अन्नदेवता ..... नमो नमः 🙏

 

लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर

        हे गं काय मनू, आजपण डबा संपवला नाहीस, आज तर तुझ्या आवडीचे सँडविच दिले होते. अगं, आई डबा संपवणारच होते, पण काय करू? लंच -ब्रेक संपला. रोज जेवताना ताटात अन्न टाकते, डबा संपवत नाही, हे मला अजिबात आवडत नाही, अन्नदेवतेचा अपमान होतो, शालिनीची बडबड चालू होती आणि मनू आजीच्या पाठीमागे लपली होती. मनू म्हणजे, मनाली जोशी, Sr. Kg मध्ये शिकणारी. एकुलती एक नात, त्यामुळे मनू आजी-आजोबांच्या गळ्यातील ताईत होती. कधीतरी शालिनीला वाटायचं, मनूचे चुकले की, ओरडावे पण आजी-आजोबा तिची ढाल बनायचे, त्यामुळे तिला गप्प रहावे लागे. काय करावे बरं? असा विचार करता करता शालिनीने बेडवर अंग टाकले, इतक्यात तिच्या मनात एक छानसा विचार चमकला, तशी ती खुदकन स्वतःशीच हसली आणि निद्रादेवीच्या आधीन झाली.  

       दुसरा दिवस उजाडला. शालिनीचे उठणे, घर आवरणे, शरद आणि मनू साठी डबा बनवणे, सासू-सासऱ्यांसाठी चहा -नाष्टा तयार करणे, सारे काही नेहमीप्रमाणे सुरु झाले. आजी-आजोबांनी मनूला उठवून शाळेसाठी तयार केले, निघतांना तिने शालिनीच्या गळ्याला मिठी मारली व म्हणाली,"आई, आज डब्यात काय दिले आहे? शालिनी हसून म्हणाली," गंमत". ऐ गंमत म्हणजे काय गं आई? मनूने लडिवाळपणे विचारले. ते तुला डबा खाताना कळेल, पळ आता, स्कूल बस येईल असे बोलून तिने मनूला पिटाळले . 

    आज मनूची स्वारी खुशीतच स्कूलला गेली, कधी लंच-ब्रेक होतो व कधी गंमत खाते असे तिला झाले होते. प्रार्थना झाली आणि अभ्यास सुरु झाला. दोन तासानंतर लंच -ब्रेकची बेल वाजली, मनूने खुशीत डबा उघडला आणि बघते तर काय! डब्यात काल तिने टाकलेले अन्न होते, अर्धे सँडविच, दोन बिस्किटांचे तुकडे, पाव-पोळी, थोडीशी भाजी व  एक चमचा पुलाव, मनू गोंधळली, तिने झटकन डबा बंद केला व गुपचूप बॅगेत ठेवला. तिचे डोळे पाण्याने भरले, टिचरने विचारले काय झाले मनाली? डबा का खात नाहीस? तिच्या तोंडून शब्दच फुटेना. टिचर म्हणाल्या," अगं डबा विसरलीस काय? असू दे. आज तुझ्या मैत्रिणी त्यांचा डबा शेअर करतील, असे म्हणून टिचरने त्यांच्या डब्याचे झाकण दिले, त्यात सर्वांनी डब्यातील एकेक घास खाऊ दिला. तिची पार्टनर सायली म्हणाली,"मला ना गोड शिरा खूप आवडतो म्हणून मी थोडाच देणार हं आणि मी पूर्ण डबा संपवणार", हे ऐकून तर मनूला खूपच वाईट वाटले. आपण नेहमी ताटात, डब्यात उष्ट अन्न टाकतो त्यामुळे अन्नदेवतेचा अपमान होतो, म्हणूनच अन्नदेवतेने आईला ही  'idea ' दिली, असे वाटते.

        टिचरने मनूपुढे डब्याचे झाकण ठेवले, तिने खायला सुरुवात केली, आज डबा कमी आणि भूक जास्त होती 'अन्नाचा एकही कण तिने सांडवला नाही', टिचरने त्याबद्दल तिला शाबासकी दिली आणि सर्वांना सांगितले, पहा मनाली किती गुणी मुलगी आहे, अन्नाचा आदर करते, शाब्बास!! बेटा. मनूला माहीत होते, ही शाबासकी आईची आहे, माझी नाही. आज जर तिने मला शिक्षा दिली नसती, तर अन्नाचे महत्व मला कळलेच नसते. लंच -ब्रेक नंतर इंग्लिश व पी.टी चा तास झाला आणि स्कूल सुटले. स्कूलबस मध्ये मनू मागच्या सीटवर बसली, गुपचूप डबा काढला आणि खाल्ला. खरेतर तिचे डोळे भरून आले होते. बसमधील आंटीने विचारले,"काय झाले मनाली"? सायली पटकन म्हणाली,"आज ती डबा आणायचा विसरली". "तुला भूक लागली का? आंटीने विचारले, आता तुझा स्टॉप येईल, घरी  जाऊन पोटभर जेव हं". तिने मानेनेच होकार दिला.

    स्टॉप आला तशी ती झटकन उतरली आणि पळत सुटली, आजोबा ओरडत होते, थांब, थांब पडशील. ती घरात गेली, डबा काढला आणि  किचनकडे वळली  'आज आईला रिकामा डबा दाखवायचा होता ना'!


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जमलं रे जमलं

आणि माझा . . . झाला

चला, श्रीमंत होऊया ...! 💰