप आनंद वाटला पाहिजे, आपली मुलगी independent होत आहे". तुम्हांला आईचे हृदय कळायचे नाही, असे म्हणून तनुजा आत गेली. आता डबा बनवायची घाई करू नको, मी canteen ला खाईन, असे म्हणून तुषार आवरण्यासाठी खोलीकडे वळला.
ऑफिसला जाताना त्याने तनुजाला सांगितले की, खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करू नको, नाहीतर मी तनयाला फोन करून सांगेन की, तुझी आई खात-पीत नाही, तू कॉलेज सोडून लवकर घरी ये.
तनुजा चिडून म्हणाली, "तनयाला फोन करायची गरज नाही, मी काळजी घेईन”.
तुषार ऑफिसला पोहचल्यावर, त्याच्या मित्रांनी तनयाची चौकशी केली.
सुरेश हसत म्हणाला," आता काय! फक्त राजा-राणी, नुसती मज्जा".
"आमच्या राणीसाहेब नाराज आहेत, राजकन्या दूरदेशी शिकायला गेल्या आहेत ना!" असे म्हणून तुषार हसू लागला.
"काही काळजी करू नको, वहिनी आठ दिवसात नॉर्मल होतील", प्रकाश म्हणाला. आणि सर्वजण कामाला लागले.
दुपारी लंच टाईमच्यावेळी त्याने तनुजाला फोन केला, काय जेवली? आता मूड कसा आहे? वगैरे पण तुटक -तुटक उत्तरे मिळाली.
मित्रांनी त्याला चार दिवस वहिनींना घेऊन फिरायला जा, असा सल्ला दिला. तुषारला ते पटले, तो संध्याकाळी खुशीत घरी आला. बघतो तर काय! तनुजाने वॉर्डरोब आवरायला घेतला होता आणि बेडवर कपड्यांचा डोंगर रचला होता.
मी यायच्या अगोदर हे सर्व करायचे होते, तुषार चिडून बोलला. त्या कपड्यांच्यात तुषारला ब्लू कलरची साडी दिसली, blue colour त्याचा आवडता कलर होता, लग्नानंतर त्याने तनुजाला दिलेलं ते पहिलं गिफ्ट होतं. ती साडी उचलत तो म्हणाला," तनुजा किती छान, छान साड्या आहेत तुझ्याकडे, पण हल्ली तू एकही नेसत नाही”.
तनुजा म्हणाली," ही साडी तुम्ही २० वर्षांपूर्वी दिली होती, तेव्हा मी बारीक होते, आता मला त्याचा ब्लाउज पण होत नाही”.
जशी साडी सांभाळून ठेवली तशा आठवणी पण जतन करायच्या असतात, असे बोलून तुषार फ्रेश होण्यासाठी बाथरूमकडे वळला.
या संसाराच्या रहाटगाड्यात जमेल का? सासू-सासरे, त्यांचे म्हातारपण आणि आजारपण, मुलगी व तिचे शिक्षण, दोन नणंदांची लग्ने, पाहुणे मंडळी यांतून डोके वर काढायला वेळ मिळाला का? असे बोलून ती चहा करण्यासाठी स्वयंपाकघरात गेली.
आता वेळ मिळाला आहे तर त्याचा आनंद घे, भूतकाळ आठवून वर्तमान फुकट घालवू नको, नॅपकिनला हात पुसत तो बोलत होता.
दुसऱ्या दिवशी त्याने नाटकाची दोन तिकिटे बुक केली, परवा संध्याकाळी ६ चा शो आहे, तनुजाला सरप्राईज देऊया, ती खुश होईल. मागील दोन वर्षे तनयाचे ११ वी आणि १२ वीचे महत्वाचे वर्ष म्हणून कुठेही फिरायला गेलो नव्हतो, ना नाटक, ना पिक्चर, काहीच नाही. परवा १ तास concession घेऊन लवकर घरी जातो, मग नाटक, बाहेर जेवण, मज्जा.
ठरवल्याप्रमाणे तुषार १ तास लवकर घरी गेला, तनुजाला पटकन तयार व्हायला सांगितले व दोघे थिएटरला पोहचले. गाडी पार्क करून येतो, तू गेटजवळ उभी रहा, असे सांगून तुषार गेला. गाडी पार्क करून येताना त्याला गजरे विकणारी बाई दिसली, त्याने पटकन दोन गजरे विकत घेतले, मोगऱ्याचे गजरे वा! मस्त सुगंध सुटलाय. गेटजवळ येताच त्याने तनुजाला गजऱ्याची पुडी दिली. "नाटकाला जात आहोत ना! मग गजरा माळून चल, मोगऱ्याच्या सुगंधात, नाटक बघताना छान वाटेल," तुषार हसत म्हणाला. ती लगेच म्हणाली, " थिएटरजवळ गजरे महाग असतात, कशाला पैसे वाया घालवलेत, मार्केटमध्ये स्वस्त असतात".
तिचे बोलणे ऐकून तुषार शांतपणे म्हणाला, "तुला मोगरा आवडतो ना! म्हणून घेतले".
"आता काय तरुण आहोत का? गजरे माळून नाटक पहायला जायला! चाळीशी उलटली आपली",तनुजा म्हणाली.
तुषार स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवत आत गेला.
तनयाला पुण्याला जाऊन १० दिवस झाले होते, तिचे lectures, practical सुरु झाले होते.
आज तनयाने माझा फोन उचलला नाही, तिच्याशी माझे बोलणे झाले नाही, संध्याकाळी तुषार ऑफिसमधून आल्यावर त्याला चहा देताना तनुजा सांगू लागली.
ती अभ्यासात बिझी असेल, फ्री झाल्यावर फोन करेल, तू पण स्वतःला बिझी ठेव, तू आणि तुझ्या मैत्रिणी पार्टीचे planning करा, तुझ्या मैत्रिणी पण आता मुलांच्या जबाबदारीतून मोकळ्या झाल्या आहेत ना! तुषार तनुजाला सांगू लागला.
"नकोच ते,कारण एकत्र आलो की हिची-तिची उणी-दुणी काढली जातात, तुमच्या भाषेत त्याला gossiping म्हणतात," तनुजा म्हणाली.
तुषार वेळोवेळी तनुजाला बिझी रहा, आनंदी रहा, असे सांगण्याचा प्रयत्न करी, पण तनुजा नकाराची घंटा वाजवी. तो तिला ऑफिसमधून २-३ वेळा फोन करी, रोमँटिक गप्पा मारण्याचा प्रयत्न करी. एकदा तिने त्याला विचारले, ऑफिसमध्ये काम कमी आहे का? सारखे फोन करता ते!
तनयाला पुण्याला जाऊन जवळपास दीड महिना होत आला होता, तरी तनुजाच्या वागण्यात जराही बदल नव्हता.
जुलै महिन्याच्या मध्यावर पावसाने जोर धरला, सर्वत्र थंडगार झाले, निसर्ग हिरवागार झाला होता, फुलांना बहर आला होता, हे पाहून तुषारचे मन उल्हसित झाले. घरी गेल्यावर तनुजाला कांदाभजी करायला सांगतो, मग ती आणि मी गॅलरीत बसून, हातात हात घालून, भजी आणि चहाचा आस्वाद घेऊ, मज्जा! असे मनाशी ठरवत त्याने bike स्टार्ट केली.
त्याने doorbell दाबली. तनुजाने दरवाजा उघडला पण तिचा चेहरा रडवेला होता, त्याने घाईघाईने विचारले, काय झाले? सर्व ठीक आहे ना!
मुंबईला खूप पाऊस झाला, ताईच्या घरात पाणी शिरले, हे सांगताना तनुजाला रडू आले.
तू आता तिला मदत करायला कोल्हापूरवरून जातेस का? तुषारने खवचटपणे विचारले.
"तुम्हांला परिस्थितीचे गांभीर्य आहे का"? तनुजा रागाने बोलली.
आपली कांदाभजी पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेली, म्हणून तुषार मनातून चरफडला.
ऑफिसमध्ये तुषारला त्याचे मित्र सल्ले देत असत. सुरेश म्हणाला," अरे एक सुंदर, लाल गुलाब, घरी घेऊन जा आणि गुडघ्यावर बसत वहिनींना Love You म्हण, मग बघ, वहिनी कशा लाजतील आणि तुमची लव्ह ट्रेन रुळावर येईल". सगळे ओरडू लागले, रेलगाडी, रेलगाडी, झुक, झुक, झुक...
त्यावर तुषार म्हणाला," लव्ह ट्रेन बापरे! तनुजा म्हणेल, १५ रुपयेss, एका गुलाबासाठी, कशाला खर्च केलात? त्यापेक्षा त्यात आणखी १५ रुपये टाकले असते तर अर्धा लिटर गाईचे दूध आले असते, आता तनयाच्या शिक्षणाचा, हॉस्टेलचा खर्च वाढला आहे, बचत करायला नको का?
तुषारच्या या बोलण्यावर सर्वजण खो खो हसू लागले.
"अरे! प्रेम आणि बचत या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, प्रेम ही एक सुंदर भावना आहे त्यात वास्तवता येत नाही आणि बचत ही एक दाहक वास्तवता आहे आणि वहिनी या दोन्हीं गोष्टी एकत्र करीत आहेत, प्रेमाची भावना बचतीच्या काट्यांवर चालवू नका, हे तुला वहिनींना पटवून द्यावे लागेल आणि त्यासाठी आम्हीं तुला सर्वतोपरी मदत करू, प्रकाशच्या या बोलण्याला सर्वांनी दुजोरा दिला.
दोन दिवसांनी राकेशने तुषारला सल्ला दिला की, आज संध्याकाळी वहिनींना घेऊन फिरायला जा, मस्तपैकी तर्रीवाली, झणझणीत, कोल्हापूर स्पेशल मिसळ खा आणि त्यावर एक फालुदा आईस्क्रीम, खाताना selfie घ्या आणि share करा, आम्हीं like करू, अगदी नवीन लग्न झाल्यासारखे वाटेल आणि उद्या आम्हांला तुमची गंमत सांगा, तुषारला चिमटा काढत तो बोलला.
👍 दाखवत तुषार निघाला. दुसऱ्यादिवशी सकाळी त्याची मित्रमंडळी टेबलभोवती गोळा झाली होती आणि त्याची आतुरतेने वाट पाहत होती. तुषार दिसताच राकेशने विचारले, काय मग! गाडी पुढे गेली का?
तुषारने एक दीर्घ श्वास घेतला व बोलू लागला, पावसाळ्यात बाहेरचे खाणे म्हणजे आजाराला आमंत्रण, आता काय आपण तरुण आहोत का? अरबट-चरबट खायला, त्यापेक्षा मी घरीच मिसळ बनवते, अशी तनुजाची reaction होती आणि मग आम्हीं घरी hygienic मिसळ खाल्ली.
तुझी गाडी derail झालेली आहे, track वर यायला वेळ घेईल, असे म्हणत सर्वजण कामाला लागले.
तनया जरी बाहेर शिकायला होती तरी तनुजा दिवसभर व्यस्त असायची. आज तिला आराम देऊया, असा विचार करून तुषारने घरी जाताना हॉटेलमधून दोन प्लेट चिकन बिर्याणी पॅक करून घेतली. घरी गेल्यावर तो तनुजाला म्हणाला, "आज रात्री पिक्चर बघत मस्तपैकी बिर्याणी खाऊया, आज किचनला सुट्टी". ८.३० वाजले तशी तिने जेवणासाठी २ ताटे डाईनिंग टेबलवर ठेवली, पाण्याचे ग्लास आणायला गेली तर लाईट गेले. बाहेर पाऊस कोसळत होता, तुषार खुश झाला, chicken biryani with candle light dinner वा, मस्त! दो दिल 🧡🧡 मिल रहे हैं, मगर चुपके चुपके, गुणगुणत तो डाईनिंग टेबलवर candles लावू लागला.
तनुजाने विचारले, तुम्हीं boneless चिकन बिर्याणी आणली आहे ना!
"चिकन without boneम्हणजे बॉडी without soul", तुषार हसत म्हणाला. पण तू असे का विचारते? तो बोलला. तनुजा हळूच म्हणाली, " मेणबत्तीच्या मिणमिणत्या प्रकाशात जर चिकनचे लहानसं हाड दिसले नाही तर घशात अडकेल, थोडावेळ लाईटची वाट पाहूया का”?
तुषार आराम खुर्चीवर बसत मनाशी पुटपुटला
'हमें तो लगा, इश्क शुरु हुआ,
हाय ! MSEB वाले,
जलने से पहले हि बुझा दिया |
कामाच्या ओझ्यामुळे, घरातील जबाबदारींमुळे, आर्थिक बाजू मजबूत करण्याच्या नादात, मला तनुजाला तिच्या मनासारख्या गोष्टी, वेळ देता आला नाही. आता थोडा relax झालो आहे तर एकमेकांना वेळ देऊया, आवडी-निवडी समजून घेऊया, सुटून गेलेले क्षण पुन्हा जगूया,असा विचार करताना तुषार स्वतःशीच हसला.
चला जेवायला जाऊया, असे सांगण्यासाठी सुरेश जागेवरून उठला. त्याने लांबून तुषारला हसताना पाहिले, तो वेगाने चालत त्याच्याजवळ आला व त्याला चिमटा काढत त्याच्या कानात म्हणाला," कुछ तो हुआ है, कुछ हो रहा है".
तुषार हसत म्हणाला, "दिल्ली तो बहुत दूर है मेरे दोस्त, जेवायला जाऊया".
लंच टाईम नंतर तुषार दोन दिवस फिरण्यासाठी योग्य अशी ठिकाणे मोबाईलवर शोधत होता. संध्याकाळी घरी गेल्यावर तनुजाला विचारून ठिकाण फायनल करूया, असा विचार करत त्याने कामाला सुरवात केली.
घरी पोहचताच तो तिला म्हणाला,"दोन दिवस फिरायला जाऊया का? पावसाळा आहे तर जवळपास जाऊया, लांब नको".
ती पटकन म्हणाली," पुण्याला जाऊया का? गणपती बाप्पाचे दर्शन होईल आणि तनयाला पण भेटून येऊ".
तो चटकन म्हणाला," नको, तिला जरा settle होऊ दे, आपल्या दोघांना बघून ती emotional होईल, उगीच disturb करायला नको आणि गणपती बाप्पाचे दर्शनच घ्यायचे असेल तर मुंबईला जाऊ, सिद्धिविनायकाचे दर्शन घेता येईल".
मुंबई नको, पावसाळ्यात पाणी साचले तर प्रवासात आपले हाल होतील, त्यापेक्षा गणपतीपुळेला जाऊया का? तनुजाने विचारले.
देवदर्शन करणे हा एकमेव तुझा उद्देश आहे का? त्याने विचारले.
"तनयासाठी देवाला अभिषेक करूया, एखादी पूजा करूया, तिला भविष्यासाठी देवाच्या आशीर्वादाची गरज आहे", ती म्हणाली.
घरात देखील देव आहेत, मग त्यासाठी इतके लांब जायची काय गरज? असे बोलत तुषारने फिरायला जायचा बेत लांबणीवर टाकला. पुढचे दोन-तीन दिवस तो रागातच होता.
आज सकाळी ऑफिसला जाताना तुषार नीटपणे बोलला नाही, काय झाले? माझे कुठे चुकले का? तुषार असा का वागला? ती नाश्ता करताना विचार करू लागली. तिने तनयाला फोन लावला, तनया आवाजावरून खूप खुश दिसत होती, तिने तनुजाला काही फोटो पाठवले व caption मध्ये लिहिले, आई मी खूप खुश आहे, अभ्यासही करत आहे, thank u my lovely parents to give me this chance to enhance my knowledge, तुम्हींपण मजा करा. तो मेसेज वाचून तनुजा खुश झाली, नकळत आनंदाश्रू तिच्या गालावर ओघळले. आज तनयाला पुण्याला जाऊन तीन महिने होत आले, तुषार रोज मला ऑफिस मधून दुपारी फोन करतो, जेवलीस का? संध्याकाळी कुठे फिरायला जाऊया का? तुझ्यासाठी काही आणू का? मागील २० वर्षांत जे क्षण सुटले, ते क्षण तो पुन्हा जगण्याचा, अनुभवण्याचा विचार करत आहे का? विचारांच्या तंद्रीत २.३० वाजले, पण आज तिला भुकेची जाणीव झाली नाही.
दुपारी लंच करताना सुरेश म्हणाला, "तुषार, तुम्हीं काय फिरायला जात नाही, तर आपण मित्रमंडळी weekend ला फिरायला जाऊया का" ? सर्वानी होकार दिला.
ती दुपारी त्याच्या फोनची वाट पाहू लागली, तीन वाजले, पण आज त्याने फोन केला नाही, ती नाराज झाली, माझं कुठे चुकतंय का? गेल्या तीन महिन्यांत, त्याच्या वागण्यात खूप फरक पडला आहे, खरंतर मी अशा प्रेमाची, caring nature ची अपेक्षा करीत होते. मग... मी कुठे हरवले? सोफ्यावर बसून ती एकटक घड्याळाकडे पहात विचार करत होती. मागील काही वर्षांत जर तो जबाबदारीच्या ओझ्याखाली होता, तर मीही संसारात व्यस्त होते. जर आज तो नव्याने हात पकडण्याचा विचार करत आहे, तर मी हात पाठीमागे का घेत आहे? चार वाजले, तशी ती उठली, आरशात चेहरा बघितला आणि स्वतःशी हसली, तुषार बरोबर बोलतो, स्वतःकडे बघ. कपाट उघडले, वस्तू घेतली आणि तडक घराबाहेर पडली. तीन तास कधी संपले, तिला कळलेच नाही.
ऑफिस सुटल्यावर सर्वजण कॅन्टीनमध्ये गोळा झाले. तुषारने सर्वांसाठी चहा आणि वडापाव मागवला व त्यांचे पिकनिकला जायचे planning सुरु झाले.
तिने मोबाईल चेक केला, ७ वाजले, तुषार आता घरी येईल, मी दिसले नाही तर फोन करेल का? मॅडम अजून ४० मिनिटे लागतील, तिच्या बोलण्याने तनुजा भानावर आली. घड्याळातील काटा जसजसा पुढे सरकत होता तसतशी तिला घरी जायची ओढ लागली. तुषारचा message आला का? पहाण्यासाठी तिने मोबाईल उचलला, पण छे! no message. आठ वाजता तनुजा निघाली, रिक्षा करून घरी पोहचली, तुषार गॅलरीत उभा राहून फोनवर बोलत होता. त्याने कपडे बदलले नव्हते, म्हणजे तो देखील आत्ताच आला आहे, असा तिने अंदाज लावला.
त्याला जेवायला बोलवायला ती गॅलरीत गेली. इतक्यात मोगऱ्याचा सुगंध दरवळला, त्याने झटकन मान वळवली, तो पहातच राहिला, तनुजाने blue साडी नेसली होती, आजही ती साडी तिच्यावर खुलून दिसत होती. ती जवळ येऊन म्हणाली, " जेवायला येताय ना”! आणि पावसाची जोरदार सर आली. पावसाची सर अंगावर आली, तशी ती स्वतःला सावरू लागली. तुषारने तिला जवळ खेचले, तो गुणगुणू लागला,
आज रपट जायें तो, हमें न उठइयो,
हमें जो उठइयो तो, खुद भी रपट जइयो।
तिने पण खुश होऊन स्वतःला, त्याच्या मिठीत झोकून दिले. पावसाच्या जोरदार सरींनी ते दोघे चिंब भिजले.
त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवत selfie घेतला, मित्रांना share केला आणि caption मध्ये लिहिले,
'Going for second honeymoon'.
Lovely
उत्तर द्याहटवाThank you
हटवाKhup Chan story writing Keli aahe.Mi tay story madhe ramale ki story kadhi purn zali samazal nahi.Thank you so much
उत्तर द्याहटवागोष्टीत रमणे म्हणजेच गोष्ट आवडणे, धन्यवाद 🙂
हटवाखूप सुंदर कथा
उत्तर द्याहटवाकथेचा आनंद लुटलात, धन्यवाद 🙂
हटवाStory छान आहे. जुन्या दिवसांची सांगड नवीन अनुभवात स्पष्ट मांडलेय. Story अभी बाकी है. ती संपू नये अजून पुढे पुढे असावी असे भासवते .Superb👌.
उत्तर द्याहटवागोष्टीला मनापासून दाद दिली, धन्यवाद 🙂
हटवाखूप सुंदर गोष्ट. खरंच प्रत्येकाने second honeymoon अनुभवायला हवाय. फास्ट झालेल्या ह्या लाईफ स्टाईल ला आपण असा प्रेमाचा ब्रेक द्यायलाच हवा. आपण फक्त घराचा, मुलांचा , भविष्याचा विचार करत राहतो आणि खरं जगणं जणू विसरूनच जातो. खूप छान वाटलं कथा वाचून एक नंबर.....
उत्तर द्याहटवाWell said . धकाधकीच्या जीवनात एक love break पाहिजेच , धन्यवाद 😀
हटवा