भविष्याबद्दल का SSSय बोलू ........ !
लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर
आमची 'गरवारे चाळ ' अगदी बटाट्याच्या चाळीसारखी प्रसिद्ध नाही, पण लोकप्रिय आहे . हि चाळ एक मजली आहे , ग्राउंड आणि पहिला मजला , जिन्याच्या उजव्या बाजूला आठ घरं आणि डाव्या बाजूला आठ घरं म्हणजे ग्राउंडला १६ आणि पहिल्या मजल्यावर १६ अशी एकूण ३२ बिऱ्हाडं या गरवारे चाळीत राहतात . चाळीसमोर मैदान आहे , तिथे लहान मुले खेळतात, कंपाऊंडच्या बाजूला नगरसेवकांनी तीन - चार बेंच आणून ठेवले आहेत बसण्यासाठी आणि प्रसिद्धीसाठीपण . ५ ते ६ स्कूटर , ७ ते ८ सायकली आणि हो, चिंटू , मिंटू, सोनू यांच्या tricycle देखील गेटच्या जवळ पार्क केलेल्या असतात. कुणाकडेही आनंदाचा प्रसंग असो वा दुःखाचा , चाळीतील सर्वजण मदतीला धावायचे . लहान -मोठे , गरीब -श्रीमंत असा भेदभाव चाळीत नव्हता , सर्वजण एकोप्याने, आनंदाने रहात होते .
गेटमधून आत आल्यावर ग्राऊंडला जिन्याच्या उजव्या बाजूला ५ वे घर; सुधाकर तांबोळी , पोस्ट खात्यात clerical
department ला काम करणारे ; चाळीतील सर्वजण त्यांना प्रेमाने 'अण्णा' म्हणत. अण्णांचे छोटेखानी कुटुंब , अण्णा , त्यांच्या सौ. आणि त्यांची एकुलती एक मुलगी राधा . अण्णा मॅट्रिकला असतांना त्यांचे वडील देवाघरी गेले , आईने त्यांना काबाडकष्ट करून वाढवले , अण्णांनी पण छोटी -मोठी नोकरी करत आपले शिक्षण पूर्ण करून पोस्ट खात्यात कामाला लागले होते . त्यानंतर अण्णांच्या माउलीने त्यांच्या डोक्यावर अक्षता टाकल्या आणि या भूतलाचा निरोप घेतला . अण्णांनी नोकरी सांभाळून आपला छंद देखील जोपासला होता , ' हातावरील रेषा पहाणे आणि भावी गोष्टींविषयी भाकीत करणे' . काही पुस्तके वाचून , टिव्हीवरील कार्यक्रम बघून , पेपरमधील लेख वाचून त्यांनी आपले ज्ञान वृद्धिंगत केले होते . राधाचे लग्न झाल्यावर तर त्यांना घर रिकामे वाटू लागले , मग काय ! अण्णांनी स्वतःला छंदात पूर्णतः झोकून दिले .
गरिबीची जाणीव असणारे अण्णा , भविष्य विना मोबदला म्हणजे फ्री सांगत असत , त्यामुळे कदाचित भविष्य जाणून घेणाऱ्यांची संख्या अधिकच असायची . पोस्टात लंच टाईमच्या वेळी त्यांच्या टेबलजवळ नेहमी गर्दी असायची. एकदा साहेब लंच टाईमच्या वेळी बाहेर जायला निघाले होते,बघतात तर काय ! अण्णांच्या टेबलजवळ गर्दी , ते पाहून साहेब घाबरले, अण्णांना बरे नाही का ? त्यांनी ताबडतोब गणू शिपायाला बोलावले , चौकशीअंती त्यांना 'अण्णांचा छंद ' याचा खुलासा झाला .
एकदा चक्क साहेबांनी त्यांना केबिन मध्ये बोलावले, त्यांच्यासमोर आपला हात पुढे केला आणि सरळ विचारले , " ज्योतिषी महाशय , सांगा पाहू , मला promotion कधी मिळणार " आता मात्र अण्णा चपापले , promotion आहे म्हणून सांगितले तर नेमकी तारीख विचारतील आणि नाही म्हणून सांगितले तर माझी capability नाही का ? असे म्हणून मलाच प्रश्न करतील . सरते शेवटी इकडच्या -तिकडच्या गप्पा मारून , मी या क्षेत्रात नवशिखा आहे, अभ्यास पूर्ण झाला कि तंतोतंत भविष्य सांगीन असे बोलून अण्णांनी तेथून पळ काढला .
महिन्यापूर्वी ,पहिल्या मजल्यावरील जोशी दांपत्य अण्णांच्या घरी गेले होते , जोशींचा मुलगा 'राघव ' दहावीला होता , त्यांनी अण्णांना राघवला किती % मिळतील असे विचारले . अण्णांनी काहीशी आकडेमोड पेपरवर केली व सांगितले कि ," जर राघवने मनापासून अभ्यास केला असेल तर ७५ ते ८०% मिळतील पण जर का , वर्षभर अळम - टळमं करत अभ्यास केला असेल तर मात्र ५५ ते ६० % पडतील. हे ऐकून जोशी काकू म्हणाल्या " भविष्य अण्णांना विचारण्यापेक्षा राघवलाच विचारूया , तू कशा पध्दतीने अभ्यास केला आहे ते सांग पाहू ".
पूर्ण सुट्टीत राघव अण्णांच्या दृष्टीस पडला नाही, , रिझल्टच्या दिवशी पेढे घेऊन अण्णांच्या दारात उभा राहिला , अण्णांच्या सौभाग्यवतीने खुणेने विचारले , किती मिळाले ? राघवने ६५% असे सांगितले . पाहिलेत का , बरोबर average मार्क्स पडले आहेत , अण्णा बोलले , पुढे राघव काही बोलण्याच्या आतच अण्णांनी हातातील पेढा त्याच्या तोंडात कोंबला. अशा प्रकारे अण्णांचे भविष्य वर -खाली व्हायचं , तेव्हा त्यांची त्रेधातिरपीट उडायची , पण ते हसून वेळ मारून न्यायचे .
अण्णांचे हे "भविष्य वेड" त्यांच्या कुटुंबाला बिलकुल पसंत नव्हते. घरातले प्रश्न सोडवण्यापेक्षा , लोकांचे प्रश्न सोडवायला जातात , बरं , त्यांचे प्रश्न सुटतात असे पण नाही , उगाच नुसती गुंतागुंत , काकू रागाने शेजारच्या शांताकाकूंना सांगत होत्या . काकू पुढे म्हणाल्या " सकाळी मी अण्णांना पाणी भरायला मदत करा , पाण्याचे pressure कमी झाले आहे , जर का पाणी गेले तर भांडी रिकामीच राहतील" , असे सांगत होते , तर आमचे हे मदत करायची सोडून उद्या पाणी येईल कि नाही याचे भविष्य बघत होते . जळलं , मेलं ते भविष्य , रद्दीत पुस्तके टाकली तर २ रुपये किलो भावाने विकली जातील नाही का ! काकू रागाने तणतणत होत्या . काकू भयंकर चिडलेल्या पाहून अण्णांनी तेथून काढता पाय घेतला.
ऑक्टोबर हीट जवळपास संपत आली होती , आता थंडीचा मौसम सुरु होणार होता, मस्त गुलाबी थंडी ,हातात डिंकाचा लाडू आणि वाफाळलेला चहा वा! काय मज्जा, पण; काकू मात्र धास्तावल्या होत्या , कारण शेवटच्या महिन्यात अण्णा रिटायर्ड होणार होते , आता कुठे ९ ते ५ हि वेळ शांततेत जाते , पुढे तर हि वेळ सुध्दा आमचे घरचे 'नॉस्टारडम
' भविष्यवाणी करण्यात घालवणार, काकूंनी कपाळावर हात मारला .
नुकताच पहिल्या मजल्यावरच्या शंतनूचा वाढदिवस झाला , त्याच्या मित्रांनी birthday
gift म्हणून कुत्र्याचं छोटं पिल्लू दिलं . मुलांनी त्याचे नाव Monty असे ठेवले , चाळीतील ते पाहिलंच पिल्लू त्यामुळे सर्वजण त्याला गोंजारायचे , खायला घालायचे , चिंटू आणि सोनू तर आपल्या पेल्यातील दूध त्याच्या वाटीत घालायचे . लहान मुलेच काय पण मोठी माणसे देखील जेवतांना चपातीचा तुकडा त्याच्यासाठी राखून ठेवायचे . अशाप्रकारे थोड्याच दिवसात तो अख्या चाळीचा लाडका बनला , त्यालादेखील माणसांचा लळा लागला . सकाळी उठल्याबरोबर तो या गॅलरीतून -त्या गॅलरीत जा -ये करायचा , कधी जोशी काकू बिस्कीट खायला द्यायच्या तर कधी पवार काका चिकनचा तुकडा खायला घालायचे . संध्याकाळी तो मुलांबरोबर मैदानात खेळायचा , मुले त्याला तोंडात बॉल कसा पकडायचा , शेकहॅण्ड कसा करायचा याचे ट्रेनिंग द्यायचे . संध्याकाळी महिला मंडळ गप्पा- गोष्टी करण्यासाठी बेंचवर बसल्या कि त्यांच्या पायाशी येऊन बसायचा , त्यादेखील त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवायच्या . संध्याकाळी म्हात्रे आजोबा फिरायला जायचे , तेव्हा कधी कधी तो त्यांची सोबत करायचा आणि रात्र झाली कि शंतनूच्या घरासमोर येऊन झोपायचा, असं त्याचं वेळापत्रक संपूर्ण चाळीला पाठ होतं .
थंडीचे दिवस सुरु झाले , मुलांनी जुना स्वेटर , ब्लॅंकेट
, गोधडी वगैरे आणून माँटीसाठी मऊमऊ बिछाना तयार केला . नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सेक्रेटरींनी अचानक रात्री मिटिंग बोलावली , मीटिंगचा मुद्दा देखील सांगितला नाही , अण्णा आणि काकू देखील बाहेरगावी गेलेत , काय झाले बरे ! असा विचार करत चाळीतील सभासद मैदानावर जमू लागले .
"सर्वजण जमल्यावर मुळे काकांनी आजची मिटिंग चाळीतल्या कामकाजाविषयी नसून अण्णांच्या retirement शी संबंधीत आहे", असे सांगितले. अण्णा मनमिळाऊ , परोपकारवृत्तीचे आणि भविष्याच्या माध्यमातून मानवसेवा करणारे आहेत , तेव्हा त्यांचा सत्कार व्हायलाच पाहिजे असे सर्वांनुमते ठरले . मुळे काका पुढे बोलू लागले , अण्णा पोस्ट खात्यातून ५ डिसेंबरला रिटायर होणार , तेव्हा गरवारे चाळीकडून त्यांचा सत्कार कशा पध्दतीने करावा , त्यांना काय भेटवस्तू द्यावी , याची चर्चा करण्याकरता तुम्हां सर्वांना बोलावले आहे . सत्यनारायणाची पूजा ठेऊन अण्णा आणि काकूंना पूजेला बसायला सांगायचे, अण्णांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा , काकूंना साडी देऊन भगिनी मंडळींना त्यांची ओटी भरायला सांगायचे, त्याचबरोबर अण्णा आता पूर्णवेळ भविष्य सांगण्यासाठी खर्च करणार आहेत , तेव्हा त्यांच्या नावाची पाटी देखील बनवूया असे चर्चेअंतीं ठरविण्यात आले.
हा, हा म्हणता अण्णांचा रिटायरमेंटचा दिवस जवळ आला . अण्णांनी पोस्टातील सर्व स्टाफला जेवण दिले, मागील ३५ वर्षांत त्यांना आलेले सुख -दुःखाचे अनुभव सर्वांबरोबर शेअर केले . पोस्टातील स्टाफकडून त्यांना चांदीची गणपतीची छोटी मूर्ती देण्यात आली . ऑफिसमधून निघतांना अण्णांचे डोळे पाण्याने भरून आले , स्टाफमध्ये देखील काहींचा, निरोप देताना कंठ दाटून आला . अण्णांच्या पाठीवर हात ठेवत , साहेब म्हणाले, "अण्णा , घाबरू नका , आता तुमची आणि आमची भेट जास्त होणार , आता तुम्हांला जो वेळ मिळेल तो तुम्हीं छंद जोपासण्यात घालवा, मागे मी विचारलेला प्रश्न अनुत्तरित राहिलेला आहे , असे म्हणून साहेबांनी अण्णांच्या कानात ' promotion ' हा शब्द सांगताच अण्णांनी घरी धूम ठोकली .
संध्याकाळी पूजा , जोडप्याचा सत्कार , लहान मुलांचे डान्स , जेवण यात रात्र कशी सरली ' गरवारे निवासींना कळलेच नाही. बच्चे कंपनीने तर अण्णांच्या दरवाजाला पाटी पण लटकवली .
श्री . सुधाकर तांबोळी उर्फ अण्णा
१०० % तंतोतंत भविष्य
फ्री फ्री
दरवाजावरील पाटी पाहून अण्णांचा चेहरा खुलला .
पण म्हणतात नां , सब दिन समान नहीं होते आणि अचानक तो दिवस उगवला . सूर्यनारायण नेहमीप्रमाणे आकाशात कामावर रुजू झाले , त्यांच्या आगमनाने सृष्टीत चैतन्य भरून गेले . गरवारे चाळीत देखील दिवस दूधवाल्याच्या आवाजाने सुरु झाला , पेपरवाला , मुलांची शाळेत जाण्याची गडबड , पाण्यासाठी घाई , ऑफिसला जाणाऱ्यांची घाई, महिला वर्गाची डब्यासाठी , नाश्तासाठी लगबग सुरु झाली , सारं कसं ठरल्याप्रमाणे सुरु झाले होते . सकाळ संपली आणि दुपार झाली , जेवणे आटोपून महिला वर्ग गॅलरीत उभा होता , नेहमी तो इकडे तिकडे फिरतांना दिसायचा पण, आज नजरेला पडत नव्हता .
सावंत काकी म्हणाल्या , " अगं तो दिसत नाही कुठे "?
अगं असेल असेल , कुणाच्यातरी घरी , पवार काकींनी उत्तर दिले . सर्वांना त्यांचं म्हणणे पटले . मग थोड्या गुजगोष्टी करून महिला वामकुक्षी घ्यायला गेल्या . संध्याकाळ झाली , मुले शाळेतून घरी आली तरी तो दिसेना , कदाचित म्हात्रे आजोबांबरोबर फिरायला गेला असेल , पहिल्या मजल्यावरच्या काकू बोलल्या . मग बच्चे कंपनीने आपला मोर्चा खेळण्याकडे वळवला . साडे सातच्या सुमारास म्हात्रे आजोबा गेटमधून आत येतांना दिसले , तसे सर्वांनी एकदम त्यांना " माँटी कुठे आहे "? असे विचारले .
या प्रश्नावर ते म्हणाले " मला नाही माहित , मी तर त्याला आज सकाळपासून पहिले देखील नाही . हे ऐकताच मुलांचे चेहरे झर्रकन उतरले , आता मात्र त्यांची मॉंटिला शोधण्यासाठी धावपळ सुरु झाली . प्रत्येकाच्या घरात डोकावून पहिले , येणाऱ्या - जाणाऱ्यांना विचारले , पण कुणीही त्याला पहिले नव्हते . थंडीचे दिवस , काळोख लवकर पडतो , बाहेर रस्त्यावर कुणाच्या गाडीखाली तर आला नसेल ना ! जोशी काकू सुस्कारा टाकत बोलल्या . त्यावर बच्चे कंपनीने टाहो फोडला , माँटी , माँटी , एव्हाना संपूर्ण चाळीला माँटी हरवला आहे हि बातमी समजली .
सर्वांनी धावत अण्णांचे घर गाठले , अण्णा सोफ्यावर पाय लांबकरून 'राशीफल ' हा कार्यक्रम पहात होते. सर्वांना एकत्र पहाताच अण्णा धास्तावले , त्यांनी काही विचारण्याच्या आतच , शंतनूने सारे काही सांगितले .
विपुल म्हणाला, "अण्णा कुंडलीची पुस्तके पाहून पटकन सांगा , कि माँटी कुठे भेटेल" .
सईने घाबरत विचारले ," त्याला काही इजा तर झाली नसेल ना" ! अण्णांनी मुलांना शांत बसायला सांगितले , मग त्यांनी ४-५ पुस्तके पहिली , पेपरवर काही गणिते मांडली , मग त्यांच्या लक्षात आलं , कि हातावरील रेषा पाहून आपला अंदाज चुकतो , आणि इथे तर पूर्णपणे अंदाज बांधायचा आहे , त्यातून माँटी तर त्यांच्या काळजाचा तुकडा , जर काही चुकले तर , या विचाराने अण्णा सैरभैर झाले , काकू स्वयंपाक घरातून अण्णांची मजा पहात होत्या .
अण्णांनी मोठया मुलांना पूर्व व उत्तर दिशेला तपास करण्यासाठी पाठवले . छोट्या मुलांना चाळीतील ठराविक ठिकाणी 'माँटी' आहे का ? पहायला सांगितले , पण पदरी निराशाच , तास -दिड तास झाला, तरी अण्णा तंतोतंत पत्ता सांगू शकले नाही , आज अण्णांच्या भविष्याची कसोटी होती, मुले देवाला साकडं घालू लागले. रात्रीचे अकरा वाजले , अख्खी चाळ मॉंटीच्या शोधार्थ बाहेर होती, आज कुणालाही जेवायची इच्छा नव्हती ,अण्णांनी सांगितलेल्या दिशा , ठिकाणं सगळी पालथी घातली होती पण व्यर्थ !
शेवटी अण्णा म्हणाले, " माँटीचा बिछाना पण गायब आहे , म्हणजे तो झोपलेला असतांना कोणी चोरून नेला कि काय" ? अण्णांच्या या वक्तव्यावर सर्वांनी उद्या police
complaint करूया असे ठरवले आणि ते सर्वजण घरी जायला निघणार इतक्यात त्यांच्या कानावर खुडबुड ऐकू आली , तसे सर्वजण त्या दिशेला धावत सुटले आणि बघतात तर काय ! जिन्याखालच्या अडगळीच्या जागेत माँटी त्याच्या बिछान्यात गुरफटला गेला होता आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी कुई कुई आवाज करत होता . मुलांनी त्याला बाहेर काढले , खाऊ-पिऊ घातले आणि नेहमीप्रमाणे शंतनूच्या घरासमोर बिछान्यावर निजवले . माँटी भेटला ,म्हणून अण्णा निर्धास्त होऊन घरी गेले .
सकाळी उठून अण्णा बाहेर येऊन बघतात तर काय ! अण्णांची बोलतीच बंद झाली , कारण मुलांनी पाटीवरील १०० % तंतोतंत भविष्य यातील १ नंबर पुसून टाकला होता,ते पाहून काकूंना हायसे वाटले .
Khoop sundar katha
उत्तर द्याहटवाThank you 😊
हटवाTell my bhavishya also Anna
उत्तर द्याहटवा😃😃
Anna aplya 100% madhil, 1 kuthe padla te shodhta ahet 🙂
हटवा