चला, श्रीमंत होऊया ...! 💰

 

लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर

        आजकाल जिकडे पहावे तिकडे एकच ध्यास, श्रीमंत होण्याचा, मग राधाकाकू या ध्यासापासून कशा अलिप्त राहणार ?

अहो ऐकताय ना ? नुसते कांदेपोहे खात बसू नका, मी काय म्हणते याचा विचार करा . 

"माझं तोंडाबरोबर डोकंपण काम करत आहे, तू बोल", श्रीरंगराव, राधाकाकूंचे यजमान हसत म्हणाले.

" तुमच्या sense organs चा ताळमेळ नसतो आणि तुम्हीं sixth senseची गोष्ट बोलताय", राधाकाकू चिडून म्हणाल्या. हे पाहून त्यांच्या मुलांनी म्हणजेच प्रतीक आणि प्राची यांनी नाश्ता उरकला. नाश्ता झाल्यावर श्रीरंगरावांनी, मुलांना त्यांच्या आईचा विचार सांगितला.

त्यावर प्रतीक म्हणाला," आई पुढच्यावर्षी माझे graduation पूर्ण होणार, मग मी नोकरीला लागेन, त्यानंतर थोडा खर्चाचा भार मी उचलीन ".

हे ऐकून राधाकाकू म्हणाल्या," प्रतीक तू जबाबदारी घ्यायची तयारी दाखवलीस, मला खूप बरे वाटले". त्या पुढे म्हणाल्या ," आता तुम्हीं मोठे झालात, प्राचीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तिचे लग्न नंतर तुझे लग्न आणि महागाई किती वाढली आहे, ठाऊक आहे ना ! सोनं  लाखाच्या घरात गेले आहे,  तुमच्या लग्नापर्यंत आणखी महाग होईल". "तुमच्या वडिलांची सरकारी नोकरी आहे पण पगार टेबलवरून घेतात, खालून नाही , त्यामुळे इतरांसारखा मोठा फ्लॅट, गाडी आपल्याकडे नाही आणि सकाळी तुम्ही बाहेर पडल्यावर, दुपारी माझ्याकडे निवांत वेळ असतो म्हणून मी काहीतरी करायचे ठरवले आहे,” असे म्हणून राधाकाकू जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या .

भाजी जळाल्याचा वास घरभर पसरला तशी प्राची स्वयंपाकघरात धावत गेली . तिने चटकन भाजी खालचा गॅस बंद केला, पातेल्यावरचे झाकण काढले , भाजी पूर्णपणे जळली होती आणि काकू खिडकीपाशी उभ्या राहून विचारात गढून गेल्या होत्या .

प्राची जोरात ओरडली, आई, लक्ष कुठे तुझे ? सगळी भाजी जळली, आता दुसरी भाजी बनवावी लागणार अशाने आपण श्रीमंत तर नाही पण गरीब नक्कीच होऊ, असे बोलून ती तणतणत बाहेर गेली.

काकूंनी तिच्या बोलण्याकडे जराही लक्ष दिले नाही कारण दुपारी जेवताना, त्यांना त्यांचा business plan सांगायचा होता .

जेवण तयार झाले, त्यांनी ताटं वाढायला घेतली, मुलं, नवरा सर्वजण जेवायला बसले . काकू बोलू लागल्या , श्रीमंत होण्यासाठी अनेक मार्ग आहेत , पण ते सर्व मार्ग मला जमतील असे नाही . हल्ली माणसे शेअर मार्केट मधून पैसा कमावतात, पण आपलं मध्यमवर्गीय कुटुंब त्यामुळे extra money आपल्याकडे नाहीत.

"आई आपल्याकडे जर extra money असते, तर तू धंदा करायचा विचार केला असता का ? श्रीमंत बायकांसारखी , तू kitty party , shopping ला गेली नसती का" ? प्राची हसून म्हणाली.

" म्हणजे हा option – cut," प्रतीक म्हणाला.

घरगुती खानावळ चालू करूया, असा विचार करत होते , पण हल्ली लोकांचे जिभेचे चोचले जास्त आहेत , त्यांना चटपटीत , वेगवेगळे पदार्थ हवे असतात , त्यामुळे एवढे पदार्थ बनवायचे आणि संपले नाही तर .....

"तसं तू जेवण बरं बनवतेस,” असे म्हणत श्रीरंगरावांनी डब्यातून एक पोळी ताटात घेतली.

"तुम्हीं फक्त नावं ठेवा, कधी कौतुक करणार नाही बायकोचे, बरं म्हणायचे आणि तिसरी पोळी ताटात घ्यायची, मला कळत नाही का? बाजूचे शामराव बघा , बायकोच्या प्रत्येक गोष्टीला छान असेच म्हणतात , अगदी पाण्याचा ग्लास दिला तरीही "... काकू डोळयाला पदर लावत म्हणाल्या.

"अगं, ती पाणी पण बनवते, कमाल आहे तिची! आता पाणीटंचाईचा प्रश्न सुटला", श्रीरंगराव म्हणाले.

"फालतू विनोद करू नका, त्यांचे बायकोवरचे प्रेम पहा, तिला जराही दुखवत नाहीत", काकू चिडून बोलल्या.

" याला प्रेम नाही, भीती म्हणतात, " श्रीरंगराव हसत म्हणाले.

दोघांच्या भांडणाला आणखी रंग चढण्याअगोदर, प्राची चटकन म्हणाली,"हाही option- cut".

मी आता पन्नाशीकडे झुकलेली , त्यामुळे नोकरी मिळणे शक्यच नाही आणि या स्पर्धेच्या युगात तरुण मंडळीच्या समोर माझा काय निभाव लागणार ! काकू बोलल्या .

मग श्रीमंत होण्यासाठी तू काय करणार ? तिघांनी एका सुरात विचारले .

पाळणाघर चालू करूया , असा विचार केला आहे , no investment , only profit , काकू हसत बोलल्या .

 मुलांचे करून कंटाळली आहे , असे तू म्हणत होतीस , मग हा नवीन त्रास कशाला ? श्रीरंगराव नाराजीच्या सुरात बोलले. ते पुढे म्हणाले, "सुरवातीला फक्त ४ तास पाळणाघर चालू ठेव , तुला जमतंय का पहा ? लहान मुलांच्यापाठी धावपळ करावी लागते , आपली मुले आता मोठी झालीत, त्यामुळे मुलांना सांभाळण्याची सवय तुला नाही".

एकटीला तुला जमेल का, आई ? प्राचीने मध्येच विचारले.

"सुनंदा, माझी मैत्रीण आणि आपल्याकडे काम करणारी मालती या दोघी मदत करणार आहेत, त्यांना थोडे पैसे देणार आहे, प्रत्येक मुलामागे ४०००/- rate ठरवला आहे, काकूंनी business plan जाहीर केला.

त्या पुढे म्हणाल्या, " तिघीजणी आहोत, त्यामुळे आरामात ८ तास पाळणाघर चालवू, तुम्हीं चिंता करू नका."

बरं, असे म्हणून त्यांचे यजमान निघून गेले.

धंद्याची advertise कशी करणार ? प्रतीकने विचारले

Social media चा जमाना आहे, Whatsapp group वर messsage पाठवला आहे, असे बोलून काकूंनी message दाखवला.

मुलांनी आईला All the best for your business , असे म्हणताच त्यांना आनंद झाला .

क्लासला जाताना प्राचीने वडिलांकडे १०० रुपये मागितले व ती म्हणाली, "बाबा आता थोडे दिवसच मागणार , आईचा business सुरु झाला की आईकडे मागेन", हे प्राचीचे बोलणे ऐकून श्रीरंगरावांनी राधाकडे पहिले, त्या गालातल्या गालात हसत होत्या .

पाळणाघर दोन दिवसांनी म्हणजेच, १ जूनपासून सुरु होणार होते. १ तारखेला सकाळी लवकर  उठून, काकूंनी जेवण बनवले आणि announce केले की, आजपासून ९ ते ५ हा माझा business time असणार, तरी या वेळेत मी कुठलेही दुसरे काम करणार नाही .

बरोबर नऊ वाजता, पाच जणी मुलांना घेऊन आल्या, राधाकाकू आणि सुनंदा त्यांच्या स्वागताला हजर होत्या. काही मुले रडत होती तर काही आईला बिलगत होती. काकू त्यांना म्हणाल्या ," काही काळजी करू नका, आईप्रमाणे माया लावीन, मलादेखील दोन मुले आहेत", असे बोलून त्यांनी मुलांच्या बॅग्स घेतल्या व त्यांना घरात नेले.

त्यांनी मुलांना खाऊ दिला, गाणी म्हणून दाखवली, टीव्हीवर cartoon channel लावले, मुले हळूहळू रमू लागली . दोनपर्यंतचा वेळ मजेत गेला, त्यानंतर मात्र त्या दोघी पेंगायला लागल्या कारण त्यांच्या वामकुक्षीची वेळ झाली होती. 'माणूस हा सवयीचा गुलाम आहे', असे म्हणतात ते काही खोटे नाही, काकू हसत बोलल्या. मग मुलांना गोष्टी सांगून, त्यांच्याबरोबर खेळ खेळून त्यांनी कशीबशी दुपार घालवली .

रात्री सर्वजण लवकर जेवले , राधाकाकू बेडवर आडव्या होताच झोपी गेल्या, हे पाहून श्रीरंगरावांनी जाणले की, राधा खूप दमली आहे, त्यांनी तिच्या अंगावर चादर पांघरली आणि लाईट बंद केली.

दुसरा दिवस उजाडला, नेहमीप्रमाणे काकूंची सकाळची गडबड सुरु झाली, त्या वारंवार घड्याळाकडे पहात होत्या, ८. ३० वाजलेत अजून अर्धा तास बाकी आहे , दोन - तीन कामं पण बाकी आहेत, नऊपर्यंत होऊन जातील ,असा मनात विचार करत असतानाच बेल वाजली. घाईघाईत त्यांनी दरवाजा उघडला , समोर तनय आणि त्याची आई उभे होते . तनयची आई म्हणाली ," मला आज ऑफिसला लवकर बोलावले आहे, म्हणून... " बिचाऱ्या काकू काय बोलणार ! business मध्ये ओव्हरटाईम करावा लागतो याचा त्यांनी विचारच केला नव्हता. बरं, असे म्हणत त्यांनी तनयला आत घेतले , टीव्ही चालू केला व त्याला म्हणाल्या ," शांत बस हं बाळ , आता तुझे मित्र खेळायला येतील , तोपर्यंत तू टीव्हीवर छोटा भीम पहा ", असे म्हणून त्या पुढील कामे करण्यासाठी आत गेल्या . तनयने, भीम लाडू खात आहे, हे पाहून आपला डबा बॅगमधून बाहेर काढला, डबा उघडायला गेला तोच हातातून पडला व सर्व खाऊ जमिनीवर सांडला. नेहमी टापटीप असणारे घर, अस्ताव्यस्त होत आहे, हे पाहून त्यांच्या यजमानांनी आणि मुलांनी घरातून पळ काढला .

मालतीने घरात येताच पसारा पहिला, तश्या तिच्या कपाळावर आठ्या उमटल्या. ती काकूंना म्हणाली, "आता रोजच असा पसारा असणार, महिन्याचे २०००/- कमी आहेत, मला २५००/- पाहिजेत". काकू तिच्याकडे आ वासून पाहू लागल्या, दुसऱ्यादिवशीच पगार वाढ मागणारा कर्मचारी आपल्याकडे काम करत आहे, हे पाहून त्या घाबरल्या .

दुसऱ्यादिवशी मुले जरा धीट बनली होती, सोफ्यावर चढ, कुशन फेक, स्वयंपाकघरात जा, मनाला येईल तसे वागत होती, त्यांच्या पाठीमागे पळता, पळता सुनंदा दमून गेली . ३ वाजले तरी मुले झोपायला तयार नव्हती,पण तिचे डोळे मात्र मिटू लागले होते. शेवटी ३. ४० ला पाहुणे घरी येणार आहेत, अशी थाप ठोकून ती निघाली. काकूंना ठाऊक होते, सुनंदा खोटे बोलत आहे ,पण त्या हार मानणार नव्हत्या, देशात businessman असेच मोठे झाले नाहीत, त्यांनादेखील पार्टनरने फसवले असेल, अडचणीत साथ सोडली असेल, पण त्यांनी न घाबरता प्रयत्न चालूच ठेवले, मला त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. पुढील १-२ वर्षात, आईसारखी माया लावणारे पाळणाघर म्हणून माझे नाव प्रसिद्ध होईल, आज ५ मुले आहेत, उद्या ५० होतील, मग सुनंदाच काय, आणखी दोन बायका कामाला ठेवीन , असा विचार करताना, त्यांना perfume चा वास आला, त्यांनी वळून पहिले तर रिया प्रतिकची perfume bottle घरभर spray करत होती, त्या रियाला पकडेपर्यंत, तिने अर्धी bottle संपवली . हे पाहून काकूंनी डोक्याला हात लावला . मागच्या आठवड्यात विकत आणली होती आणि आज निम्मी, पहिल्या महिन्यात बहुतेक तोटाच दिसतोय, त्या मनाशी म्हणाल्या .

त्यानंतर एकाला खाऊ , दुसऱ्याला पाणी , तिसऱ्याची मस्ती हे सर्व सांभाळताना त्यांची दमछाक झाली.

संध्याकाळी त्या थोड्या थकल्यासारख्या दिसल्या म्हणून श्रीरंगरावांनी जेवण बाहेरून मागवले .

"उगाच खर्च केलात, प्राचीच्या मदतीने मी जेवण बनवले असते, अजून कमवायची सुरवात नाही तर गमवायला तयार", काकू नाराजीच्या सुरात म्हणाल्या.

" अगं, तू दमली आहेस म्हणून तुला आराम आणि मुलांनाही change मिळेल", ते म्हणाले.

तिसरा दिवस उजाडला, काकू थोड्या घाबरल्या होत्या, आज सुनंदा येईल ना? काल सर्व जबाबदारी माझ्यावर पडली, खूप दमायला झाले, आज मालतीला जास्त वेळ थांबायला सांगते, पण तिने काल पगार २०००/- वरून २५०० /- केला नाहीतर आज ३०००/- करेल.
 बापरे! entrepreneur बनण्यापेक्षा employee बनणे सोपे असते का ? इतक्यात बेल वाजली, काकूंनी दरवाजा उघडला, मुले आनंदाने घरात आली. काकूंनी घड्याळात पहिले, ९ वाजून २० मिनिटे झाली होती, म्हणजे सुनंदाने पाहुण्यांचा मुक्काम वाढला या कारणास्तव सुट्टी घेतली तर ! ती ६०००/- महिन्याला घेणार आहे, मी तिचा एक दिवसाचा पगार कापणार आणि मालतीला देणार , गरज फक्त मालकाला नसते तर काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला असते बरोबर, असे मनाशी म्हणत काकूंनी तो विचार थांबवला आणि मुलांच्यात रमल्या .

दुपारी दोन मुलांचे एका खेळण्यावरून भांडण सुरु झाले, अगदी कडाक्याचे भांडण झाले, ते पाहून काकूंना आश्चर्य वाटले , कुठे बरं शिकले असतील हे भांडण ? काकू मालतीला विचारू लागल्या.

त्यावर मालती म्हणाली," अजून शाळेत कुठे जातात ? घरीच आईवडिलांची भांडणे पहिली असतील "आणि दोघी हसू लागल्या. ५ नंतर मुले गेली तरी काकू पसारा आवरत होत्या, मुलांना उचलून त्यांचे हात दुखत होते, पण गप्प, 'कष्टाविण फळ नाही'.

आज शुक्रवार,चौथा दिवस, सकाळपासून त्या energetic वाटत नव्हत्या, ते पाहून घरातील मंडळींनी आज डबा नको, असे सांगून ते निघाले.

थोड्यावेळाने माझ्यासाठी मुगाची खिचडी करीन, असे मनाशी ठरवत काकू मुलांची वाट पाहू लागल्या. नेहमीप्रमाणे मुले आली, त्यांच्याबरोबर गाणी गायली, खेळ खेळल्या, मुलांनी डान्स केला. दुपारी एक वाजता, मुलांना त्यांचे डबे काढून दिले, काकूंनी मुलांना मुगाची खिचडी व त्यावर साजूक तूप घालून खायला दिले, मुलांनी स्वतःचा डबा बाजूला ठेवून, ते मिटक्या मारत खिचडी खाऊ लागले, आजी छान, मस्त. मुलांचे आनंदी चेहरे पाहून सुनंदा म्हणाली ," राधा प्रेमाने खायला दिलीस ना" ! काकू फक्त हसल्या. पोटभर खिचडी खाल्यावर मुलांना झोप येऊ लागली, मुले झोपली हे पाहून त्या दोघी जरा आडव्या झाल्या. सुनंदा, काकूंना विचारू लागली, तुला माहेर-सासर ची इस्टेट मिळण्याचा काही योग आहे का ? काकू हसत म्हणाल्या ," माहेरच सुटत नाही आणि सासरच पचत नाही, अशी आमची परिस्थिती", दोघी हसू लागल्या आणि बोलता बोलता झोपल्या. चारचे ठोके पडले तरी त्यांना जाग आली नाही .

इतक्यात धाडकन आवाज झाला, त्या दोघी दचकून उठल्या, समोर पहिले तर, नील खुर्चीवर चढून शोकेसमधील शिंपल्यांची डॉल काढत असताना, त्याच्या हातातून पडली व त्याचे तुकडे घरभर पसरले . प्राचीची लहानपणीची आठवण, ती संध्याकाळी घरी आल्यावर नक्कीच रागावणार ! काकू एक दीर्घ श्वास घेत बोलल्या. "आपली मुले असती तर एव्हाना दोन फटके दिले असते, नाही का राधा" ? सुनंदा म्हणाली.

" तू मुलांना दुसऱ्या खोलीत घेऊन जा, तोपर्यंत मी शिंपल्यांचे तुकडे उचलते, कुणाच्या पायाला लागायला नको, " काकू सुनंदाला म्हणाल्या. काकू काळजीपूर्वक तुकडे गोळा करू लागल्या, त्यांच्या डोळ्यासमोर प्राचीचा रडवेला चेहरा आला, प्राची पाच वर्षाची झाली तेव्हा अलिबागला फिरायला गेलो होतो, तिकडची आठवण म्हणून तिला शिंपल्यांची डॉल घेतली होती, दहा वर्ष तिने ती डॉल सांभाळून ठेवली होती आणि आज... काकू नाराज झाल्या,काही तुकडे शोकेस खाली गेले होते, ते काढताना काकूंच्या कमरेला टेबलचे कॉर्नर जोरात लागले, आई गं ss त्या कळवळल्या. सुनंदा धावत आली, तिने त्यांना उठायला मदत केली, त्यांच्या कमरेला मलम लावले, गरम पाण्याची पिशवी शेकायला आणून दिली. आजीला लागले हे पाहून मुले देखील शांत बसली. सुनंदाने काकूंसाठी चहा केला. काकूंनी वेदनाशामक गोळी आणि चहा घेतला. पालक आल्याबरोबर मुले निघून गेली. काळजी घे, असे म्हणत सुनंदा देखील निघाली.

घरातील मंडळींना कमरेच्या त्रासाबद्दल जराही सांगायचे नाही, असे काकूंनी मनाशी ठरवले . त्यांनी वेदना सहन करत कसाबसा स्वयंपाक बनवला. त्यांचे यजमान घरी आल्यावर, त्यांना चहा, बिस्किटे  खायला आणून दिली . काकूंचा चेहरा पहाताच, श्रीरंगरावांनी ताडले की, राधाला वेदना जाणवत आहेत.

रात्री जेवताना त्या फारशा बोलल्या नाहीत, जेऊन झाल्यावर उठताना त्यांच्या चेहऱ्यावर वेदनेची कळ दिसली. ते पाहून श्रीरंगराव बैचेन झाले, ती स्वतःहून काहीच सांगणार नाही, रात्र झाली आहे, उद्या सकाळी सुनंदाला फोन करून विचारूया आणि सुट्टी घेऊया असे ठरवत त्यांनी बेड तयार केला. झोपताना काकूंनी गुपचूप मलम लावले आणि डोक्यापर्यंत चादर घेऊन झोपी गेल्या. पण सकाळी त्यांना उठताच येईना, आई गं , वेदनेने त्या तळमळत होत्या.

श्रीरंगरावांनी प्राचीला दवाखान्यात जाण्यासाठी गाडी बुक करायला सांगितले. प्राचीने mom health is not well, going to clinic असा message सुनंदाला पाठवला. डॉक्टरांनी x - ray काढायला सांगितला, त्याबरोबर दोन blood test पण लिहून दिल्या. x -ray बघत dr म्हणाले," कमरेला मार लागला आहे , मागील काही दिवसात जड वस्तू उचलल्या आहात का? शारीरिक श्रम देखील झाले आहेत असे वाटते, थोडी विश्रांती घ्या, वस्तू उचलू नका, थोडे दिवस कमरेला बेल्ट लावा, त्यामुळे बरे वाटेल, मलम आणि औषधे लिहून दिली आहेत, ते वेळेवर घ्या " .

दवाखान्यातून निघताना टॅक्सीत काकू डोळे मिटून बसल्या होत्या, त्यांच्या डोळ्यासमोर दोन दिवसापूर्वीचे स्वप्न दिसू लागले,पाच वर्षात मी हजारांवरून, लाखांपर्यंत पोहचणार होते आणि.... पाचव्याच दिवशी माझे स्वप्न भंग झाले.

टॅक्सी दारासमोर उभी राहिली, काकूंना यजमानांनी हात धरून घरात नेले, त्या खुर्चीवर बसल्या, प्राचीने पाणी आणून दिले. तेवढ्यात प्रतीक आला, घरातील शांतता पाहून त्याने विचारले, भीम और उसकी टोली कहाँ हैं ?

प्राची म्हणाली," सब फुर्र हो गये भैया , बिझनेस चौपट हो गया ".

काकू कुठलीही प्रतिक्रिया न देता खिडकीबाहेर बघत होत्या .

इतक्यात दारावरची बेल वाजली, दारात एक बाई आपल्या लहान मुलीला घेऊन आली होती, श्रीरंगरावांनी आपण कोण ? असे विचारताच ती म्हणाली," येथे फुलपाखरू पाळणाघर आहे ना ! श्रीरंगरावांनी राधाकडे पाहिले, पण त्यांची नजर खिडकीबाहेर होती.

श्रीरंगराव त्या बाईला म्हणाले ," फुलपाखरू पाळणाघर माझी मिसेस चालवते, तिच्या कमरेला थोडा मार लागल्यामुळे एक आठवडा बंद आहे, पुढच्या आठवड्यात सुरु होईल ".

ठीक आहे, मी पुढच्या आठवड्यात येईन, असे म्हणून ती निघून गेली. काकूंनी श्रीरंगरावांकडे आश्चर्याने पाहिले. मुले म्हणाली," बाबा, तुम्हीं काय म्हणालात ? पुन्हा चालू होईल, चार दिवसात आमदनी अठन्नी खर्चा रुपया, असे झाले आहे" .

श्रीरंगरावांनी त्यांना हाताने थांबवले, ते पुढे म्हणाले," पाळणाघर चालवणे, केवळ श्रीमंत बनण्याचा मार्ग नव्हता तर तुमच्या आईला समाधान, आनंद मिळवून देणारा मार्ग आहे, पैश्याच्या बाबतीत बोलायचे तर नफा /तोटा या धंद्याच्या बाजू आहेत, पण धंद्यासाठी प्रयत्न करणे, ही त्याहून मोठी गोष्ट आहे ".

श्रीरंगरावांचे बोलणे ऐकताच काकूंच्या चेहऱ्यावर हास्य उमटले , त्या म्हणाल्या ," किती छान बोललात तुम्हीं" !

"शेजारच्या शामरावांसारखे नाही का आई!" प्राची आणि प्रतीक हसून म्हणाले.

Click here to go back to themarathistory.com

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुन्हा भेटूया .. ⏳

आणि माझा . . . झाला

An Evening in SwargLok