स्वावलंबन …
लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर
मंजिरी, आज सकाळपासून खुशीतच होती त्याला कारणही तसंच होतं ,तिच्या सगळ्या मैत्रिणींनी आज 'पार्टी' चा बेत ठरवला होता . कधी एकदा कामं संपवते आणि पळते असं तिला वाटत होते , काम करता करता ती मनात काही मनसुबे रचित होती , काय बरं खायला नेऊया ? कुठला ड्रेस घालूया ? कुठला 'फॅमिली फोटो' दाखवायला नेऊया ? विचारांच्या तंद्रीत तिने सर्व कामे पूर्ण केली , मानस पाचवीत शिकत असल्यामुळे शाळा दुपारची होती, तिने त्याला स्कूल बस मध्ये चढवलं आणि सरळ मैत्रिणीकडे गेली . गप्पा -टप्पा , हसणं -खिदळणं , खाणं -पिणं यात संध्याकाळ कधी झाली तिला कळलेच नाही. साडे -पाच वाजले तसे तिला घरचे वेध लागले . "मानस येईल आता , मी निघते” ती म्हणाली, अगं आजी आहे ना घरी ! कशाला घाई करते उषा बोलली . महेश पण येईल इतक्यात , ती म्हणाली, मग आज, आईच्या हातचा चहा घेईल असे बोलून सगळ्याजणी हसू लागल्या .
नाही, नाही म्हणता मंजिरी सहा वाजता निघाली , घरी पोहचली , दरवाजा उघडला आणि बघते तर काय ! मानसचे 'सॉक्स' सोफ्याखाली लपले होते तर ' शूज ' दाराच्या आड बसले होते, 'डबा आणि बॉटल' बॅगेतून वाकुल्या दाखवत होते, 'युनिफॉर्म' जमिनीवर पहुडला होता, खाऊ मानसने खाल्ला कि टेबलने ? कळतच नव्हते . घराचा सीन पाहून तिचा आनंद कुठल्या कुठे पळून गेला .
मानस ssss मंजिरीचा आवाज वाढला , तुला जराही शिस्त नाही , स्वतःच्या वस्तू जागेवर ठेवत नाहीस , किती हा आळशीपणा ! तू साधे स्वतःचे काम करत नाही तर इतरांना काय मदत करणार ? तिच्या रागाचा पारा वाढत होता . घर आवरत , आवरत कसेबसे तिने रात्रीचे जेवण बनवले . जेवण झाल्यावर तिने महेशला संध्याकाळची परिस्थिती सांगितली , जरा ओरड "लेकाला" तसा तो हसत म्हणाला "ते तर तुझे department आहे". तिने रागाने मान वळवली आणि झोपली .
दुसऱ्या दिवशी स्कूलमध्ये टिचरने "वाडा" येथील "एकदिवसीय शिबिराची" माहिती सांगितली . तेथे तुम्हांला स्वयंसेवक म्हणून काम करायचे आहे , शारीरिक स्वच्छता तसेच परिसरातील स्वच्छता याबद्दल जन -जागृती करायची आहे , शिबिराला आलात तरचं १० मार्क्स मिळतील . खरंतर मानसाला अजिबात interest नव्हता , काम आणि मानस, दोघांचे सूर काही जुळत नव्हते. घरी एखादी वस्तू मिळाली नाही कि आई sss म्हणून ओरडायचा कि वस्तू समोर हजर . तो हसत मंजिरीला विचारायचा " आई तुझ्याकडे जादूची छडी आहे का"?तुला कश्या वस्तू झटकन मिळतात. मंजिरी सांगायची अरे , वस्तू जागेवर ठेवल्या तर अंधारातही फारसे चाचपडावे लागत नाही , पण तो काही मनावर घ्यायचा नाही. घरी आल्यावर त्याने शिबिराबद्दल सांगितले , तसा महेश हसत म्हणाला अरे , तिथे स्वतःचे काम स्वतः करावे लागणार , 'assistant आई' नसणार आहे, तुला नाही जमणार बुवा ! जाऊ दे १० मार्क्स . त्याने खूपच हट्ट धरल्यामुळे आई -बाबांनी त्याला पाठवायचे ठरवले . शुक्रवारी संध्याकाळी ७. ३० ला मुले स्कूलमध्ये जमली. ' जमेल ना त्याला' मंजिरी पाणावलेल्या डोळ्यांनी विचारात होती , अगं, त्याचे मित्र पण आहेत ना शिबिराला सांभाळून घेतील असे म्हणून महेश धीर देत होता. बस ८वाजता सुटली , पालक मुलांना 'All the Best ' बोलून प्रोत्साहन देत होते , शेवटी bye -bye बोलून सर्व पालक घराकडे वळले .
वाडा येथे पोहचल्यावर 'पाच मुलांचा एक ग्रुप' याप्रमाणे मुलांची विभागणी केली .' Tent ' लावण्यात आले , मुलांनी सामान ठेवले आणि जेवणासाठी ग्राउंड वर हजर झाले " भूक असेल तेवढेच अन्न घ्या, अन्न वाया घालवू नका " असे टिचर मुलांना वारंवार सांगत होत्या . जेवण झाल्यावर आपले ताट , वाटी, पेला स्वच्छ करून ठेवायचे होते , मानसने सवयीप्रमाणे तसेच ठेवले , ते पाहून टिचरने विचारले " घरी देखील असाच वागतो का ? तो चपापला . सर्वांची जेवणे उरकल्यावर टिचर आणि मुलांनी अंताक्षरी तसेच बैठे खेळ खेळले आणि नंतर झोपावयास गेले. प्रत्येकाने आपापले अंथरूण घालावयाचे होते , मानसचा चेहरा पाहून तुषार हसून म्हणाला " अरे , हे तर खूप सोप्पे आहे , मी तर आई - बाबांना पण अंथरूण घालून देतो ". मानस, तू तर साधी चादर पण घालत नाही , खरंच किती आळशी आहेस , मंजिरीचे बोलणे आता त्याला आठवू लागले .
दुसऱ्या दिवशी नाष्टा मुलांच्या मदतीने बनवत होते त्यामुळे "चव आणि वेळ " या दोघांची सांगड घालणे चालू होते . टिचरने विचारले " आईला किचन मध्ये कोणकोण मदत करतात " बऱ्याच मुलांनी हात वर केले ते पाहून मानसने शरमेने मान खाली घातली .
नाष्टा झाल्यावर मुले आजूबाजूच्या वस्तीत गेले , तेथील लोकांचे रहाणीमान , खायच्या सवयी पाहून ते थक्कच झाले . गरीब परिस्थितीमुळे हट्ट म्हणजे काय ? हे त्या मुलांना ठाऊक नव्हते , आई - वडिलांना कामात मदत करून मैलभर चालून शाळेला जातात हे ऐकून मुलांना फारच वाईट वाटले . टिचर म्हणाल्या " समजले ना आता , तुम्ही किती नशीबवान आहेत ते ! " सर्वकाही सहजपणे मिळते . त्यानंतर तेथील लोकांना स्वछतेबद्दल मार्गदर्शन केले , मुलांना खाऊ वाटण्यात आला , शालोपयोगी वस्तू देण्यात आल्या , मुलांच्या चेहऱ्यावर आनंददायी भाव दिसत होते.
एव्हाना मानसच्या लक्षात आले , कि त्याच्याच वयाची मुले स्वतःचे काम तर करतातच पण त्याबरोबर आई-वडिलांना देखील मदत करतात , शाळेतही जातात , आता त्याला त्याच्या वागण्याची लाज वाटू लागली . सर्वांचा निरोप घेऊन बस सुटली, मुले उशिरा घरी परतली , मानस दमला होता , बॅगा कोपऱ्यात ठेऊन लगेच झोपला.
दुसऱ्या दिवशी सकाळी मंजिरीने पहिले की मानसने बॅगा रिकाम्या करून वस्तू जागच्या जागी ठेवल्या होत्या , त्याचे वागणे पाहून ती चाटच पडली. तेवढ्यात त्याच्या आजीला ठसका लागला म्हणून ती पाणी आणण्यासाठी वळली , पण आज, तिच्या अगोदर मानसने पाण्याचा ग्लास आजीपुढे ठेवला , महेश आणि मंजिरी आ वासून पाहू लागले . तसा तो म्हणाला " स्वावलंबनाचा पहिला धडा मी गिरवायला सुरुवात केली आई ........
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा