कारभारी .. लयभारी!
लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर
वस्तूंमुळे तर क्षणभर सुख, दुसऱ्या क्षणाला वस्तूंचा विसर पडतो देवा, जगाचा कारभार चालवण्याच्या निमित्त तुम्हीं सारखे बाहेर असता, कंटाळा येतो आम्हांला, निदान cooking मध्ये काही वेळ तरी जाईल,असे वाटते," देवी उदास मनाने बोलली.
तुम्हांला कुठे माहित आहे cooking ची झंझट? सकाळचा नाष्टा, डब्यातील मेनू, दुपारचे जेवण, संध्याकाळी चहाबरोबर snacks आणि रात्रीचे पोटभर जेवण, मृत्युलोकातील बायकांना कुठली भाजी आणि कुठला छानसा पदार्थ करायचा याचीच चिंता जास्त असते," देव म्हणाले.
तुम्हांस काय ठाऊक? तिने आश्चर्याने विचारले.
"अगं,पूजा करताना तोंडाने स्तोत्र म्हणतात आणि मनात संध्याकाळच्या मेनूचा विचार करतात," देव हसत म्हणाले.
"काहीतरी करावं असं वाटतं, पण कसं करू, समजतच नाही," देवी म्हणाली.
काय करू आणि कसं करू नुसता टाईमपास, त्यापेक्षा येथून पळ काढलेला बरा! असा विचार करून देव महालाबाहेर निघून गेले.
प्रत्येक देवी आपापल्या महालात विचार करत होती. काय करावे बरं! शेवटी त्यांनी एकमेकींना mind to mind मेसेज पाठवला आणि त्या ब्रह्मदेवाच्या महालात जमल्या.
देवींचा मोर्चा पाहून ब्रह्मदेव विचारात पडले. "काय झाले? तुम्हीं पुन्हा सर्वजणी एकत्र आलात, कुठली समस्या आहे का?" ब्रह्मदेवाने विचारले. रंभा पुढे होत म्हणाली," आम्हीं सर्वजणी वेगवेगळ्या दालनांत कामे करतो, स्वर्गात शांतता राहील, याची काळजी घेतो,पण आमच्यात कोण best आहे, हे तुम्हीं अजूनही ठरवलेले नाही." "मागीलवेळी स्वर्गात आलेल्या मानवाने चतुरपणे तुमची या प्रश्नापासून सुटका केली होती, पण त्यानंतर तुम्हीं आमच्या प्रश्नाची दखलच घेतली नाही, आमचा प्रश्न सीमावादाप्रमाणे पडून राहिला आहे, पणsss आता आम्हींच या प्रश्नाचे उत्तर शोधणार."
"नेमकं काय करणार तुम्हीं?” ब्रह्मदेवाने विचारले. "पुढच्या आठवड्यात, cooking competition ठरवली आहे, त्यात आम्हीं सर्वजणी भाग घेणार आणि आमची special dish बनवणार, पण त्या स्पर्धेसाठी आम्हांला एका जजची गरज आहे, तुम्हीं जज व्हाल का?” असे लक्ष्मीने विचारले.
मागच्या मोर्चाच्या वेळी झालेली फजिती ब्रह्मदेवांना आठवत होती. त्यामुळे "नेहमी हा मान मलाच का? यावेळी हा मान देवर्षींना देऊया," असे ब्रह्मदेव म्हणाले.
देवर्षी आम्हांला मृत्यूलोकातून सामान आणून देणार आहेत, त्यांना भाजीपाला आणि वाणसामान कुठे wholesale rate मध्ये मिळतो, हे ठाऊक आहे आणि आम्हां सर्वांना सामान आणून दिल्यावर त्यांना आमच्या recipe ची आयडिया येणारच ना! मग त्यांच्याकडून निकाल निष्पक्ष पद्धतीने कसा होईल? म्हणून देवर्षी नकोच! हे देवींचे म्हणणे ब्रह्मदेवांना पटले. मी एक आयडिया सुचवू का? असे ब्रह्मदेवाने विचारताच, 'हो चालेल' एका सुरात देवींकडून उत्तर आले. "प्रत्येक देवाच्या नावाची चिट्ठी बनवूया, त्या सर्व चिट्ठ्या एका सुवर्णपात्रात गोळा करूया व स्पर्धेच्या दिवशी देवर्षींना एक चिट्ठी उचलायला सांगूया, ज्या देवाचे नाव येईल तो जज होईल," ब्रह्मदेव म्हणाले. Good idea असे म्हणून सर्वजणी महालाबाहेर पडल्या.
दुसऱ्या दिवसापासून स्वर्गात गडबड, धावपळ सुरु झाली, कधी सुवास तर कधी जळका वास पसरु लागला. देवर्षींच्या या महालातून त्या महालात सारख्या फेऱ्या होऊ लागल्या, अगदी कैलासावर पण त्यांचे जाणे-येणे वाढले. सात दिवस भर्रकन उडाले आणि cooking competition चा दिवस उगवला.एका मोठ्या मैदानावर छोटे, छोटे स्टॉल्स उभारण्यात आले होते. प्रत्येक स्टॉलवर देवी साहित्यासहित म्हणजेच भाजीपाला, वाणसामान, मीठ-मसाला, इतर जिन्नस तसेच गॅस, भांडी व खरकटी भांडी ठेवायला मोठा टब यांच्यासहित उभी होती. देवर्षी अधून-मधून प्रत्येक स्टॉलवर विचारपूस करत होते.
ब्रह्मदेवांनी दिलेल्या आयडियानुसार, देवींनी चिठ्ठया तयार करून ठेवल्या होत्या. देवांना बसण्यासाठी मैदानासमोर सॊफ्याची व्यवस्था केली होती. ब्रह्मदेव येताच सर्व देव-देवींनी त्यांना अभिवादन केले. ब्रह्मदेवाने अभिवादन स्वीकारून सर्वांना बसायला सांगितले, त्यानंतर स्पर्धेबद्दलची माहिती सांगितली व देवर्षींना चिट्ठी उचलायची विनंती केली. माझ्या नावाची चिट्ठी निघाली म्हणजे निकाल माझ्या हातात येईल, मग काय, मी ठरवीन तसं , इंद्रदेव मनातल्या मनात विचार करत होते. पण देवर्षीनी चिट्ठी उघडून वरुणदेव असे सांगताच इंद्राचा चेहरा पडला.
"स्पर्धेसाठी ३ नियम आहेत, त्याचे सर्वांनी तंतोतंत पालन केले पाहिजे,” ब्रह्मदेव म्हणाले.
नियम क्रं १ : तुम्हां सर्वांना cooking चा अनुभव enjoy करायचा आहे, तर कुठल्याही दैवीशक्तीचा वापर करायचा नाही. Only logic no magic.
नियम क्रं २: cooking एकट्यानेच करायचे आहे.
नियम क्रं ३: वेळ १ तास १० मिनिटे, त्या वेळेनंतर स्पर्धक बाद केला जाईल.
स्टार्ट असे जजने म्हणताच, स्टॉलवर गडबड सुरु झाली. जेवण बनवण्याची प्रॅक्टिस नसल्यामुळे, नववधूप्रमाणे त्यांची गाळण उडाली. कुणाचे चमचे, कुणाच्या पळ्या खाली पडू लागल्या तर कुणाला तिखट-मिठाचा अंदाज येईना. वेळ पटापट संपत आहे, हे पाहून त्या धास्तावल्या. देवर्षी इकडे या, हे द्या, ते द्या, आम्हांला मदत करा, प्रत्येक स्टॉलवरून त्यांना हाका मारत होते. "देवा, वाचवा मला! किचनमध्ये बायकोच्या हाताखाली काम करण्याचा मला अनुभव नाही," देवर्षी रडवेल्या स्वरात म्हणाले.
कळलं ना आता! घरातील पुरुषमंडळी कोरोना काळात का वैतागली होती? महादेव हसत म्हणाले. बायका कूकिंग मध्ये busy झाल्या, हे पाहून पुरुषांची गप्पांची मैफिल रंगली.
"बरं झालं, दैवीशक्तीची परवानगी नाही, आता कळेल कोण बेस्ट आहे ते?" अश्विनीकुमार म्हणाले.
"पदार्थ फक्त चाखायचा आहे की, पोटभर खायला आहे, मला तर गणेशचतुर्थीची आठवण झाली, ११ दिवसात वेगवेगळे मिष्टान्न खायला मिळतात," बाप्पा हसत म्हणाले.
महादेवा, तुमच्याकडून ३ स्पर्धक आहेत, एखादे बक्षीस नक्की मिळणार, अग्निदेव हसत म्हणाले."असं कसं म्हणता? माझ्याकडून देखील २ स्पर्धक आहेत, पत्नी आणि ...," इंद्रदेव म्हणाले. इंद्राचे बोलणे ऐकताच,सर्व देव हसू लागले.
वरुणदेव त्यांच्या सौ.च्या स्टॉलकडेच पहात आहेत, कदाचित त्यांचाच पहिला नंबर येईल,असे अग्निदेव म्हणताच वायुदेव चिडले.
आता मात्र वरुणदेव घाबरले, निकालाअगोदर देवांच्यात हमरी-तुमरी तर निकालानंतर देवींच्यात काय होईल? एकमेकींचा द्वेष, मत्सर, टोमणे बापरे! स्वर्गातील शांतता हरवेल. ते म्हणाले,"महादेवा,बक्षिसे ३ आणि स्पर्धक जास्त, काय करू मी? नंबर १,२,3 अशी position मिळाल्यावर स्रियांच्यात हेवेदावे सुरु होतील, मग स्वर्गात शांतता राहील काय?” सर्वांना वरूणदेवाचे म्हणणे पटले. महादेव म्हणाले,"आमच्यकडे तर जास्त चिंता आहे, सासू जिंकली तर आदळआपट आणि सून जिंकली तर धुसफूस सुरु होईल."
काय करावे? देव विचारात पडले. महादेवांनी गजाननाकडे बोट केले. गजाननाने वरुणदेवांच्या कानात काहीतरी सांगितले आणि वरुणदेव निर्धास्त झाले. वरुणदेवाने वेळ संपत आली आहे, शेवटची ५ मिनिटे बाकी आहेत, असे म्हणताच हातांना वेग आला. स्टॉप असे म्हणताच स्पर्धकांनी कामे थांबवली. Competition संपताच वरुणदेवांनी प्रत्येक स्टॉलवर जाऊन पदार्थाची चव चाखली व त्याची नोंद आपल्या जवळ असलेल्या रजिस्टरमध्ये केली. स्पर्धक उत्सुकतेने त्यांच्या चेहऱ्याकडे बघत होते, चेहऱ्यावरील हावभावाचा अंदाज घेत होते, पण .. त्यांचा चेहरा निर्विकार होता. बंद रजिस्टरमध्ये विजेत्यांची नावे होती, पण त्या कोण? कळायला मार्ग नव्हता.
कटलेट, वडापाव, गुलाबजाम, गाजरचा हलवा, बिर्याणी असे वेगवेगळे पदार्थ बनवले होते. स्वच्छ असलेल्या मैदानावर, आता भाज्यांचे तुकडे, फळांच्या साली, प्लॅस्टिकच्या पिशव्या पडल्या होत्या, स्टॉलच्या बाजूला टबमध्ये खरकटी भांड्यांचा ढीग होता.
वरुणदेव बोलायला उभे राहिले. तुमचा cooking चा प्रयत्न यशस्वीपणे पार पडला आहे, याबद्दल त्यांनी सर्व देवींचे अभिनंदन केले. स्पर्धकांनी पुढील १५ मिनिटांत स्टॉलच्या बाजूचा परिसर व टबमधील भांडी स्वच्छ केली पाहिजेत, त्यांनतरच winners ची नावे जाहीर करण्यात येतील.
बक्षिसाच्या अपेक्षेने देवींनी स्वच्छता करण्यास सुरवात केली.
फक्त १५ मिनिटे, कसं शक्य आहे? आम्हांला भांडी घासायचा अनुभव नाही, स्पर्धक चिडले आणि रागारागाने बोलू लागले.
विष्णू पत्नी, लक्ष्मी बोलली, ठाऊक आहे ना! पार्वती, माझं महत्व दाखवण्यासाठी, जगच्चालक विष्णूंनी मला अनेकवेळा मदत केली आहे, मग आता का नाही करणार? लक्ष्मीचे बोलणे ऐकताच, विष्णू स्तब्ध झाले.
तेवढ्यात, अहो ऐकलंत का! पार्वतीने महादेवाला विचारले. काय? महादेवांनी विचारले. माझ्यासाठी तुम्हीं काय कराल? तिने हसत विचारले.
तू म्हणशील ते! महादेव हसत म्हणाले.
"मग या ना मैदानावर, मदत करायला, वेळ संपत आली आहे, मला जिंकायचे आहे आणि ते तुमच्या हातात आहे," पार्वती काकुळतीच्या स्वरात म्हणाली.
देवांचा देव महादेव, जर मदत करू शकतो तर तुम्हीं का नाही? या मैदानावर, सर्वजणी ओरडल्या.
लक्ष्मी बोलली: विष्णूजी, इकडे-तिकडे पडलेले मक्याचे दाणे, भाज्यांचे तुकडे भराभर उचला, प्लॅटफॉर्म स्वच्छ करा, तोपर्यंत मी भांडी घासते.
विष्णुदेव एकेक मक्याचा दाणा, भाजीचा तुकडा हळुवारपणे उचलू लागले. ते पाहून लक्ष्मी बोलली, अहो, आज काम संपवायचे आहे, उद्या नाही, स्पीड वाढवा.
तर दुसरीकडे पार्वती म्हणाली," महादेवा, वडापाव नंतर खा, पहिले गॅसवर सांडलेले बेसनपीठ स्वच्छ पुसा, वस्तू नीट ठेवा. ok असे म्हणत महादेवांनी सुरवात केली. गॅस पुसायच्या अगोदर, त्यांनी प्लॅटफॉर्मवरच्या वस्तू गॅस शेगडीवर ठेवल्या. हे पाहून पार्वती ओरडली, अहो, हे काय करताय? गॅसवर तेल, बेसनपीठ सांडलंय, इतर वस्तू तेलकट होतील ना! धड काम करणारच नाही, नुसता गोंधळ!"
करतोय ना काम! चिडते कशाला?” महादेव म्हणाले.
रंभा काम करत आहे, हे पाहून इंद्राला वाईट वाटले. तिला जिंकवावं का? असा विचार मनात येताच इंद्रदेव त्या बाजूला वळले.
ते पाहून इंद्रपत्नी ओरडली, अहो तिकडे कुठे चाललाय? इकडे या, मला मदत करायला. नाईलाजाने ते धर्मपत्नीच्या स्टॉलकडे वळले. "काय करू सांग", ते रागाने म्हणाले. "काय करू म्हणून काय विचारता ? भांडी घासा," ती रागाने म्हणाली. "अगं, ते बायकांचे काम आहे,” इंद्रदेव रागाने म्हणाले. "मग तुमचे फक्त खायचे आणि प्यायचे काम आहे का?" ती रागाने म्हणाली.
तेवढ्यात रिद्धीचा आवाज आला, किचनमधील पदार्थांवर ताव मारता, पण किचनमध्ये काम करायला शिकवले नाही का? गजाननाने आईकडे बोट दाखविले.
आता मात्र देवींना अंदाज आला की, देवांच्या मदतीने जिंकणे तर सोडा, पण काम देखील पूर्ण होणार नाही. सरते शेवटी लक्ष्मी म्हणाली," पुरे, झाली तुमची मदत, तुमच्यापेक्षा मृत्यूलोकातील पुरुष किचनमध्ये काम करण्यात तरबेज आहेत.” असे म्हणून तिने दैवीशक्तीचा वापर करून मैदान स्वच्छ केले आणि सर्वजणी निघून गेल्या. इकडे सर्व देव, गंधर्व हसत हसत इंद्रदेवाच्या महालात जमले आणि plan successful झाल्याच्या आनंदात सर्वांनी सोमरसचा पेला उचलत cheers केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा