अशी ही …... चिपका - चिपकवी

 लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर

              अहोss हे काय! १०० रुपयांची नोट फाटकी आहे, अशी कशी घेतलीत? बघितले नाही का? आईच्या प्रश्नांचा बाबांवर भडिमार चालू झाला. बाबा ऑफिसमधून नुकतेच घरी आले होते. 

     " अगं रिक्षावाल्याने दिली, त्याच्याकडे दुसरी १००  रुपयांची नोट नव्हती, मग काय करणार? शेवटी घेतली फाटकी नोट" बाबा म्हणाले. त्यावर आई म्हणाली, "तुम्हांला काय माहित? त्याच्याकडे दुसरी  १०० रुपयांची  नोट नव्हती ते! त्याने तुम्हांला मुद्दाम फाटकी नोट चिपकवली".

 "बँकेत देतेस का ती फाटकी  नोट"?  आजोबा म्हणाले. 

  "बँकेत फाटकी नोट घेत नाहीत" आई नाराजीच्या स्वरात म्हणाली.  

    रस्त्याच्या कॉर्नरला एक दुकान आहे, तो दुकानदार फाटक्या नोटा बदलून देतो, पण १०० रुपयांतील २० रुपये कापून घेईल आणि  ८० रुपये परत करेल, बाबांनी आईला पर्याय सुचवला.

    "अरे, वा रे वा! २० रुपयांचे नुकसान का  बरं!" आई  काहीशी रागाने  म्हणाली.

  बरं! आता  चिडू  नकोस, उद्या  सकाळी  बाजारातून जास्त भाजी विकत घे आणि भाजीवाल्याला 'ही नोट' दे, घेईल तो, गिऱ्हाईक सोडणार नाही, असा सल्ला आईला देऊन बाबांनी 'फाटकी नोट' आईला चिपकवली आणि त्यावरील चर्चा संपवली.    

     दुसऱ्या दिवशी, सकाळी  १० वाजण्याच्या सुमारास आई  बाजारात  जायला  निघाली. एखाद्या  'mission' वर  जाताना मनात कशी धाकधूक होत असते, तशीच काहीशी  भिती आईला वाटत  होती.   

     चालेल का रे 'ही नोट'? का दुकानदार परत करेल?

    बहनजी दुसरा नोट दे दो, ये चलेगा नहीं, असे म्हणेल.

    ओळखीच्या दुकानदारांकडे तर जातच  नाही, नाहीतर कसे  म्हणतील, ताई आज पैसे नसतील तर उद्या द्या, आम्हीं कुठे पळून  जातो, रोज तर येतो, आई स्वतःशीच बोलत होती.

  शेवटी आजोबा आईला म्हणाले, "रमा, इतकी nervous होऊ नकोस, नाहीतर  'ती  नोट' घरीच विसरून जाशील, तुझ्याकडून  जर 'ती नोट' वापरली गेली  नाही, तर मी संध्याकाळी  प्रयत्न करीन, त्यात मी  म्हातारा  मनुष्य, कोणी  नाही म्हणणार नाही," आजोबांच्या या बोलण्याने आईला हायसे वाटले.                  

      साधारण दीड तासाने आई  घरी  परतली, खांद्याला दोन वजनदार पिशव्या, घामाघूम झालेली, धापा टाकीत  घरी  आली. पण  चेहऱ्यावर  मात्र  'mission' जिंकल्याचा आनंद नव्हता. मी चटकन तिला प्यायला पाणी आणून  दिले व  सर्व सामान उचलून स्वयंपाक घरात नेऊन  ठेवले.

काय  झाले? असे  मी  नजरेनेच आईला  विचारले. "कशात काय, अन फाटक्यात पाय" आई रागाने बोलली. 'ती नोट' चालवायची म्हणून मी  तीन ते चार  प्रकारच्या  भाज्या घेतल्या त्याचे  एकूण १२७ रुपये  झाले, मी  भाजीवाल्याला 'ती  नोट' व वरील  २७ रुपये असे  दिले, त्याने  २७ रुपये  घेतले व म्हणाला," ताई  'ही नोट' चालणार नाही, दूसरी  द्या, नोट तर चालली नाहीच वरून १२७ रुपये जास्तीचे खर्च झाले" आई  चिडून बोलली व रागाने 'ती नोट' डाईनिंग  टेबलवर ठेऊन आत  निघून गेली. मी आणि आजोबा  'त्या नोटेकडे'  पहात हसू लागलो.   

           रोज संध्याकाळी आजोबा आणि त्यांचे मित्र फिरायला जातात, कधी  बागेत तर कधी समुद्रकिनारी, गप्पा  मारत चणे, शेंगदाणे खातात तर कधी  भेळदेखील खातात. आज संध्याकाळी घरातून निघताना आजोबा  म्हणाले, " रमा आण 'ती नोट', आज सर्वाना भेळ खायला घालतो आणि नोट भेळवाल्याला चिपकवतो, मित्र पण  खुश आणि  नोट पण संपेल". चला, निघतो आता असे  म्हणून आजोबा 'ती नोट' घेऊन  निघाले. ‘Plan’ प्रमाणे आजोबा,  त्यांच्या  मित्रांना समुद्रकिनारी फिरायला घेऊन गेले, भेळवाला दिसताच त्याला १० पुड्यांची ऑर्डर दिली. 

भेळवाला खुश होऊन म्हणाला," साहब, आज का  दिन अच्छा है, आते ही आपने 'बोहनी' कर दी, शुक्रिया साहब. जोशी आजोबांनी माझ्या आजोबांना विचारले, "काय रे सुरेश, आज काय स्पेशल"? आजोबा हसत म्हणाले, "स्पेशल वैगरे काही नाही रे, सहजच". सगळ्यांनी आनंदाने भेळीच्या पुड्या हातात घेतल्या, आजोबांनी 'ती नोट' भेळवाल्याला दिली. आता भेळ तोंडात टाकणार, इतक्यात भेळवाला ओरडला, " साहब, ये नोट फटा है, चलेगा नहीं, दूसरा दे दो ". आजोबांनी हसत, हसत दूसरी १०० रुपयांची नोट त्याला दिली.

         ८. ३० ला रात्री आजोबा जेवणाच्या वेळेला घरी आले, दारात पाऊल टाकताच मी विचारले, " आजोबा, कामगिरी फत्ते झाली का"?  त्यावर ते हसत म्हणाले, "अरे बाळा, 'ती नोट ' तर चाललीच नाही वरून खिशाला १०० रुपयांची फोडणी".

  आईने डोक्याला हात लावला आणि बाबांकडे वळून म्हणाली, "बघितलंत का ! तुमच्या त्या फाटक्या नोटेमुळे, सकाळपासून २२७ रुपये खर्च झाले, काय करावे आता" ?

   मी आईला  म्हणालो, " चिंता करू नको, मी 'हया नोटेचा विडा' उचलतो, आमच्या  कॉलेजच्या जवळच एक  stationery चे  दुकान आहे, दुकानात सतत गर्दी असते, त्यामुळे मालक पैश्यांच्या नोटा फारशा चेक करत नाही, त्याला मी 'ही नोट' चिपकवतो".

   "अरे, दिग्गज मंडळी हरली 'ह्या नोटेपुढे'  तिथे तुझ्यासारख्या बच्याचा काय निभाव लागणार"? बाबा मला  म्हणाले.         

  "नाहीतर 'ही नोट' चालवायच्या नादात आणखी खिशाला चाट पडायला नको",आई काहीशी चिडून म्हणाली.

"काळजी करू नका, मी व्यवस्थित manage करीन", मी  म्हणालो. बरेच दिवस मी  माझ्या mobile साठी  phone holder घ्यायचा विचार करत होतो, आईकडे जर सरळ सरळ पैसे मागितले असते तर  तिने कदाचित आढेवेढे  घेतले असते, आत्ताच कशाला पाहिजेनंतर घे, नाहीतरी mobile जुनाच आहे ना! इतके दिवस phone holder नाही म्हणून काही अडले का? वैगेरे वैगेरे.  हीच संधी योग्य आहे, असा विचार करून 'ती नोट' मी आईकडून घेतली.                                     

    दुसऱ्या दिवशी, सकाळी college ला पोहचल्यावर पहिले stationary shop मध्ये गेलो, shop मध्ये बऱ्यापैकी गर्दी होती, मी  phone holder पाहू  लागलो, त्यापैकी एक मला आवडले, त्याची किंमत पहिली तर  १३० रुपये  होती म्हणजे बजेटमध्ये आहे असा  विचार  करून 'ती नोट' आणि  सुट्टे ३० रुपये  मी दुकानदाराला दिले.  मी तिथून 'कलटी' मारणार इतक्यात, दुकानाचा मालक म्हणाला, " Yellow-T shirt, ये नोट फटा हुआ है, दूसरा नोट देना".  मी एक दीर्घ श्वास घेतला व त्याला दुसरी नोट दिली. आता मला डोळ्यासमोर आईचा चेहरा दिसू लागला, कारण नोट चालवण्याच्या नादात २२७ रुपयांत आणखी १३० रुपयांची भर पडली होती. दुपारी घरी पोहचल्यावर, मी आईला सारा वृत्तांत सांगितला.

       शेवटी आई म्हणाली, "पुरे  झाला आता खर्च! ना आजोबा, ना बाबा, ना मी आणि ना तू, कोणीही 'ही नोट' वापरू  शकत नाही आता फक्त एकच व्यक्ती आहे जी ' ही नोट' वापरू शकते" .

    मी  आश्चर्याने विचारले,"कोण आहे ती व्यक्ती"? आई  म्हणाली, "देव, तोच एकमेव असा आहे, जो कुणालाही नाही  म्हणत नाही, संध्याकाळी देवळात जाते, दानपेटीत 'ही नोट' टाकते आणि हात जोडून त्याला  विनंती करते, भगवंता  दोन दिवसांपूर्वी आमची परीक्षा पाहण्यासाठी रिक्षावाल्याच्या रूपाने तू  'ही नोट' आम्हांला दिलीस, पण दुसऱ्याला नेहमी  चांगले  दयावे, या  तुझ्या  शिकवणुकीप्रमाणे आम्हीं  'ही  नोट' कोणालाही  चिपकवू  शकलो  नाही, आता तूच  'ही नोट' वापर", असे सांगून तिने सुटकेचा निश्वास सोडला.      

Click here to go back to themarathistory.com

टिप्पण्या

  1. खूप छान लिखाण, वाचन करत असताना लेख मध्येच सोडणे कठीण...फार छान...!!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जमलं रे जमलं

आणि माझा . . . झाला

चला, श्रीमंत होऊया ...! 💰