फजिती……………. अरे बापरे 😲
लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर
जून महिना, शाळा नुकतीच
सुरु झाली होती , आज आमचा पी . टी . चा तास होता पण काल पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे आज, आम्ही मैदानावर
हजर राहू शकणार नव्हतो. पी. टी. चे विनोद सर ; नावाप्रमाणेच विनोदी ; हसा व हसवा हेच
त्यांचे ब्रीदवाक्य .
हा प्रसंग मागील वर्षी मे महिन्यात घडला .
माझी आत्या सातारा येथे राहते ,तिच्या मुलीचे म्हणजे माझ्या आत्येबहीणीचे लग्न . लग्न
सुट्टीत असल्यामुळे सर्वांनीच जायचे ठरवले .साखरपुडा ,हळद आणि लग्नं असा कार्यक्रम होता. आम्हीं सर्वजण साखरपुड्याच्या आदल्या
दिवशी साताऱ्याला पोहचलो . साखरपुडा धामधुमीत झाला ,दोन दिवसांनी हळद व नंतर लग्नं
. घरातील पहिलेच लग्न असल्यामुळे आग्रहाचे आमंत्रण ,नातेवाईकच नव्हे तर गावातील बरीचशी
मंडळी हळदीला हजर होती . हळदीचा कार्यक्रम रंगतदार झाला ,लहान-मोठे ,स्त्री -पुरुष
सर्वांनी एकमेकांना हळद लावून ,गाणी गाऊन मजेने साजरा केला, आम्हीं मुले-मुली फेर धरून
नवरीभोवती नाचत होतो . सूर्य माथ्यावर आला
, जेवण तयार झाले ,सर्वत्र जेवणाचा सुगंध पसरला होता. आता मात्र सर्वांना भुकेची जाणीव
होऊ लागली. चला ,चला भुका लागल्यात, वाढायला
घ्या ,काका सूचना देऊ लागले तसे सर्वजण सरसावले . परिस्थिती बेताची म्हणून ' बुफे
' ला काट मारून सरळ पंगती ठरवलेल्या होत्या .
जेवणे वाढली , लोकं पंगतीत येऊन बसले . पटा-पटा वाढा ,माणसे भरपूर आहेत काकांच्या
सूचना चालूच होत्या .
तशी माझी चुलतबहीण मला म्हणाली " चल , आपण
'ट्राय ' करूया ", नको -नको काही चुकले तर , मी म्हणाले . काही घाबरू नकोस ,मी आहे ना ,तिचा सल्ला . चमकदार पत्रावळी
त्यावर जिलेबी ,मठठा , वांग्याची भाजी , मसालेभात व त्यावर तूप . तिने मसालेभात ठरवला व मी त्यावर तूप
वाढायचे ठरवले , ती पुढे मी मागे . पहिली पंगत झाली, दूसरी झाली, तिसरी झाली ,माझा
आत्मविश्वास वाढला , जमतंय तर आपल्याला , मी स्वतःवर खुश झाले . आता चौथी पंगत सुरु झाली ,अचानक सूर्यप्रकाश माझ्या
डोळ्यासमोर चमकला आणि मी काय केलं ! हे कळायच्या आतच जोरदार हशा पिकला . काय झालं
? मला कळेचना , पहाते तर काय ; पंगतीतील टकला माणूस डोक्यावरील तुपाला हात लावीत होता
. अरे देवा ! हे मी काय केलं ; चमकदार पत्रावळ
समजून मी चक्क चकचकीत टकल्यावर तूप वाढले , बापरे ! आईला जर कळले तर ... ओरडेल ,म्हणेल लक्षंच नसतं कशात , बाबा काय म्हणतील
? हाता -पायांना घाम फुटला , अंगातील शक्तीच नाहीशी झाली . "गणपती बाप्पा धाव रे ,संकट पडले भारी"
२१ मोदकांचा नैवैद्य दाखवीन, प्लिज .
आजी नेहमी म्हणते "जर देवाला मनापासून हाक मारली ,तर तो नक्कीच
धावून येतो " आणि काय आश्चर्य ! न रागवता
त्या माणसाने डोक्यावरील अर्थात टकल्यावरील तूप बोटांनी चाखले व हसून म्हणाले
'साजूक तूप आहे वाटतं ' पुन्हा एकदा हशा पिकला . माझा रडवेला चेहरा पाहून
ते हसत म्हणाले " वाढ -वाढ तूप वाढ ,पण यावेळेस मसालेभातावर वाढ ,डोक्यावर नको
. त्यांनी दाखवलेला मनाचा मोठेपणा पाहून माझी भीती कुठल्याकुठे पळून गेली , 'सॉरी'
म्हणून मी तूप वाढण्यास सरसावले . वर्गातील सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या
, मला अगदी स्पर्धा जिकंल्यासारखे वाटले .
बसतांना सहज माझं लक्ष दाराकडे गेले तर दुसऱ्या
तासाचे टिचर उभे होते , म्हणजे, मी तास संपला तरी बोलत होते ,बापरे ! बोलतांना मला
भानच राहिले नाही . सर जातांना सहज म्हणाले
" लाजाळूचे झाडं फुललं आहे ".
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा