प्लॅशबॅक

लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर

"आई, २ किलो रव्याचे लाडू आजीकडून घेऊन ये, किती छान बनवते ती लाडू! तोंडात घालताच विरघळतो,” अवनी बोलत होती. "अगं अजून माझं ठरलं नाही जायचं, तर तुझ्या demands सुरु," मी तिला म्हणाले. ठरलं नाही म्हणजे? तिकीट book झाले आहे, आता तू कुडाळला जाणार आहेस, मी तुझे सामान pack करायला घेते, असे बोलून ती आतल्या खोलीत गेली.  

तिकीट काय, कॅन्सल पण करता येईल! जाऊदे थोडं नुकसान होईल, ऐवीतेवी खर्च होतोच की! आता त्यांना भेटण्याचं कारणच नाही, २० वर्ष उलटली, बराच काळ निघून गेला आहे, मी स्वतःशी बोलत होते. आईशी फोनवर बोलणे तर होत आहे, तिला नंतरही भेटता येईल, आताच घाईने जायची गरज नाही, मी मनाशी ठरवले. शी! काय वेड्यासारखे वागले मी लहानपणी! जरा शहाण्यासारखी वागले असते तर! आज लाज वाटली नसती, शाळेत रुसवे -फुगवे तर होतेच, कॉलेजमध्ये देखील चिडचिड, आणि..... नकोच त्या आठवणी!

तेवढयात दारावरची बेल वाजली आणि मी आठवणींतून बाहेर आले.

झाली का तुझी तयारी? उद्या सकाळी तुला 'सिंधुदुर्ग एक्सप्रेस' मध्ये बसवून मी ऑफिसला जाईन, आशिष, माझा नवरा बोलत होता. अवनीने आतून आवाज दिला, बाबा, मी आईची बॅग तयार केली आहे. पण माझ्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. हे पाहून आशिष म्हणाले," अगं जा, सगळ्या मित्र-मैत्रिणींना भेट, रुसवे-फुगवे, वेडेपणा करणे, लहान असताना ह्या गोष्टी सगळ्यांच्या आयुष्यात घडतात, त्याचा जास्त विचार करू नकोस, भूतकाळ दुरुस्त करण्यापेक्षा वर्तमान चांगला घालव म्हणजे ह्या आठवणी शेवटपर्यंत राहतील.”

दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता पनवेल येथे सिंधुदुर्ग एक्सप्रेसमध्ये चढले. ७.१० ला ट्रेन सुटली, काळजी घे, असे बोलून ते निघाले. आज पहिल्यांदाच मी एकटीने प्रवास करत होती त्यामुळे थोडी घाबरली होती. कंपार्टमेंटमध्ये नजर फिरवली, तो जवळ जवळ पूर्ण भरलेला होता. १५ ते २० मिनिटांत चहा- कॉफी वाल्यांची ये-जा सुरु झाली. चहाचा कप घेऊन मी खिडकीबाहेर बघू लागले. ट्रेन पुढे जात होती पण माझे मन मात्र पाठीमागे धावत होते.

Jack and Jill went up the hill, nursery ची poem कानावर पडताच मी मान वळवली. माझ्या बाजूच्या बर्थवर दोन छोट्या मुली बसल्या होत्या. हातात हात घालून त्या मजेत गाणी गात होत्या. त्यांना बघून मला माझ्या बालवाडीची आठवण झाली. मी देखील अशीच गाणी म्हणत असणार ना! वय तीन-साडे तीन वर्ष, फारच लहान, तो काळ आता मला आठवत नाही. थोडावेळ त्यांची गाणी ऐकली, माझा मूड चांगला झाला. मी पुढच्या वर्गाकडे वळले.

खरी शाळा तर पहिलीपासून सुरु होते. युनिफॉर्म, बॅग, बॉटल आणि हळूहळू वाढणारा अभ्यास. कट्टी बट्टि याच वयात शिकतो आपण! कट्टी बट्टि बारा बट्टि ..... आता पुढचं आठवत नाही, पण तेव्हा सारखं ओठावर असायचं.

आजच्यासारखी शाळांची संख्या त्या काळी नव्हती. आमच्या गावात दोनच शाळा होत्या. एक गावात आणि दुसरी गावापासून लांब होती. पहिलीत आम्हीं एकमेकांना अनोळखी होतो, त्यामुळे कुणीही फारसे बोलत नव्हते. दुसऱ्या इयत्तेतील गोष्ट मला एकदम आठवली, मराठीचा तास चालू होता, सरांनी कमळ सुंदर आहे, असे वाक्य वहीत लिहायला सांगितले. सर वर्गात फिरताना आमच्या वह्या तपासायचे. रुपेश, माझा वर्गमित्र, त्याने कमळ शब्दाच्या ऐवजी 'कमल सुंदर आहे' असे लिहिले होते. सरांना वाटले, त्याने मुलीचे नाव लिहिले म्हणून त्याच्या पाठीवर धम्मक लाडू दिला. मला एकदम हसू आले. आता कुठे बरं असेल तो? ही गोष्ट तो अजूनही विसरला नसेल, नाही का?

माझे आजोबा मला म्हणायचे, " फुलपाखराप्रमाणे, या फुलावरून त्या फुलावर भिरभिरत आहेस, दमत नाहीस का?" किती स्वछंद आयुष्य होतं माझं! तो काळ आईच्या लक्षात असेल, गावाला गेल्यावर तिच्याकडून गमती-जमती ऐकेन.

मोबाईलची रिंग वाजली तशी मी भानावर आली. अवनी बोलली, आई सँडविच खाल्ले का? टेस्ट कशी वाटली? मी तिला म्हणाले," थोड्यावेळाने खाईन." OK, bye आई असे म्हणून तिने फोन ठेवला. फोन ठेवताच मी पुन्हा भूतकाळात गेले.

माझं मन पाचवीच्या वर्गात पोहचलं, त्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. मुलं किती निरागस असतात त्या वयात, भेदभाव नसतोच मुळी त्यांच्यात! खाणे-पिणे, खेळणे आणि अभ्यास करणे या व्यतिरिक्त कुठलीच जबाबदारी नसते. मनात, मुलगा-मुलगी हा भेद पण नसतो. फक्त मित्र-मैत्रिणी आहोत, ही एकच भावना मनात होती.

पाचवी नंतर मात्र विषय वाढले, अभ्यास वाढला. माझ्या दोन खास मैत्रिणी झाल्या होत्या. एकत्र डबा खाणे, एकत्र खेळणे, खूप बडबड करणे, धमाल करायचो आम्हीं! या बडबडण्यामुळे आम्हांला शिक्षा देखील झाली होती पण आम्हीं गप्प बसलो नाही, वेडेपणाच नाही का! आणि आता मला बडबड करायला वेळ आहे पण घरातील माणसे बिझी आहेत. हळूहळू आम्हीं एकमेकांना ओळखायला लागलो होतो. अभ्यासाच्या निमित्ताने एकमेकांकडे जाणे-येणे व्हायचे आणि त्यामुळे काहींची जवळीक वाढली. 💝मध्ये त्यांची नावे लिहिली जायची. वर्गात त्यांना एकमेकांच्या नावावरुन चिडवायचे. पण आम्हीं तिघी मात्र ह्यापासून अलिप्त होतो, जणूकाही आमच्या विश्वात रममाण होतो.

आठवीच्या वर्गात आले आणि restrictions वाढली. त्याकाळी आजच्यासारखी परिस्थिती नव्हती. आज मुलामुलींना freedom आहे, बंधने नाहीत. पण २५-२६ वर्षांपूर्वी, मुलींनी दिवेलागणीच्या अगोदर घरी यायचे असा नियम होता, मुलांना देखील फार स्वैराचार नव्हता. तरी प्रत्येक क्लासमध्ये एखादा रोमिओ असायचा, जो शिटी मारून आपल्या ज्युलिएटचा शोध घ्यायचा.

कंपार्टमेंटमध्ये लोकांनी ब्रेकफास्ट खायला सुरुवात केली, हे पाहून मी सँडविचचा डबा उघडला. अवनीने सँडविच खूप छान बनवले होते, Gen-Z वर जबाबदारी टाकायला हरकत नाही, मनात विचार चमकला. very tasty, thank u असा message तिला पाठवला. घड्याळात पहिले, १०.३० वाजले होते. प्रवास सुरु होऊन ३ तास झाले होते. समोरच्या कंपार्टमेंटमधून फिल्मी गाण्यांचा आवाज ऐकू आला. बहुतेक मुलामुलींचा ग्रुप कोकणला जात असावा. माझे मन नकळत नववीच्या वर्गात जाऊन बसले. वर्गातील त्या तीन जोड्या, जणूकाही 'हम साथ साथ है' चे हिरो-हिरोईन. कधी एखादा तास फ्री मिळाला तर गाण्यांच्या भेंड्या खेळायला आग्रह करायचे. लग्न केले असेल का त्यांनी? का उगीच टाईमपास? कुठे बरं असतील ते आता? माझ्या नजरेसमोर त्या तीन जोड्या आल्या. गावाला गेले की चौकशी करूया, यावेळी मी एकटीच जात आहे, निवांत वेळ आहे.

माझी मैत्री दहावीनंतर विखुरली जाईल, असे स्वप्नात देखील वाटले नव्हते. ११ वीला आम्हीं तिघीनीं वेगवेगळ्या शाखांना प्रवेश घेतला. त्यामुळे एकमेकींकडे जाणे-येणे, बोलणे-भेटणे कमी झाले. लग्नानंतर, आम्हीं एकमेकींना भेटलोच नाही, त्याकाळी मोबाईल नव्हते, टेलिफोन देखील घरोघरी नव्हते . गावाला गेल्यावर त्यांच्या घरी जाऊन, त्यांचा मोबाईल नंबर घेते. इतक्या वर्षांनी त्यांच्याशी बोलेन, पुन्हा एकदा बडबड सुरु होईल त्या पण खुश होतील, कारण आता आमचे विषय same असतील.

pantry car मधून जेवणाच्या ऑर्डर्स येऊ लागल्या, मी घड्याळात पहिले, १ वाजला होता. सँडविच खाल्याने पोट भरलेले होते म्हणून मी ऑर्डर द्यायचे टाळले होते. थोड्यावेळाने चहा घेऊ असा विचार करताना, माझे मन नकळत उच्च माध्यमिक शाळा, ११ वी कडे धावू लागले. मैत्रिणी सोबत नसल्यामुळे मी नाखूष होते आणि त्यात माझा भिडस्त स्वभाव, त्यामुळे कुणाशीही पटकन मैत्री होत नव्हती. कुठल्याही कार्यक्रमात मी भाग घेतला नाही की, सहलीला पण गेले नाही, बस! वर्ष संपायची वाट बघितली. आम्हीं तिघीजणी कधीतरी भेटायचो पण बोलण्याचे विषय वेगवेगळे झाले होते. ११ वी सरले आणि १२ वी बोर्डाचे वर्ष सुरु झाले. अभ्यासाचे टेन्शन वाढले, परीक्षेची भीती आणि १२ वी नंतर पुढे काय? शिक्षणातला शेवटचा turning point. पुढील शिक्षणासाठी मी जिल्ह्याला जायचे ठरवले. म्हणजे, ११वी, १२वी चे बॅचमेट्स पुन्हा बदलणार. मी मनाशी ठरवले, graduation शिक्षणातला शेवटचा टप्पा! ह्यानंतर पुन्हा शिक्षण घेणे होईल की नाही? त्यापेक्षा कॉलेजची ही तीन वर्ष एन्जॉय करायची, सगळ्यांशी मैत्री करायची कदाचित हेच मित्र-मैत्रिणी contact मध्ये राहतील. आणि त्याच graduation च्या मित्र-मैत्रिणींनी उद्या get together celebrate करायचे ठरवले आहे.

Graduation ला वीस वर्ष पूर्ण झाली. मी त्या मित्र-मैत्रिणींना ओळखेन का? २० वर्षात त्यांच्यात देखील बदल झाला असेल ना! केस पिकायला लागले असतील, डोळ्यावर चष्मा आला असेल, कपाळावर fine lines आल्या असतील, अल्लडपणा जाऊन परिपक्वता आली असेल. मोबाईलची रिंग वाजली, मी फोन उचलला. कुठे पोचली? आशिष विचारत होते. मी चटकन म्हणाले," graduation च्या पहिल्या वर्षाला पोहचले." छान, छान, मित्र -मैत्रिणींची नावे आठवायचा प्रयत्न कर म्हणजे ओळखताना त्रास होणार नाही, असे बोलून त्यांनी फोन ठेवला. किती समजूतदार नवरा आहे माझा! माझ्या मनातील विचार पटकन ओळखले, मी स्वतःशीच हसले.

कॉलेजचे पहिले वर्ष, कॉलेज गावापासून लांब होते, बसने जायला लागायचे. प्रवासात तहान लागली तर? म्हणून मी पाण्याची बॉटल जवळ ठेवायची. कॉलेज सुरु होऊन जेमतेम एक महिना झाला होता, अचानक त्याचा मित्र समोर आला, राजेशला उन्हामुळे भोवळ आली आहे, तुझ्याजवळ पाणी आहे का? मी चटकन पाण्याची बॉटल त्याला दिली. कॉलेज सुटल्यावर, तो स्वतःहून मला thank you म्हणायला आला, मी राजेश पाटील, अशी त्याने स्वतःची ओळख करून दिली. त्यानंतर अधूनमधून राजेश पाण्याची बॉटल मागायचा, मी देखील नाही म्हणायचे नाही, पण वर्गात कुजबुज होऊ लागली. एक दिवशी मी पाण्याची बॉटल त्याच्या बेंचवर आपटली व रागाने म्हणाले," तुझ्यासाठी ठेव, मी दुसरी आणीन." त्या प्रसंगानंतर मला 'चिडका बिबा' असे टोपणनाव पडले. आता असे वाटते, उगाच चिडले, रागावले, वेडेपणा नाही का! त्याला हा प्रसंग अजूनही आठवत असेल का?

ऑगस्ट महिन्यात, friendship day साजरा केला होता, एका मोठ्या हॉलमध्ये आम्हीं सर्वजण जमलो होतो. फिशपॉन्ड काय असतो, हे मला मिळाल्यावर समजले,

मोठे डोळे, गोबरे गाल

हिच्या नाकाचा शेंडा

नेहमीच लाल.

फिशपॉन्ड ऐकून मी खूप रागावले, ठरवले, कुणाशीही contact ठेवणार नाही आणि आता.... इतक्या वर्षानंतर भेटणार ...कसं बोलू?

राखीपौर्णिमेला मुले गायब असायची, आम्हीं मुली सगळ्यांसाठी राख्या घेऊन यायचो पण वर्गात मुले नसायची. मग त्या दिवशी आम्हीं मुली मनसोक्त गाण्याच्या भेंड्या खेळायचो, डान्स करायचो, तो दिवस girls day म्हणून एन्जॉय करायचो. नोट्सच्या निमित्ताने हळूहळू एकमेकांशी बोलणे सुरु झाले होते. पण फर्स्ट ईयरला कुणी अभ्यासात सिरीयस नव्हते, वेगवेगळे डेज आणि गँदरिंग नुसती धम्माल! माझा भिडस्त स्वभाव जाऊन मी बोलकी झाले होते. आम्हीं मित्रमैत्रिणी कधीतरी पिच्चरला जायचो, वडापाव, मिसळ, भजी, असे बाहेरचे पदार्थ खायचो. कॉलेजचे दिवस मौजेचे होते, माझं friend circle वाढत होतं.

आपण Rose Day सेलिब्रेट करूया का? त्याने मित्रांना विचारले. "गुलाबाची फुले आणायची जबाबदारी माझी, तुम्हीं तुमचे गुलाब शोधा फक्त!" तो हसत म्हणाला. नवीन वर्षाच्या सुरवातीला, म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात Rose Day चे celebration एका मोठ्या हॉलमध्ये करण्यात आलं होतं. फुलाबरोबर चारोळी अशी कार्यक्रमाची आयडिया होती. तो दिवस मला चांगला आठवतो. मुलांच्या हातात वेगवेगळ्या रंगांचे गुलाब दिसत होते. मुलीचे नाव announce करून तिच्यासाठी लिहिलेली चारोळी वाचून दाखवत होते व ते फुल तिला देत होते. काहींना पिवळा गुलाब तर काहींना पिंक गुलाब मिळाला होता. मी कार्यक्रम enjoy करत होते आणि अचानक माझं नाव घेतलं,

गुलाबाच्या फुलाला, काट्यांशिवाय मजा नाही,

तुझ्याविना माझं आयुष्य, सजेपेक्षा कमी नाही

आणि लाल गुलाब मला देण्यात आला. पण लिहिणाऱ्याचे नाव मात्र गुपित ठेवले. मी काही अशा भानगडीत पडणार नाही, मी निक्षून सांगितले आणि पुन्हा मी माझ्या कोषात गेले. पुढची दोन वर्ष मी अभ्यासावर लक्ष दिले, अगदी graduation नंतरच्या पार्टीला पण गेले नाही.

Graduation नंतर माझं शुभमंगल झाले आणि मी मुंबईत आले. संसाराच्या रहाटगाड्यात मी सारं विसरून गेले आणि आज २० वर्षांनी मी पुन्हा त्या सर्वांना भेटणार, कशी बोलू त्यांच्याशी? मी संभ्रमात आहे. कुडाळ स्टेशनची announcement झाली, तशी मी भानावर आले. प्रवासी सामान घेऊन दरवाज्यापाशी उभे राहत होते. माझ्या मनाची चलबिचलता वाढली. गाडी प्लॅटफॉर्मला लागली. प्लॅटफॉर्मवर गर्दी होती. मी सामान घेऊन उतरले. मला आवाज आला, Hi आसावरी, माझ्यासमोर पुरुष आणि बायकांचा घोळका होता. मी चेहरे आठवण्याचा प्रयत्न करू लागले आणि अचानक बॉटल घेऊन कुणीतरी समोर आले. मी कोण? असे विचारणार, इतक्यात सर्वांनी ओरडून सांगितले, तुझ्या मुलीचा मामा आणि मी खळखळून हसले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुन्हा भेटूया .. ⏳

आणि माझा . . . झाला

An Evening in SwargLok