निखळ मैत्री
लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर
आईss सुमी ना अगदी वाईट मुलगी आहे, मी तिच्याशी मुळीच बोलणार नाही. सई शाळेची बॅग ठेवताना बोलत होती, तिचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. "काय झाले? सुमीशी भांडलीस का? ती तर तुझी best friend आहे ना" ,मी म्हणाले. पण ती आता माझी best friend नाही, असे बोलून सई हात-पाय धुवायला पळाली.
खरंतर सुमी, म्हणजे सुमती आणि सई अगदी जिवा-भावाच्या मैत्रिणी, त्याला कारणही तसेच होते, दोघी
शेजारीशेजारी राहत होत्या, त्यामुळे एकत्र शाळेत जायच्या, एकत्रच डबा खायच्या आणि शाळा सुटल्यावर हातात हात घालून घरी यायच्या. शाळेत दोघींची मैत्रीपण प्रसिध्द होती. पण, आज सई खूपच चिडली होती. मला ठाऊक आहे की, सईचा राग आईस्क्रिमच्या एका कपात विरघळून जातो म्हणून जेवल्याबरोबर आईस्क्रिमचा कप पुढे केला. तो गटकवल्यावर सई पोपटासारखी बोलू लागली.आई, आज शाळेत बाई मला ओरडल्या. का बरं ! काय झाले? मी चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव दाखवत सईला विचारले. सई सांगू लागली, "मी शाळेचा गृहपाठ करायची विसरले, सुमी मॉनिटर आहे म्हणून बाईंनी तिला गृहपाठ तपासायला सांगितले". तुझा गृहपाठ तर झाला नव्हता, मग पुढे काय झाले? मी पुन्हा विचारले. त्यावर सई म्हणाली, "आई मी खूप घाबरले, सुमीला हळूच म्हणाले, बाईंना खोटंच सांग की, सईने गृहपाठ केलेला आहे, मला वाटले ती माझी चांगली मैत्रीण आहे, ती मला मदत करेल पण झाले उलटेच! तिने बाईंना खरंखरं सांगितले" . खरे बोलल्यामुळे बाईंनी तिची पाठ थोपटली आणि मला मात्र कोपऱ्यात उभं राहायची शिक्षा केली. आता तूच सांग, सुमी चुकीची वागली की नाही? आपल्या बालमैत्रिणीशी असं कुणी वागते का? मी सुन्न झाले, सईला काय उत्तर द्यावे? मला समजेना.
पहायला गेले तर दोघी दुसऱ्या इयतेत शिकत होत्या, तश्या दोघी लहानच, कसं बरं समजाऊ? एवढ्यात सुमीचा गोड आवाज आमच्या कानावर आला. काकी, सई आहे का? सई हुप्प झाली होती, हाताने नको नको म्हणून मला खुणावत होती.
मी लगेचच बाहेरच्या खोलीत आले, बैस बाळ, काय झाले? मी सुमीला विचारले. मी सईला सॉरी म्हणायला आले आहे. सॉरी, का बरं! काय झाले शाळेत? मी शांतपणे तिला विचारले. आज मी खरे बोलल्यामुळे तिला शिक्षा झाली मला खूप वाईट वाटले. पण काकी, आईवडील आपल्याला सांगतात, मुलांनी नेहमी खरे बोलावे, प्रामाणिक असावे.आज जर मी बाईशी खोटे बोलले असते तर कदाचित सईला शिक्षा झाली नसती पण त्यामुळे आम्हां दोघींना खोटे बोलायची सवय लागली असती, तसेच सई शाळेच्या अभ्यासात चालढकल करायला शिकली असती आणि असे केल्याने ती अभ्यासात मागे पडेल, सुमी बोलताना जरा थांबली. काकी, तिला कमी मार्क मिळाले तर मला खूप वाईट वाटेल, बोलताना सुमीचा गळा दाटून आला.
दोघींकडे बघून निखळ मैत्री म्हणजे काय? याचा अर्थ मला उमगला होता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा